विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 August 2026

अयोध्या, मंदिर व चोरी (मराठयांच्या इतिहासातील एक संदर्भ)

 


अयोध्या, मंदिर व चोरी (मराठयांच्या इतिहासातील एक संदर्भ)

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी आणि तेथील राममंदिर हा कोटयावधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय! सोळाव्या शतकात बाबराच्या काळात तेथील पूर्वीच्या मंदिराच्या जागी मशीद उभारण्यात आली. २०१९ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि कायदेशीर पुराव्यांचा विचार करून संपूर्ण वादावर निकाल दिला. त्यानंतर त्या जागी भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली.
अयोध्येतील त्या काळातील राममंदिराच्या संदर्भात अठराव्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासात एक संदर्भ सापडतो. ही घटना आहे इ.स. १७९० मधील—म्हणजे आजपासून सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीची. हिंगणे दप्तरातील एका पत्रातून याची माहिती मिळते.
हिंगणे दप्तरातील पत्रामध्ये अशी नोंद आढळते की त्या काळात अयोध्येतील श्रीराम मंदिरातील सुवर्णमूर्ती चोरट्यांनी लंपास केली होती. मूर्ती सोन्याची असल्याने अर्थातच अत्यंत मौल्यवान होती. त्याच्या सुरक्षेसाठी नेहमीच मंदिराच्या गाभाऱ्याला दिवसा व रात्री कुलूप लावले जात असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरीच्या घटनेनंतर कुलूप तसेच लावलेले होते; त्यावर छेडछाड झाल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. तसेच मंदिराच्या कोणत्याही भिंतीची तोडफोड झालेली नव्हती. तरीही श्रीरामांची सुवर्णमूर्ती मात्र रहस्यमयरीत्या गायब झाली होती.
अर्थातच त्यावेळी चोरीच्या घटनेनंतर मंदिराच्या पुजाऱ्याने सर्वतोपरी शोध घेतला, परंतु काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतर मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या कारभाऱ्यांची (आजच्या भाषेत विश्वस्तांची) चौकशी करण्यात आली. त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले; परंतु सर्व प्रयत्न करूनही मूर्तीचा व चोराचा मागमूस लागला नाही.
या घटनेची वार्ता अखेरीस महादजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्या वेळी त्यांचा मुक्काम मथुरा येथे होता.ही बातमी ऐकून त्यांना अत्यंत दुःख झाले. त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी केलेल्या चौकशीअंती सुद्धा चोराचा किंवा त्या मूर्तीचा तपास लागला नाही. तेव्हा त्यांनी राम मंदिराच्या व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल मंदिराच्या विश्वस्तावर कारवाई करून त्याला पदावरून दूर केले.
अयोध्येमध्ये अशा प्रकारचे रामाचे मंदिर अठराव्या शतकात कुठे होते वा प्रभू श्रीरामाची मुर्ती कशी होती याचा उल्लेख या कागदपत्रात आढळत नाही. त्याचा अधिक अभ्यास होणे आवश्यक वाटते. तथापि अठराव्या शतकातील मराठयांच्या इतिहासातील हा अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा मजकूर व महादजींनी त्यात घातलेले लक्ष याच उल्लेख वाचकांना जिव्हाळ्याचा वाटेल म्हणून हा लेखन प्रपंच ! धन्यवाद !!
वैधानिक सूचना:अयोध्येमध्ये शेकडो मंदिरे आहेत. त्यामुळे सध्याचे अयोध्येतील " रामलल्ला " मंदिर व या पत्रातील उल्लेखलेले राममंदिर तेच असण्याची अजिबात शक्यता नाही.
संदर्भ: हिंगणे दप्तर खंड ३, पत्र क्रमांक ३६ (१७९०) व ३७ (२९ मे १७९०)
___संकलन व लेखन: प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय)

  देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय) 1795 च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाला मराठ्यांनी गु...