विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 4 February 2026

बाण + दल = बांदल



 बाण + दल = बांदल

लढवय्या कधीही प्रसिद्धीपराङमुख असतो ह्याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे बांदल सेना..
अंधारात असलेली ही बांदलांची कहाणी ऐकेल तो नमन करेल ह्यात तिळमात्र शंका नाही..
लाखांचा पोशिंदा जगवणार्या ह्या इतिहासकर्त्या जमातीला अंधारात ठेवुन इतिहासकारांनी काय साधलं माहित नाही पण सुर्य झाकल्याने लपतो काय ? किंवा खळाळता झरा कोणत्या शिळेनं वहायचा थांबतो काय ? तद्वतच ही पराक्रमाची रक्तरंजित कहाणी न सांगितल्यानं लपुन राहणारच नाही.
★ बांदल सेना ★
● "भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ॥
मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ॥"
अर्थ- "हिरडस मावळामधे लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत,प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत."
बांदलांच वरिल वर्णन दस्तुरखुद्द शंभुछत्रपतींनी केलंय...
● "जैसे अंगद हनुमंत श्रीरामाला तैसे 'जेधे' 'बांदल' शिवाजीला"
असं बांदलांचं वर्णन जेधे शकावलीत आलेलं आहे...
या नावाचा संधी विग्रह बाण+दल= बांदल असा केला जातो.. म्हणजे तिरकामठ्याने(धनुष्यबाण) लढणारी सेना.
- कृष्णाजी बांदल हिरडस मावळाचे म्हणजे आळंद ते उंबर्डे या क्षेत्राचे स्वतंत्र वतनदार..
- सन 1625 मधे बांदलांनी निजामाचा वजिर मलिक अंबरास हरवुन केंजळगड जिंकला..
- 1636 मधे दादोजी कोंडदेव(आदिलशाही,विजापुर सल्तनत) याने कृष्णाजीं बांदल यांजवर हल्ला केला व पराभुत झाला...
- पराभवानंतर दादोजीने कृष्णाजींना मसलतीस बोलावुन कपटाने कैद केले व खुन केला..
- कृष्णाजींच्या मृत्युनंतर पत्नी दिपाऊ व पुत्र बाजी बांदल आपल्या बांदल सेनेसमावेत स्वराज्यास सामिल झाले..
- बांदल सेनेने स्वराज्यासाठी पुढील लढायांत योगदान दिल्याचे संदर्भ मिळतात...
▶ प्रतापगड युद्ध ( अफजलखान प्रकरण)
▶ पन्हाळगड वेढा ( सिद्दी जौहर प्रकरण)
▶ दक्षिण दिग्विजय मोहीम
- पैकी प्रतापगड युद्धात कान्होजीराव जेध्यांसमावेत बांदल सेनेने महत्पराक्रम गाजविला यानंतर शिवरायांनी रुस्तम-ए-जम्याला हरवुन राजापुर व विशाळगड हस्तगत केला विशाळगडाच्या संरक्षणासाठी महाराजांनी बांदल सेनेला तैनात केले..
- तसंच पन्हाळगडच्या पायथ्याला पडलेल्या सिद्धीच्या फौजेला गुंगारा देऊन विशाळगडाकडे जाताना वाटेत गजापुरच्या खिंडीत अवघ्या तिनशे बांदल मावळ्यांनी सिद्दी मसुदच्या फौजेला रोखुन धरुन लढता लढता विरमरण पत्करले...
- यानंतर छत्रपतींनी राजगडदरबारी तलवारीच्या पहिल्या पानाचा मान रायजी नाईक बांदल यांना बहाल केला..
- बांदल हे जन्मजात योद्धे होत, बांदलांच्या सेनेनं गजापुरच्या खिंडीत गाजवलेला पराक्रम अद्वितीयच आहे पण आम्ही कथा कादंबर्या वाचुन खिंड फक्त बाजीप्रभुंनीच लढवली असा समज करुन बसलो आहोत. बाजीप्रभूंच्या पराक्रमाला वंदनच आहे पण याच लढाईत शंभुसिंह जाधव आणि तिनशे बांदलदेखिल प्राणपणानं लढले होते,ज्या प्रमाणात बाजीप्रभुंचा उल्लेख होतो त्या प्रमाणात आजही बांदल सेनेचा किंवा शंभुसिंह जाधवरावांचा साधा उल्लेख होत नाही ही मोठी खंतच...
- दक्षिण दिग्विजय मोहीमेत रायजी नाईक बांदल छत्रपतिंसमावेत होते,मोगली सेनेने शिरुर-शिक्रापुर येथे केलेल्या लुटीमुळे रायजींनी विडा उचलुन मोगली फौजेवर हल्ला केला...
- या शिक्रापुरच्या घनघोर रणसंग्रामात रायजी विरगतीला प्राप्त झाले...
- रायजीचे पुत्र सुभानजी यांना छत्रपतींनी मानाची तलवार बहाल केली...
तर अशी बांदल या नावाची ज्ञात गाथा _/\_
" एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या 'पक्षपाती' इतिहासकारांनी घेतली आहे त्यामुळे बांदल सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे...
पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही..."
असो
- छत्रपतिंशी एकनिष्ठ असणार्या बांदल देशमुख घराण्यातील विरांच्या समाध्या पिसावरे ता.भोर,पुणे या गावी असुन इतिहासप्रेमींनी थोडी वाट वाकडी करुन आवर्जुन भेट देण्यासारख्याच आहेत...
- या शुर परंतु अपरिचीत योद्ध्यांना वंदन _/\_
बांदलांनी शंभुराजांच्या काळातदेखील स्वराज्याशी इमान ठेवले होते
संदर्भ-
1- स्वराज्याचे शुर सेनानी:दामोदर मगदुम
2- जेधे शकावली:अ.रा.कुलकर्णी
3- शिवभारत:संपादक स.म.दिवेकर
4- बांदल तकरीर:संपादक ग.ह.खरे,ना.के.जोशीँ

