विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजे पेशवे.




 मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजे पेशवे. छत्रपतींद्वारे पेशव्यांची नेमणूक व्हायची. पुण्यामध्ये पेशवे रहायचे हे आपण सगळे जाणतोच. पेशव्यांचा मोठा मुलगा (वारस) पुढील पेशवा व्हायचा.थोडक्यात पेशव्यांचे इतर भाऊ पेशवे बनू शकतील याची शक्यता तशी कमीच.

तर थोरल्या बाजीराव पेशवांच्या दोन बायका काशीबाई आणि मस्तानी आणि यांच्यापासून बाजीरावांचे तीन मुलगे नानासाहेब, रघुनाथराव आणि समशेर. थोरल्या बाजीरावांच्या मृत्युनंतर नानासाहेब पेशवे झाले. नानासाहेबांच्या काळात रघुनाथरावांनी अनेक लढाया केल्या, अगदी अटकेपार झेंडे रोवले. ते शूर होते यात शंका नाही, शूर माणसांच्या महत्वाकांक्षाही प्रबळ असतात. आपण पेशवा बनावं ही महत्वकांक्षा रघुनाथरावांचीदेखील होती. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की राघोबादादांमध्ये पेशवा बनण्याची लायकी होती पण ते सहजपणे पेशवा बनणं शक्य नव्हतं.
नानासाहेब पेशव्यांना तीन मुलगे, विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव. यापैकी विश्वासरावांचा पानिपतच्या लढाईत मत्यु झाला. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्युनंतर माधवराव पेशवे झाले. रघुनाथराव किंवा राघोबांची पेशवे व्हायची संधी यावेळेस हुकली.
माधवराव पेशवे उत्तमरीतीने कारभार करत होते पण राघोबांची महत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यात त्यांची महत्वाकांक्षी बायको आनंदीबाई आणि राघोबांचे सल्लागार यांच्या चूकीच्या सल्ल्यांमुळे राघोबादादा यांनी माधवराव पेशव्यांच्या विरोधात अनेक कुरापती केल्या. काका आणि पुतण्याचे संबंध बिघडत गेले आणि माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यावर नजरकैदेत ठेवले. पुढे माधवरावांनी आपल्या शेवटच्या काळात काकांबरोबर संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
माधवरावांना क्षय झाल्याने त्यांची राजवट फार काळ टिकू शकली नाही. वयाच्या २७व्या वर्षी त्यांचा मृत्यु झाला. त्यांना स्वतःला मुलबाळ नसल्याने त्यांचा लहान भाऊ नारायणराव याला पेशवा करण्यात आले. नारायणराव जेव्हा पेशवे झाले त्यावेळेस सज्ञान नसल्याने राघोबादादा हे त्यांच्यावतीने कारभार करत होते. माधवराव पेशव्यांइतकी कुशलता नारायणरावांमध्ये नव्हती. म्हणजे कारभार राघोबादादा बघत होते पण पेशवेपणाचा मान नारायणरावांना मिळत होता. अशी परीस्थिती वातावरण गढुळ करत जाते. नारायणराव आणि राघोबा या दोघांचे सल्लागार त्यांना चूकीचे सल्ले देत होते. त्यामुळे काका पुतण्याच्या संबधात तणाव निर्माण होऊ लागला आणि राघोबादादा आणि नारायणराव पेशव्यांचे खटके उडू लागले. नारायणराव पेशव्यांनी आपले काका राघोबादादांना नजरकैदेत ठेवलं.
असं म्हणतात रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट असतं, पण सत्ता रक्ताला पातळ करु शकते. सत्ता हाती असल्यानेच नारायणराव राघोबांना कैद करु शकले आणि सत्ता हाती आल्याशिवाय आपण काही करु शकणार नाही याची जाणीव राघोबांना होऊ लागली. कैदेत असलेले राघोबा आणि आनंदीबाई त्यांचे कान भरणारे त्यांचे सहकारी यांच्यामुळे एकूणच वातावरण तंग होत गेलं. राघोबांनी कैदेतून बाहेर पडण्याचा विचार सुरु केला. शनिवारवाड्यात नारायणरावांच्या आई गोपिकाबाई मोठ्या प्रमाणावर दानधर्म करत. वेळेला पेशव्यांचे संरक्षक गारदी आणि इतर कारभार्यांना पगार वेळेवर मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. कोणत्याही सत्तेत सरकारी कर्मचारी संतुष्ट नसतील तर सत्ता पालटायला वेळ लागत नाही. नाराज गारद्यांमुळे एक संधी राघोबादादांना दिसू लागली.
१७७३चा ऑगस्ट महिना, गणपती उत्सवाचा काळ. राघोबा दादांनी गारद्यांच्या प्रमुखाशी चर्चा केली. गारद्यांच्या थकलेल्या पगारासंबंधी त्यांनी मध्यस्थी करायचं आश्वासन दिलं. याच्या बदल्यात त्यांनी नारायणराव पेशव्यांना धरुन त्यांच्यासमोर आणावे अशा आशयाचं पत्र त्यांनी गारद्यांचे प्रमुख सुमेरसिंग गारदी यांना पाठवले. असं म्हणतात की आनंदीबाईंनी राघोबादादांच्या पत्रात बदल करुन नारायणरावांना धरावे च्या ऐवजी मारावे असे लिहिले अर्थात ध चा मा केला.
३० ऑगस्ट १७७३, गणेश चतुर्थीचा शेवटचा दिवस. गारद्यांची दिशाभूल झालेली. त्या रात्री ते नारायणरावांच्या महालात धावून गेले. नारायणराव भितीने आपल्या काकांच्या महालात धावून गेले. काका आपल्याला वाचवतील ही त्यांची आशा. पण काकांच्या डोळ्यांदेखत नारायणरावांचे असंख्य तुकडे झाले. गुपचुपपणे रात्रीच्या अंधारात नारायणरावांचे मृत शरीर शनिवार वाड्याच्या एका दरवाज्यातून बाहेर नेण्यात आले आणि लकडीपुलाजवळ त्यांचा अंत्यसंस्कार झाला.
त्याकाळी पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश रामशास्री प्रभुणे होते. त्यांनी राघोबादादा, आनंदीबाई, सुमेरसिंग गारदी आणि त्यांचे सहकारी यांना दोषी ठरवत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. पण राघोबादादा पेशवे (नारायणरावांचा वारस जन्मला नसल्याने राघोबा पेशवे झाले) असल्याने त्यांना किंवा आनंदीबाई यांना कोणतीच शिक्षा झाली नाही.रामशास्री प्रभुण्यांनी नाराज होत आपल्या पदाचा त्याग केला.
राघोबा दादांचे शौर्य अशातर्हेने वाया गेले. अटकेपार झेंडा रोवणारा हा योद्धा पेशवेपदासाठी लायक असतानांदेखील पेशवा होऊ शकला नाही. महत्वाकांक्षी लोकांचे कान भरणारे कमी नसतात, राघोबादादांच्या भोवतीदेखील अशा लोकांची कमी नव्हती. या सर्वाचा शेवट एक कट रचण्यात झाली आणि त्यात एका कोवळ्या मुलाचा बळी गेला.
शनिवारवाड्याच्या ज्या दारातून नारायणराव पेशव्यांचा देह नेला त्याला नारायण दरवाजा म्हणतात. लकडी पुलाजवळ त्यांची समाधी आहे.
संदर्भः हिस्टरीफ्लेम.कॉम

No comments:

Post a Comment

बाजीराव पेशव्यांचे पालखेडचे युद्ध.

  इतिहासात अशी काही युद्धे आहेत ज्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातील लष्करी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे छत्रपत...