विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 August 2026

संग्रामदुर्ग ५५ दिवस झुंजत होता...!

 


संग्रामदुर्ग ५५ दिवस झुंजत होता...! १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली पूर्वेच्या कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला त्यावरचे भिवा दूधावडा सह सव्वाशे मावळेही हवेत उडाले आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघली सैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले...

● चाकणच्या लढ्याचीही माहिती देताना अलमगिरनाम्यात मजकूर येतो, तो असा :
“अमीरुल उमराने स्वतःच्या हाताखालचे एक हजार स्वार व दोन हजार बंदुखे, स्वतःच्या नोकरांपैकी इस्माइल नावाच्या ग्रहस्थाच्या ताब्यात देऊन त्यास तळकोकण जप्त करण्यासाठी पाठविले होते. त्याविषयी खबर आली की, ते लोक तळकोकणात गेले. त्यानी बहुतेक मुलुख ताब्यात आणिला आणि सलाबत नावाच्या दक्षिण्यास त्या विलायतेची फौजदारी व रक्षण हे काम दिले. आता अमीरुल उमराने बाबाजी भोसले, दाखोजी (जाखोजी) व दुसरी टोळी यांस त्याच्या कुमकेसाठी पाठविले. पावसाळा जवळ आल्यामुळे तो घालविण्यासाठी पुण्यास मुक्काम करण्याचे ठरविले आणि जवळ जवळ ४० दिवस तेथे मुक्काम केला. या मुदतीत पुष्कळ वेळा कहीमुळे बादशाही लष्करास शत्रूशी लढावे लागले, तसेच पादशाही मुलुख व हे गाव (पुणे) यामधील नद्या तुफान होऊन लष्करास रसद मिळण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे टंचाई उत्पन्न झाली. तेव्हा त्यास असे वाटू लागले की, आपण पुण्याहून कूच करून चाकणास जावे. कारण ते गाव व पातशाही मुलुख यांमध्ये फक्त भिवरा नदी आहे व तेथे बादशाही लष्करास रसदही जास्त सुलभतेने मिळू शकेल व बाकीचा पाऊसकाळ तेथे मुक्काम करून घालवावा. तसेच पाऊस सरेपर्यत लष्कर बेकार असल्यामुळे चाकण किल्ला हा त्या प्रदेशातील एक बळकट किल्ला असून तो घेणे हे मोहिमेतील एक जरुरीचे काम होते, हस्तगत करण्याचे ठरविले...
या हेतूने पुण्याहून कूच करून तो २२ शव्वालला (२१ जून १६६०) चाकणाच्या गढी नजीक आला आणि त्या गढीचे बुरूज, तट व आसपासचा भाग वगैरे नीट पाहून ती घेण्याची त्याने हिंमत बांधली. लगेच मोर्चे लावून जमेतीची प्रत्येक बाजूस नेमणुक झाली. उत्तरेच्या बाजूस तो स्वतः त्याचे शिपाई, गिरधर कुवर, बीरमदेव सीबदियह (सिसोदियह), हबशखान, त्रिंबकजी भोसले, बाबाजी व इतर बादशाही सैन्य यानी मोर्चे लाविले. पूर्वेच्या बाजूस या बाजूस दरवाजा होता शमसुद्दीनखान मीर अब्दुल मज्बुद (तोफखान्याचा दरोगा), सय्यिद हुसेन, उझबेकखान, खुदावंद हबशी, दक्षिणेत नेमलेल्या त्याच्या फौजेसह राणा जयसिंगाचा नोकर विजयसिंग, सुलतान अली आरब, अलायार बुखारी, हे धमधमे (सीबह) पुढे सारण्यात गढले...
दक्षिणेच्या बाजूस राव भावसिंग, सरफराजखान, जदुराय, जौहरखान हबसी व दक्षिण्यांपैकी पुष्कळ नेमले गेले. पश्चिमेच्या बाजूस राजा रायसिंग सेवदियह (सिसेदियह) व दुसऱ्या टोळ्या यानी मोर्चे बांधून पुढे जाणे सुरू केले. हा किल्ला जिंकण्यासाठी दक्षिणेच्या किल्ल्यांतून मोठ्या तोफा मागविल्या होत्या त्या आल्यामुळे अमीरुल उमराने इशारा केला की, योग्य ठिकाणी धमधमे रचून त्यावर त्या ठेवाव्या व योग्य ठिकाणी भुयारे खोदावी. शेवटी या सैन्याने गढीस वेढिले आणि ती घेण्याची हिम्मत बांधिली. यावेळी पावसाचा अगदी भर होता तरी रात्रंदिवस तोफा व बंदुका यांच्या साहाय्याने जोरात लढाई चालू होती. दारूचे बाण, बुरूज व तट यांवरून बादशाही सैन्यावर एकसारखे येऊन पड़त आणि बादशाही तोफा, बंदुखा यांचे गोळे तटाच्या वर व आत पडून शत्रुसैन्याचा नाश करीत. फुरसत मिळताच शत्रू किल्याच्या बाहेर येऊन मोर्च्यावर गर्दी करी. पण बादशाही तलवारीच्या माराने हतप्रभ होई. अशा तऱ्हेने ५५ दिवस गेले तेव्हा अमीरुल उमराच्या मोर्च्यातील भुयार समोरच्या बुरुजापर्यत गेले आणि १७ जीहज्ज जुलुस ३ म्हणजे ता.३ शहरेवरला (१४ ऑगस्ट १६६०) ते भुयार दारुने भरून त्याने ठरविले की, सर्व लष्कराने तयार होऊन बुरुज उडताच चोहो बाजूंनी किल्यावर धावा करावा. दिवसाचा एक प्रहर राहताच त्याने इशारा केला व सुरुंगास बत्ती लाविली. त्याबरोबर बुरुज उडाला व त्यावरील लोकही आकाशात फेकले गेले. हल्ला करण्यास वाट झाल्यामुळे शायिस्तेखानाने स्वतःच्या मोर्च्यापुढे असलेल्या दमदम्यावर येऊन बादशाही व आपल्या लोकांस हल्ला करण्यास चेतविले...
बादशाही सैन्याने बादशाही सुदैवावर हवाला ठेवून व ईश्वरी रक्षणाची ढाल डोक्यावर धरून एकदम किल्ल्यावर धावा केला व प्रयत्नांची शिकस्त केली. विशेषतः शमसुद्दीनखान व राव भायसिंग यांनी विशेष श्रम घेतले, पण बुरुजामागे मातीची भिंत असल्याने शत्रू तीवर येऊन मारगिरी करू लागला. अर्थात बाण गोळे हुक्के दगड मारण्यात गढून गेला. बादशाही लष्करास त्या दिवशी पुढे जाणे व भिंत चढणे शक्य झाले नाही. अशा स्थितीतच दिवस मावळून रात्र पडली. पण बादशाही लष्करास माघार घेण्याची लाज वाटून त्यांपैकी बहुतेकांनी ती रात्र तेथेच काढिली. दुसरे दिवशी सूर्य उगवल्यावर त्यांनी तयारीनिशी किल्यावर धावा केला, बादशाही लोक सुदैवाने किल्ल्यात शिरले व त्यांनी तो काबीज केला. कित्येकांना त्यांनी यमसदनास पाठविले व बाकीचे बालेकिल्ल्याचे आश्रयास गेले. या दोन हल्ल्यांत २६८ लोक मेले व ६०० लोक जखमी झाले. शत्रूस बालेकिल्ला ताब्यात ठेवणे शक्तीच्या बाहेर वाटून त्यानी सुरक्षण मागितले आणि भावसिंगाच्या मध्यस्थिने येऊन अमीरुल उमराची गाठ घेतली व किल्ला हवाली केला. नंतर अमीरुल उमराने किल्यास येऊन बुरूज तट तोफखाना व सामुग्री यांची पहाणी केली आणि त्याचा बंदोबस्त व डागडुजी याकडे लक्ष दिले. नंतर दखनला कुमक करणाऱ्यांपैकी एक उझबकखान यास बादशाहाकडून त्या किल्याच्या रक्षणावर नेमले असल्यामुळे त्यास कित्येक शिपाई व चांगला तोफखाना यांसह तेथे ठेविले. या किल्ल्यास बादशाही हुकुमाप्रमाणे इस्लामाबाद हे नाव मिळाले. माळव्याचा सुभेदार जाफरखान यास हुकुम सादर झाला की, त्याने आपल्या लोकांनिशी, थोडे तेथे ठेऊन, अमीरुल उमराच्या कुमकेसाठी दक्षिणेत जावे आणि बादशाही चाकरी व त्यास करावयाची मदत यात प्रगत असावे..."
चाकणच्या हल्ल्यासमयी शिवाजी महाराज व त्यांचे सैन्य पन्हाळ्याकडे गुंतले गेल्याने चाकणच्या हवालदाराला बाहेरून मदत न पोहोचल्याने शाहिस्तेखानाला या जयाचे श्रेय मिळाले. तरी त्याला चाकणच्या मराठा हवालदाराच्या कुशलत्वाची तारिफ करणे भाग पडले हे येथे लक्षात घेणे जरूर आहे...
ह्या बाबत राजे म्हणत.., ‘आपण राखून गनीम घ्यावा, माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी...’
जणू हे शब्दच फिरांगोजींना आठविले असावेत आणि म्हणूनच फिरंगोजी नरसाळा यांनी भावसिहांच्या मध्यस्तीने १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ला खानाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले...

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...