छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्रा येथून करून घेतलेली सुटका ही अफझलखानाच्या प्रसंगानंतर महाराजांवर आलेला दुसरा जीवघेणा प्रसंग असल्यामुळे ही घटना मराठ्यांच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे. केवळ महाराजांच्या नव्हे तर संबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक व तितकीच महत्त्वाची घटना आहे.
मोगल बादशहाच्या राजधानीतून, त्याच्या नजरकैदेतून आजवर कोणीही सहीसलामत निसटू शकले नव्हते. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाला शहाजहानलाही ते जमले नव्हते, पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखवले. आणि असे केले की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला.
आग्र्याहून सुटका हे शिवचरित्रातील एक अत्यंत गूढ प्रकरण आहे. शिवजन्मतिथी निर्णयाबाबत अपुऱ्या पुराव्यामुळे अनेक पक्ष निर्माण झाले खरे, परंतु आग्र्याहून सुटकेचे संदर्भात ढीगभर पुरावे उपलब्ध असूनही इतिहासकारांत ठाम मत नाही.
आग्र्याच्या सुटकेवेळी शिवराय पेटा-यात बसून निसटले होते की वेषांतर करून निसटले यासंबंधी इतिहासकारांत अजूनही मतभेद आहेत.अशा या मतभेदांच्या गोंधळात उपलब्ध झाले तितके समकालीन पुरावे ग्राह्य धरत प्रस्तुत घटनेच शक्य तितक्या तपशीलवार वर्णन करण्याचा मानस आहे.
पेटाऱ्यात बसून राजे निघोन गेले यास परकालदासाचे पत्र, जेधे शकावली सभासद बखर, मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना तसेच अन्य काही इंग्रजी साधने दुजोरा देतात, ते खालीलप्रमाणे -
मग एके दिवशी राजे व राजपुत्र एकच पेटाऱ्यात बसले. पुढे मागे पेटारे करून मध्ये पेटीयांत बसून चालिले. ते वेळी आपला साज सर्व उतरुन हिरोजी फरजंद यास घालून, आपले पलंगावरी निजविला. हात मात्र त्याचा उघडा बाहेर दिसू दिला. अन् शेला पांघरून निजविला. आणि एक पोरगा रगडवयास ठेविला. जवळील कारकून होते त्यांस अगोदर दिल्लीपलीकडे तीन कोसांवर एक गाव होता तेथे ठिकाण करून पुढे रवाना केले होते. आणि आपण उभयता पेटाऱ्यात बसून निघोन चालिले.
- सभासद बखर
शके 1558 पराभव संवत्सरे
ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री सिवाजी राजे अगरियास पाऊन अवरंगजबची भेटी घेतली बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादसी अगरीयातून पेटारियांत बैसोन पळाले यावरी राजश्री संभाजी राजे सहवर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस राजगडास आले.
- जेधे शकावली
तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यरा की आमगरफ्त भी सो पट्यारा में बैठ निकल्यो.
(मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष निघाला की पेटाऱ्यांची ये-जा होती त्यामुळे तो पेटाऱ्यात बसून निघाला असावा.)
- परकालदासचे 3 सप्टेंबर, 1666 चे राजस्थानी पत्र
देवाचा प्रसाद म्हणून शिवाजी दर गुरुवारी मिठाईचे मोठे मोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागला. हे पेटारे इतके मोठे असत की एकेक वाहून नेण्यासाठी काही माणसे लागत. मिठाई वाटण्याच्या वेळी शिवाजीच्या निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर खूप गर्दी जमू लागली. पोलादखानाच्या माणसांबरोबर शिवाजीने अशी काही वागणूक ठेवली की ते लोक त्याच्या भजनी लागले. आणि एक दिवशी शिवाजीने एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले. मिठाईचे दोन पेटारे रिकामी केली आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.
- मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना याच्या 'तारीखे दिलकुशा' या फारसी चरित्रातील उल्लेख
त्याचप्रमाणे ग्रँड डफ ने आपल्या मराठ्यांच्या बखरीत जेथे समकालीन ग्रंथांचा व कागदपत्राचा आधार दिला आहे, त्या मुद्या पुरते त्याचे लिहिणे ग्राह्य धरलेच पाहिजे.
