दुष्काळ आणि शिवाजी महाराज...
महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ पडल्याचे अनेक पुरावे इतिहासात आढळतात. शिवपूर्वकाळ ते शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवाईपर्यंत दुष्काळाचे बरेच उल्लेख आढळतात. इ. स. १६२९- ३० मध्ये पूर्ण दख्खन परिसरात मान्सून झालाच नाही. यामुळे लोकांना दुष्काळाचे बरेच परिणाम भोगावे लागले. कित्येकांवर स्थलांतराची बारी आली. पावसाअभावी पडलेल्या दुष्काळामुळे आदिलशाही दिवानाने गावाच्या पाटलाच्या धान्य कोठारीतील निम्मे धान्य सरकार जमा केल्याचे वाचायला मिळते.
शिवकाळात सुद्धा १६६५ सालच्या दरम्यान दुष्काळ पडल्याचे आपल्याला दिसते. पुणे प्रांतातील मांजरी येथे दुष्काळाचा तडाखा बसला असता, त्यावेळी मांजरीचा सरकारी अधिकारी तेथे जातो व शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार तातडीने तेथील रयतेस पाचशे रुपयांची मदत घेऊन जातो.
असाच एक आदेश प्रभावळी प्रांताच्या (आजचा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, शृंगारपूर आणि आसपासचा प्रदेश) अधिकाऱ्याला दिलेला आढळतो. तो खालीलप्रमाणे...
"ज्याच्याकडे शेती करण्याची क्षमता आणि मनुष्यबळ असेल, त्याच्याकडे जर माफक प्रमाणात बैल आणि धान्याचा साठा असेल तर उत्तम होईल, तो शेती करेल.
ज्या माणसाकडे शेती करण्याची क्षमता आणि मनुष्यबळ आहे, पण नांगराला जुंपण्यासाठी बैल आणि पोटासाठी धान्य नाही, त्यामुळे जो अडकून पडून निष्क्रिय झाला असेल, त्याला रोख पैसे हातात देऊन दोन बैलांचे पैसे द्यावेत. त्याने बैल खरेदी करावेत. तसेच पोटासाठी खाण्याकरिता एक-दोन खंडी धान्य द्यावे आणि त्याच्याकडून जितकी शेती करून घेता येईल तितकी शेती करून घ्यावी.
त्याच्याकडून बैलांचे आणि धान्याचे पैसे घेताना कोणताही व्याज न लावता, फक्त मुद्दल रक्कम हळूहळू उसनवार म्हणूनच परत घ्यावी. जोपर्यंत त्याच्यामध्ये ताकद किंवा ऐपत येत नाही, तोपर्यंत त्याच्या क्षमतेनुसार आणि सवलत देत त्याला सांभाळून घ्यावे. आमची एक बाकी राहिलेली थकबाकी माफ केली आहे आणि त्याच्या संपूर्ण कुळाला (कुटुंबाला) ती माफ करण्यात आली आहे."
( मूळ आदेश मोडी भाषेत आहे त्याचे भाषांतर इथे मी केले आहे )
दुष्काळ काळात शेतकऱ्याला जितकी मदत व संरक्षण देता येईल तितके शिवाजी महाराजांनी दिले आहे. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे तोशीस लागणार नाही असा आदेशच शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिला होता.
म्हणूनच शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही बिरुदावली शोभते...
- कपिल जाधव
संदर्भ - १) मराठ्यांच्या इतिहासाची साधने.
२) शिवचरित्र साहित्य
३) कित्ता खंड ५

No comments:
Post a Comment