विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 October 2026

सुभेदार मल्हारराव होळकर आणि दाभाडे घराण्याचा चांदवड वेशीवरील एक फारशी शिलालेख !!!

 








सुभेदार मल्हारराव होळकर आणि दाभाडे घराण्याचा चांदवड वेशीवरील एक फारशी शिलालेख !!!

===================================
चांदवड येथील सोमवार पेठ प्रवेशद्वार फारसी शिलालेख .!!!!
उपलब्धी व स्थळ :- हा शिलालेख नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील चांदवड शहरातील सोमवार पेठ येथील एका वेशीवर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला वरील भागात कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून तीन ओळींचा फारसी भाषेत आहे. सदर शिलालेख हा अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे झिजली असून पुसट झाली आहेत तरी छाप घेतला असता त्यावरील मजकूर अथक प्रयत्नांनी वाचता येतो..
====================================
शिलालेखाचे वाचन :-
फारसी पाठ
۱) هولکر شد دیسمکهثانی طهار شد بعهد او در این سوموار
۲) سال تعمیرش ز فصلی گفته شد یکهزار و یکصد و شست و چهار
۳) در عمل مشار الیه باهتمام شاه جی ده بهاریه ترتب شد
देवनागरी पाठ
१) होलकर शुद देसमुके सानी तहार
शुद बहद ओ दर ईं सोमवार
२) साल तामीरश ज फ़सली गुफ्ता शुद
यक हजार ओ यक सद ओ शस्त ओ चाहर
३) दर अमल मुशार इलैह बा एहतमाम
शाहजी दाभाडे बहारिये तरत्तुब शुद
अर्थ :- होळकर घराण्यातील प्रतिष्ठित सरदार मल्हारराव होळकर देशमुख यांच्या कारकिर्दीत, सोमवारी या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करण्यात आले. या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीचे वर्ष फसली ११६४ म्हणजेच सन १७५७ असे काव्यात्मक पद्धतीने शिलालेखात नोंदविण्यात आले आहे. तसेच, वरील उल्लेखित अधिकारी मल्हारराव होळकर यांच्या देखरेखीखाली शाहजी दाभाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यात आले.
==================================
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख मराठा कालखंडातील सार्वजनिक बांधकामे, प्रशासकीय व्यवस्था आणि फारसी भाषेच्या वापराचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा आहे. शिलालेखात मल्हारराव होळकर यांचा उल्लेख आढळत असल्याने त्या काळातील होळकर घराण्याच्या प्रशासनाचा आणि त्यांच्या अधिपत्याखाली झालेल्या बांधकामांचा संदर्भ स्पष्ट होतो. त्याचबरोबर शाहजी दाभाडे यांनी या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांची नोंद असल्यामुळे स्थानिक पातळीवरील सरदार व अधिकाऱ्यांचा सार्वजनिक कामांतील सहभाग अधोरेखित होतो.शिलालेखात फसली ११६४ हे वर्ष नोंदविले असून, तत्कालीन प्रशासनात फसली कालगणनेचा वापर होत असल्याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच दुरुस्तीचे वर्ष काव्यात्मक शैलीत नोंदविण्याची परंपरा त्या काळातील फारसी शिलालेखांच्या साहित्यिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकते. या शिलालेखामुळे मराठा राज्यातील स्थापत्यसंवर्धन, जीर्णोद्धाराची परंपरा, फारसी प्रशासकीय भाषेचा प्रभाव आणि होळकर–दाभाडे यांसारख्या प्रमुख घराण्यांची सार्वजनिक बांधकामांतील भूमिका स्पष्ट होते. त्यामुळे हा शिलालेख अठराव्या शतकातील मराठा इतिहास, स्थापत्यकला आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो.
=====================================
गावाचे नाव : मु.पो चांदवड (सोमवार पेठ ) ता. चांदवड , जि. नाशिक
जी.पी.एस. : २०°३२ '०० .९९ "N-- ७४ °२४ '५१ .०७ "E
शिलालेखाचे स्थान :-सोमवार पेठ गाव वेश मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेला आहे
अक्षरपद्धती : उठाव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : फारसी
प्रयोजन : वेशीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण केल्याची स्मृती जपणे .
मिती / वर्ष : –फसली ११६४
काळ वर्ष : १८ वे शतक –सन १७५७
कारकीर्द :- छत्रपती रामराजे ,
व्यक्तिनाम : मल्हारराव होळकर,शाहजी दाभाडे .
शिलालेख संशोधन:- श्री.अनिल दुधाणे
शिलालेखाचे वाचक : मोहमद तारिक रसूल .
संदर्भ:-ARIE १९६१-६२,
@©माहिती व संकलन :-अनिल किसन दुधाणे .
=====================================
टीप:- सदर शिलालेख संशोधन कार्यात करण सोनी ,श्री अतुल पवार पत्रकार सुनील थोरे,तसेच शिलालेख वाचन कार्यात,डॉ.शैलेंद्र भांडारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

महाराजांची युद्धनीती (Guerrilla Warfare) आणि लष्करी शिस्त

  छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य मोगल, आदिलशाही आणि परकीय सत्तांना केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने आणि अनोख्...