मग एके दिवशी आपला पुत्र व आपण असे दोघे दोहो पेटाऱ्यात निजून माणसांकडून ते पेटारे शहराबाहेर एकीकडे आपले संकेतस्थळी नेवविले आणि तेथे बाहेर निघून दोघे एका घोड्यावर बसून पळाले. ते दुसऱ्या दिवशी मथुरेस जाऊन पोहोचले.
- ग्रँड डफ (मराठ्यांची बखर)
तसेच सुरतकर इंग्रजांचे दिनांक 25 सप्टेंबर 1666 रोजी कंपनीस गेलेल्या पत्रात शिवाजी संभाजी पेटाऱ्यात बसून निसटल्याचा उल्लेख आहे.
शिवाजी महाराज वेषांतर करून सुटले यास दुजोरा देणारे साधने -
औरंगजेबाच्या देखरेखीखाली लिहून पूर्ण झालेल्या मोहम्मद काजम या लेखकाच्या 'आलमगीर नामा' या ग्रंथात पेटाऱ्याचा उल्लेख येत नाही तर महाराज वेषांतर करून निघून गेले असा उल्लेख आढळतो.
तसेच कवी भूषणचे उदाहरण पाहण्यासारखे आहे -
कांधे धरि कांवर चल्योदी जबचाव सेती एकलिये
जात एक जात चले देवा की
भेषको उतारी डारी डंवर निवारी
दाऱ्यो धऱ्यौ भेष ओर
जब चल्यो साथ मेवा की
पौन हो की पंछी हो कि गुटका कि
गौन होकी देखो
कौन भांती गयो करामत सेवा की |
( वेश बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटा-याबरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले याचा पहारेकर्यांना पत्ताही लागला नाही.)
याचबरोबर सुप्रसिद्ध इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांनापण महाराज 'पेटाऱ्यात बसून गेले' हे मान्य नाही.त्यांच्या मते महाराजांनी सुटकेसाठी ॅॅॅॅॅॅॅ पेटार्यांची जरूर उपाययोजना केली असेल परंतु त्यांच्यासारखा मानी पुरुष असहाय बनून पेटाऱ्यात बसला असेल असे वाटत नाही. पेटारे वाहणाऱ्या नोकराचा वेष घेऊन ते बाहेर पडले असावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पण शिवाजी महाराज फळांच्या/ मेव्याच्या मोठ्या पेटाऱ्यात बसून निसटले ही घटना कशी पसरली? यासंदर्भात माहिती देताना पगडी म्हणतात, चौकी, पाहाऱ्यावरचे लोक आणि त्यांचे अधिकारी यांना जाब- झडतीपासून वाचवावे यासाठी अशी कथा प्रचलित झालेली असावी.
ज्या राजस्थानी पत्रातून महाराज पेटार्यात बसून निसटले अशी माहिती मिळते. ते पत्र अग्राह्य ठरवताना ते म्हणतात,ही घटना घडल्यानंतर पुऱ्या २० दिवसांनी हे पत्र लिहिले आहे. शिवाजी महाराज कसे निसटून गेले यावर परस्पर विचारविनिमय करून ठरवलेला हा एक तर्क आहे.
तसेच ज्या आलमगीरनाम्यात महाराज वेषांतर करून निसटले असे वर्णन आहे त्यास दुजोरा देताना ते म्हणतात, कोणत्याही प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय हे प्रकरण अर्धवट सोडून देनाऱ्यापैकी औरंगजेब नव्हता.त्याचे सरकारी चरित्र आलमगीरनामा यात स्पष्ट म्हटले आहे की, शिवाजी हा वेषांतर करून निघून गेला. (तगय्युरे वजे दादे)
परंतु केवळ एवढ्यावरून पेटाऱ्यांची घटना मोडीत निघत नाही. कारण एकाच वेळी इंग्रजी, राजस्थानी, मराठी साधनांत पेटाऱ्यांचा उल्लेख येणे हा काही योगायोग वा पूर्वनियोजित प्रकार नाही.
वरील विविध नोंदी पाहता छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मगरमिठीतून कसे निसटले, यापेक्षा एवढा प्रचंड पहारा असताना सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून महाराज कैदेतून अलगद बाहेर पडले हे महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment