संताजींचा पराक्रम पाहून नंतरच्या काळात ते हंबीरराव मोहितेंबरोबर प्रत्येक मोहिमेवर सावलीसारखे राहू लागले. महाराजांनी हंबीररावावर कर्नाटकची मोहीम सोपवली. हुसेन खानच्या दहा हजाराच्या फौजांशी मुकाबला करायला आपल्या मूठभर सैनिकांसह हर हर महादेवऽऽ, छत्रपती शिवाजी महाराज की जयऽऽ च्या गर्जनेत मजल दर मजल करत फौज कूच करू लागली. कित्येक वेळा हंबीरराव संताजींशी गुप्त खलबत्त करीत असत. दोघेही महाधूर्त, दूरदर्शी…. विचारात कधी तफावत नव्हती.
कर्नाटकच्या मोहिमेत सर्वप्रथम तुंगभद्रेच्या उत्तरेकडील प्रांत जिंकण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मराठ्यांनी कोप्पलवर स्वारी केली. कोप्पलच्या किल्ल्यावर सुभेदार हुसेन खान मियाना आणि कासी खान या पठाणांची सत्ता होती. दोन्ही बाजूने घनघोर युद्ध झाले. हुसेन खान पराभूत झाला. त्याला कैद केले. नंतर बहादुरबिंडा किल्ला घेतला आणि कर्नाटकचे मोहीम फत्ते झाली.
सेनापतीच्या लष्करी कडव्या शिस्तीमुळे प्रत्येक मोहीम यशस्वी होऊ लागली. लगेच महाराजांच्या आज्ञेने जालन्यावर चढाई करण्यास हंबीररावांनी कर्णा फुंकला. शिंग, तुतार्या निनादल्या. छत्रपतींचं घोडदळ चौखूर उधळलं. यावेळी संताजी घोरपडे आघाडीवर होते. मजल दर मजल करत वाटेत आडव्या येणाऱ्या शत्रूचा समाचार घेत महाराजांची फौज जालन्यात शिरली आणि रणमस्तखान मराठ्यांवर चालून आला. मराठ्यांनी आपले शौर्य पणाला लावून, चार दिवसांच्या भीषण युद्धाने खानाला घायकुतीला आणले. मराठ्यांनी जालना शहर लुटले. प्रचंड संपत्ती घेऊन विजयाच्या कैफेत परतत असताना रणमस्तकखानने मराठ्यांवर पिछाडीने हल्ला केला. त्याचवेळी औरंगाबादहून केसर सिंग व सरदार खान दोघे मोगल सरदार रणमस्तखानच्या मदतीला आले. प्रसंग मोठा बाका होता. मराठे विजयाच्या धुंदीत असतानाच, अचानक पिछाडीवर हल्ला झाल्याने मराठी लष्करात घबराट पसरली. परंतु मोगलांची आणखी कुमक येण्यापूर्वीच महाराजांनी प्रसंगावधान दाखवून माघार घेतली. सतत तीन दिवस प्रवास करून पट्टाकिल्ल्यावर सुखरूप येऊन पोहोचले. या मोहिमेत मराठ्यांचे जबर नुकसान झाले. कारण लुटलेली दौलत मोगलांनी परत हस्तगत केली. चार हजार घोडेस्वार धारातीर्थी पडले.
महाराजांनी पट्टा किल्ल्याचे नाव बदलून "विश्रामगड" ठेवले. संताजी, हंबीरराव, मानाजी गडाच्या संरक्षणार्थ जागृत होते. पण परत शत्रूवर चालून गेलेले सिंधोडा निंबाळकर अजून परतले नव्हते.
गडावर महाराजांना नित्यनेमाने सरदार मुजरा करायला जात. परंतु संताजी आणि मानाजीला मुजर्यास न येण्याची शिक्षा फर्मावली होती. कारण जालना मोहिमेत झालेली चूक सुधारणारी नव्हती. वीरांची दृष्टी, श्रद्धा, लूटीवर असण्यापेक्षा तलवारीच्या मुठीवर असायला हवी. त्यात त्यांची ढिलाई झाली होती म्हणून महाराजांचा रोष झाला होता.
संताजींनी प्रतिज्ञा केली, यापुढे फक्त आणि फक्त अजिंक्यच होऊन महाराजांच्या मुजर्याला जायचे.
विश्रामगडावरचा महाराजांचा मुक्काम वाढल्यामुळे फौजेत अस्वस्थता निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत स्वतः महाराज मुत्सद्यांशी खलबत्त करीत असत. जागता कडक पहारा होता.
एका राहुटीत रात्री जखमी सरसेनापती झोप येत नसल्यामुळे कूस बदलत होते. तोच त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. टापांच्या आवाजावरून स्वार आपल्याच छावणीचा असल्याची खात्री झाल्यावर असह्य वेदना सहन करत, ते राहूटी बाहेर आले. तोच स्वार त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला.
त्याला पाहून आश्चर्याने ते म्हणाले, "कोण संताजी घोरपडे?"
"होय सेनापती! झोप येत नव्हती. महाराजांचा माझ्यावरचा रोष कसा जाईल? या विचाराने आपल्याकडे आलो."
"संताजी, गेलेली वेळ पुन्हा येत नाही. फक्त परत चूक होणार नाही ही दक्षता घ्यावी. रायगडावर गेल्यावर होईल सर्व व्यवस्थित. निर्धास्त रहा. वेळ पाहून महाराजांची तुझ्याबद्दलची खात्री पटवून देईल."
शिवाजी महाराज दूरदर्शी, कर्तबगार, धोरणी मुत्सद्दी राजा होते. त्यांचे प्रत्येक पाऊल अतिशय दूरगामी विचारपूर्वक उचललेले असायचे. स्वराज्याची भरभराट, आदिलशाही, कुतुबशाहीला सहन होत नव्हती. पण राजेंपुढे त्यांची डाळ शिजत नव्हती. मोगल बादशहा औरंगजेबने आदिलशाहीला उत्तेजन देऊन स्वराज्यावर स्वाऱ्या करण्यास भरीस पाडले.
त्याचवेळी महाराजांच्या घरात कलह माजवून युवराज संभाजींना फोडण्याचा प्रयत्न केला गेला व या दोन्ही कामात थोडेफार यशही मिळाले. शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवर गेले असता, संभाजीराजे मोगल सरदार दिलेरखानाला जाऊन मिळाले. ही घटना मराठ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी होती. (इथे एक गोष्ट प्रामुख्याने स्पष्ट करावीशी वाटते की संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी, धर्म अबाधीत ठेवण्यासाठी सतत एक दोन दिवस नाही तर तब्बल ४० दिवस अनन्वित छळ सोसला. इतके दृढ मनोबल असलेले संभाजी घरगुती कलहाने मोघलांना जाऊन मिळतील, हे पटत नाही. यात महाराजांचे काही राजकारण असावेसे वाटते.)
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment