ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार
ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थानमध्ये मराठा दौलत उभारण्यात अनेक सरदारांनी मोठी साथ दिली. यातील बहुतांश सरदार सातारा,पुणे,नगर भागातील होते. त्यामध्ये शितोळे,फाळके, महाडिक, माहुरकर आणि जाधव हे बलाढ्य सरदार प्रथम श्रेणीचे होते. याशिवाय महाडिक, जाधव, फाळके, आंग्रे,,काटे,मोरे,सुर्वे,पाटणकर,रोमण, मोहिते,शिर्के,गायकवाड,खानविलकर, अकोलकर,खर्डेकर,भोसले,गुजर,लगड,सूर्यवंशी,इंगळे,भोईटे,धुमाळ,साळुंखे,पवार,जगताप भापकर,हांडे,कडु,घाटगे,गाढवेआणि घोरपडे हे देखील प्रबळ सरदार होते. हे सर्व सरदार महादजी शिंदे यांच्या काळापासून ग्वाल्हेरच्या लष्कर भागात राहतात. या फौजेमध्ये बर्गे, मोहिते, आव्हाड, जाधव, कदम आणि निंबाळकर असेही सरदार होते.
महादजी शिंदे यांनी उत्तम प्रशासनासाठी आपले राज्य अनेक जहागिरीत विभागले होते. त्यांनी एकूण १०८ जहागीरदारांना त्यांच्या दर्जानुसार जहागिरी दिल्या होत्या. या जहागीरदारांना मानाचे पोशाख, पालखी आणि छत्री अशी मानचिन्हे राज्याकडून दिली जात असत आणि या बाबतीत स्पष्ट अशा लेखी आज्ञा दिल्या जात असत. सन १९१३ च्या शिंदे दरबाराच्या एका नोंदीनुसार ग्वाल्हेर राज्यात ३५ सरदार प्रथम दर्जाचे तर ६४ सरदार दुसऱ्या श्रेणीचे होते, ज्यांच्यासाठी लिखित सनद नव्हती. तिसऱ्या श्रेणीमध्ये ९ जहागीरदार होते जे मोठ्या जहागीरदारांच्या अखत्यारीत असत आणि त्यांच्या बाबतीत बदल होऊ शकत असे.
शिंदेशाही इतिहासाची साधने या साधनांमधून शिंद्यांच्या जुन्या सरदारांची अनेक नावे समोर येतात, ज्यांनी उत्तर आणि दक्षिण भारतात मोठी कामगिरी बजावली. महादजी शिंदे यांच्या काळात फौजेचे मुख्य सेनापती आणि मुत्सद्दी म्हणून जिवाजी बल्लाळ ऊर्फ जिवबादादा केरकर यांनी काम पाहिले. त्यांच्यासोबत लखबादादा लाड आणि जगन्नाथ राम ऊर्फ जगोबा बापू हे लष्करी मोहिमा गाजवणारे प्रमुख शूर सरदार होते. या जुन्या सरदारांमध्ये रामाजी अनंत दाभोळकर हे उच्चपदस्थ कारभारी होते, तर बाळोबा तात्या पागनीस हे आग्रा भागातील व्यवस्था पाहणारे अनुभवी मुत्सद्दी होते. महादजी शिंदे यांचे एकनिष्ठ साथीदार राणेखान भाई आणि त्यांचे पुत्र साहेबखान हे फौजेचे प्रमुख नेतृत्व करत असत.
उत्तर भारत आणि मेवाड प्रांतात मराठेशाहीचा अंमल राखण्यात अंबूजी इंगळे, विठोजी इंगळे आणि बाळाजी इंगळे या सरदारांचा मोठा वाटा होता. दिल्ली, रेवाडी आणि मेवाती भागात खंडेराव हरी आणि खंडेराव आप्पा हे कारभार पाहत होते. आग्रा व दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी रायाजी पाटील, रामाजी पाटील जाधव आणि लाडोजी देशमुख शितोळे या सरदारांवर होती. याशिवाय वेगवेगळ्या मोहिमांमध्ये शिवाजी विठ्ठल विंचूरकर, माधवराव चंद्रचूड, बाळाजी जांबगावकर, बहिरजी ताकपीर आणि बळवंतराव धोंडदेव हे अधिकारी कार्यरत होते. कोटा येथील प्रसिद्ध दफ्तरचा कारभार लालाजी बल्लाळ गुलगुले हे वकील पाहत असत. शिंदेशाहीच्या बक्षी घराण्यातील शिवबा नाना, बाळाजी राम ऊर्फ बाळाभाऊ बक्षी, नारायणराव बक्षी आणि यशवंतराव भाऊ या शेणवी वीरांनी लष्कराची आणि जामदारखान्याची व्यवस्था सांभाळली. या सर्व सरदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बळावरच महादजी शिंदे यांनी उत्तर भारतात मराठ्यांचे मोठे वैभव उभे केले.
संदर्भ- मराठी रियासत
शिंदेशाही इतिहासाची साधने
दौलतराव शिंदे कार्य आणि कर्तृत्व काळ
अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे




No comments:
Post a Comment