साम्राज्यवादी धूर्त इंग्रज आणि श्रीमंत महादजी शिंदे सरकार
व्यापारासाठी या देशात आलेल्या इंग्रजांनी तराजू बाजूला ठेवून जेव्हा राजकारणात भाग घेतला, तेव्हा त्यांचा हा छुपा साम्राज्यवाद आणि धोका छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखला होता. महाराजांनी इंग्रजांना जशास तसे उत्तर देत त्यांची वखार लुटली, ६ इंग्रज अधिकाऱ्यांना वासोटा किल्ल्यावर कैदेत ठेवले, स्वतःचे आरमार उभारले आणि १६७९ सालच्या सागरी युद्धात इंग्रजांचा निर्णायक पराभव करून इशारा दिला की, खबरदार! गाठ मराठ्यांशी आहे. पण पुढच्याच वर्षी महाराजांचे अकाली निधन झाले आणि इंग्रजांचे नशीब बलवत्तर ठरले.
महाराजांनंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी आणि संपूर्ण मराठेशाहीने पोर्तुगीज, इंग्रज आणि मुघलांना पळता भुई थोडी केली. पुढे याच लढ्याची दूरदृष्टी ठेवून, अठराव्या शतकात श्रीमंत महादजी शिंदे यांनी भारताचे इंग्रजांपासून दीर्घकाळ रक्षण केले.
इंग्रजांचे आधुनिक युद्धतंत्र मोडून काढण्यासाठी महादजींनी मराठ्यांची पारंपरिक युद्धपद्धती बदलून कवायती फौज (आधुनिक पद्धतीने प्रशिक्षित सैन्य) तयार केली. स्वतःचे तोफा, बंदुका आणि दारूगोळा तयार करण्याचे कारखाने सुरू केले. महादजींच्या या तोफखान्याची इंग्रजांमध्ये प्रचंड दहशत होती. याच सुसज्ज प्रबळ घोडदळ आणि तोफखान्याच्या बळावर त्यांनी पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांचा निर्णायक पराभव केला. महादजींनी इंग्रजांना सालबाईचा तह करण्यास भाग पाडले आणि तो पाळला जावा यासाठी दोन इंग्रज अधिकाऱ्यांना ओलीस म्हणून आपल्या ताब्यात ठेवले.
इंग्रजांना त्यांच्याच भाषेत नमवण्याचे हे सर्व श्रेय महादजी शिंदे सरकारचे होते. महादजी एवढ्यावरच थांबणार नव्हते,इंग्रजांचे या देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी थेट त्यांच्या मुख्य केंद्रावर, म्हणजेच बंगालवर आक्रमण करण्याची मोठी मोहीम आखली होती. पण पुन्हा एकदा नशिबाने मराठ्यांचा हात सोडला आणि महादजींचे अकाली निधन झाले. महादजींच्या जाण्याने इंग्रजांना नशिबाने पुन्हा हात दिला आणि भारताचा इतिहास बदलला.

No comments:
Post a Comment