मूळचे उत्तर हिंदुस्थानातील उदयपूरचे सिसोदे घराण्याचे सुजन सिंह आपले भाग्य अजमवण्या साठी दक्षिणेत आले. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी मोठा पराक्रम करून, तलवारी गाजवून ठिकठिकाणी पाटीलकी, देशमुखी मिळविल्या. वंशपरंपरेने म्हाळोजी घोरपडे यांचेकडे वाई प्रांताची देशमुखी आणि काही गावच्या पाटीलकी आल्या. त्यात येरळा परिसरातील भालवणी, जांब, वांगी या गावच्या पाटीलकींचा समावेश होता. भालवणीत घोरपड्यांचा तटबंदी सुरक्षित प्रशस्त चौसोपी वाडा होता. वाड्याला बुरुज नव्हते, नाहीतर वाडा गड किंवा किल्ला असावा असाच होता. एवढे वैभव असूनही म्हाळोजीराव विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. त्यांच्या भालवणीच्या वाड्याला जहागिरी व सरंजामी वैभव होते.
अशा या वैभवात म्हाळोजीरावांची मुलं संताजी, बहिर्जी, मालोजी सुखात लोळली असती. परंतु वैभव उपभोगणे त्यांच्या रक्तातच नव्हते. नवकस घोरपड्यांच्या पिढीला आराम, सुख, चैन माहीतच नव्हते.
एकदा तिघे बंधू येरळा नदीकाठी लुटूपुटुची लढाई खेळून वाड्यावर परतत असताना, धाकट्या बहिर्जीने विचारले, संताजी दादा, नवकस म्हणजे काय? थोरल्या संताजींनी सदरेवर वडिलांच्या तोंडून ऐकलेली हकिकत सांगितली.... स्वराज्यासाठी लढताना आपल्या घराण्यातील नऊ जणांनी प्राणार्पपण केले. त्या लहान वयातही घोरपडे बंधूंचा उर अभिमानाने भरून आला.
मुधोळकर आणि घोरपडे यांचे मूळ घराणे एकच होते. म्हाळोजी घोरपडे विजापूर दरबाराचे पाचशे स्वारांचे सरदार होते. हे शल्य मुधोळकरांना कुठेतरी सलत होते. इतकेच काय शहाजीराजांबद्दलही त्यांच्या भावना आक्रमक झाल्यात. त्यात बादशहाला अनाठायी अहंकार झाला. त्याच्या डोळ्यात हिंदूधर्म खुपू लागला लागला. त्याने फर्मान काढले... संपूर्ण मुलखातील हिंदू धर्म बुडवून, हिंदूंच्या देवळांचा विध्वंस करून त्या ठिकाणी दर्गा, मशिदी बांधून आपल्याच धर्माचा प्रचार करावा.
हे फर्मान सर्व सरदारांना रवाना झाले. म्हाळोजीरावांनाही आले. त्यांचा संताप अनावर झाला. आम्ही हिंदू असून आमचीच मंदिरे आमच्या हाताने पाडायची? "स्वधर्म राखावा पर धर्म भयावह" असे आमच्या शास्त्रात सांगितले आहे. म्हाळजी घोरपडेंनी तडका फडकी बादशहाची सरदारकी सोडली. त्याच पावली हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांना जाऊन मिळाले. स्वराज्य स्थापनेबाबत एक मत झाले. बेल भंडारा उचलून आणाभाका झाल्या. घोरपडे आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचे एकमत होऊन विजापूर प्रांत काबिज करण्याबद्दल खलबत्त सुरू झाले.
दख्खनवर मोगलांनी आजपर्यंत ४०० वर्षे सत्ता गाजवली होती. समर्थ रामदास स्वामींनी "मराठा तितुका मेळवावा" अशी साद घातली आणि शिवाजी महाराजांनी ही "श्रीं"ची इच्छा म्हणून स्वराज्य स्थापणीस सुरुवात केली. म्हाळोजीसह अनेक मावळ्यांना घेऊन शिवाजींनी विजापूरच्या सुलतानाचा बराचसा टापू जिंकून दख्खन मध्ये ३६५ किल्ले सामील करून घेतले. प्रत्येक किल्ला स्वतःच्या आधारावर, स्वतःच्या उत्पन्नावर उभा होता. बाहेरून मदतीची आशा नव्हती. भालवणीच्या म्हाळोजी घोरपडेचा वाड्याचीही वेगळी अवस्था नव्हती. तरी पण ते आपल्या तिन्ही पुत्रांच्या शिक्षणाकडे लक्ष ठेवून होते. आपली मुलं शस्त्रास्त्रामध्ये पूर्ण प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांच्या लष्करात शिकण्यास घेण्याची विनंती केली.
थोड्याच दिवसात शिवाजी महाराजांच्या लष्करात त्रीवर्ग बंधू युद्धाचे डावपेच शिकू लागले. जशी लष्करी शिक्षण अंगी बाणले, त्याचबरोबर महाराजांच्या पराक्रमाचे अनेक पैलू त्यांना जवळून अनुभवायला मिळू लागले.
शिवाजी महाराजांनी पुन्हा विजापूरावर मोहीम करण्याचे ठरविले. आघाडीवर म्हाळोजी घोरपडे होते. त्यांनी संधीचा फायदा घेऊन तिन्ही मुलांना मोहिमेत घेतले. या मोहिमेत मुसलमान सरदारांशी अनेकदा युद्धांचे प्रसंग आले. त्यावेळी संताजी, बहिर्जी, मालोजी रणांगणावर हजर राहून शिस्त, गनिमी कावा असे बारकावे समजावून घेत असत. त्यावेळी संकल्पसिद्धी साठी लागणाऱ्या कष्टांच्या झळा सहन करणे इतपत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. यवनी सत्ता केवळ सत्तांधतेने व वेड्या धर्माभिमानाने करत असलेले हिंदूंचे अनन्वित छळ आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी मराठ्यांनी दाखवलेले अपरिमित हा प्रभाव तरुण पिढीवर चांगलाच पडला.
विजापूरच्या मोहिमेत असताना संताजीत पुरेपूर आत्मविश्वास निर्माण झाला होता. युद्धातले बारकावे समजावून घेतले होते. पुढे ते प्रत्येक लढाईत हिरिरीने भाग घेऊ लागले. महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहितेंच्या हाताखाली अनेक पराक्रमी वीर उदयास आले. त्यात संताजी घोरपडे यांचे नाव प्रामुख्याने येते. हंबीररावने केलेल्या प्रत्येक मोहिमेत संतांजी घोरपडेंनी अद्भुत पराक्रम केला होता. जेव्हा हंबीरराव खानदेशची खंडणी, व बऱ्हाणपूरची लूट घेऊन महाराजांना भेटायला गेले, तेव्हा संताजींच्या शौर्याबद्दल सांगितल्यावर, महाराजांनी त्यांचे कौतुक करून, "जुमालेदारी" बहाल केली. प्रत्यक्ष छत्रपतींनी आपल्या पराक्रमाची दखल घेतली म्हणून संताजींचा उर आनंदाने, अभिमानाने भरून आला. हंबीररावसारखे रत्नपारखी सेनानी मिळाल्याचा त्यांना आनंद झाला.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment