हुंडीचा डाव आणि इंग्रजांची फजिती
मराठी इतिहासात युद्ध केवळ तलवारीच्या जोरावरच जिंकले गेले नाही; तर बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी आणि आर्थिक डावपेचांच्या साहाय्यानेही शत्रूला नमवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना दिलेला असा एक चतुर धडा विशेष उल्लेखनीय आहे.
इ.स. १६७४ मध्ये राज्याभिषेकानंतर महाराजांनी मोठ्या प्रमाणावर तांबे विकत घेतले. इतिहासकारांच्या मते, या तांब्याचा उपयोग शिवराई नाणी पाडण्यासाठी करण्यात येणार होता. हे तांबे मुंबईतील इंग्रज व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आले. मात्र, स्वराज्याविरुद्ध वारंवार कारवाया करणाऱ्या इंग्रजांवर महाराज नाराज होते.
तांब्याचा मोबदला रोख देण्याऐवजी महाराजांनी इंग्रजांना हुंडी (Bill of Exchange) दिली. त्या हुंडीनुसार इंग्रजांनी गोवळकोंड्यात जाऊन पैसे घ्यायचे होते. त्या वेळी गोवळकोंड्याचा कुतुबशहा स्वराज्याला ठरावीक रक्कम देत असे.
मुंबईचे तत्कालीन इंग्रज अधिकारी जेरॉल्ड ऑंंजियर यांनी ही हुंडी सुरतमार्गे गोवळकोंड्यास पाठवली. परंतु तेथे स्वराज्याचे प्रतिनिधी प्रल्हाद नीराजी नाशिककर रायगडावर गेले असल्यामुळे पैसे मिळाले नाहीत. इंग्रजांचा प्रवास, वेळ आणि खर्च वाया गेला.
यानंतर इंग्रजांचा दुभाषी नारायण शेणवी रायगडावर आला. मात्र तेव्हा प्रल्हाद नीराजी पुन्हा गोवळकोंड्यास गेले होते आणि महाराजही गडावर नव्हते. शेणवीने मग पेशवे मोरोपंत पिंगळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यालाही जवळपास महिनाभर प्रतीक्षा करावी लागली.
भेट झाल्यावर मोरोपंतांनी रोख रक्कम नसल्याचे सांगितले आणि अलिबाग परिसरातील कररूपाने मिळणारे नारळ, सुपारी, भात इत्यादी वस्तू मोबदल्यात घेण्याचा पर्याय सुचवला. परंतु इंग्रजांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यांना वाटले की मराठे प्रजेचा कर दुसरीकडे वळवतील आणि त्यांच्या हाती काहीच लागणार नाही.
पुढे इंग्रजांनी फ्रान्सिस मॉलीव्हेरेर याला नारायण शेणवीसोबत पुन्हा रायगडावर पाठवले. त्यांनाही बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर महाराजांनी त्यांची भेट घेतली आणि यावेळी रोख रकमेऐवजी तितक्या मूल्याची सोनं किंवा चांदी घेण्याचा पर्याय दिला.
शेवटी इंग्रजांनी चांदी स्वीकारण्याचे ठरवले. मात्र मोरोपंत पिंगळ्यांनी आणखी एक डाव टाकला. बाजारात चांदीचा भाव २३ रुपये प्रति शेर असताना स्वराज्याने तो २८ रुपये प्रति शेर धरला. इतका वेळ, पैसा आणि श्रम खर्च झाल्यामुळे इंग्रजांना हा दरही मान्य करावा लागला.
या संपूर्ण व्यवहाराला सुमारे दीड वर्ष लागले. शेवटी जेरॉल्ड ऑंंजियरने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पाठविलेल्या अहवालात नमूद केले की, हे प्रकरण सुमारे २२.५% नुकसान सहन करून मार्गी लागले.
हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्थिक दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी आणि शत्रूला युद्धाशिवायही अडचणीत आणण्याच्या विलक्षण कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण मानला जातो. महाराजांनी इंग्रजांना केवळ रणांगणातच नव्हे, तर व्यवहारकुशलतेनेही प्रभावी धडा शिकवला.
संदर्भ : English Records on Shivaji
No comments:
Post a Comment