"अंगद-हनुमंत जैसे रामाला, जेधे-बांदल तैसे शिवाजीला"

 





"अंगद-हनुमंत जैसे रामाला, जेधे-बांदल तैसे शिवाजीला"

लेखन :वैभव बांदल देशमुख (Vaibhav Bandal)
आताचा भोर, वेल्हे, वाई तालुके जे आधीचे हिरडस मावळ खोरे, बांदल देशमुख इथले देशमुख होते छत्रपती शिवाजी महाराजांचे लाल महालात बालपण जात असताना राजमाता जिजाऊ या पुण्याचा कारभार पाहत होत्या, तेव्हा दादोजी कोंडदेव यांनी बारा मावळचे बारा देशमुख एक करण्यास मांडलीक होण्यास आदेश दिले तेव्हा हिरडस मावळच्या कृष्णाजीराजे नाईक-बांदल देशमुखांनी त्यास विरोध केला पुढे दादोजी कोंडदेव यांनी कृष्णाजी नाईक- बांदल यास सल्लामसलतीस बोलावून कपटाने मारले,आणि बांदल देशमुख ही जिजाऊ माँसाहेब याच्या परगण्यातील मांडलिक झाले .
आता मूळ प्रश्नाकडे येऊयात प्रतापगडावरील अफजलखान वधावेळी बांदल देशमुख,जेधे देशमुख महाराजांसोबत होते जनीचा टेंभा हा बांदलांनीच राखला होता आजही प्रतापगडी बांदल राहतात ते अगदी तेव्हापासूनच जावळी परगण्यात स्थायिक झालेले आहेत,अफजल खानाचा वध करून कृष्णामाय चा घाट पवित्र झाला अन महाराजांनी पन्हाळगडी स्वारी केली, आदिलशाहीस लागलेला जोराचा दणका होता हा , आदिलशाह च्या बेगमने सिद्दीस पन्हाळगडी धाडले , गडावरून बाहेर पडण्यासाठी महाराज प्रयत्न करू लागले, नेताजी पालकर बाहेरून वेढा फोडण्याचे प्रयत्न कुचकामी ठरले यात महाराजांनी नामी युक्ती लडवली आणि शिवा काशीद यांनी ती जबाबदारी स्वीकारून स्वतः महाराजांच्या वेशात वीरगती पत्करली, बाजीप्रभू देशपांडे हे बांदल देशमुख यांचे दिवाण होते, बाजी बांदल रायाजी बांदल सोबत ६०० बांदलांच्या तुकडीसोबत महाराज पन्हाळगडावरून निघाले यात बाजी बांदल रायाजी बांदल आघाडीवर होते.
गजापूरच्या घोडखिंडीत सिद्धीस जागीच थोपवण्या बाजी,रायाजी ,बाजीप्रभू फुलाजीप्रभू,शंभुसिह जाधव, पार्टे यांनी महाराजास विशाळगडाकडे कूच करण्या सांगितले ३०० बांदल सेनेसोबत महाराज विशाळगडाच्या दिशेने दौडू लागले , आणि खिंडीत लढणारे ३०० बांदलांनी बाजीप्रभू देशपांडे सहित पराक्रमाची शर्थ केली बांदलांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली.
विरगतीस प्राप्त झालेल्या बांदल देशमुखांच्या पिसावरे या गावी जाऊन महाराजांनी भेट दिली सोन्याची कडी दिली, त्यासोबत स्वराज्याच्या मनाच्या पहिल्या तलवारीचा मान बांदल देशमुखांना दिला.
शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्या प्रसंगातही कोयजी बांदल महाराजांसोबत होते,महाराजांच्या निकटवर्तीय असणारे जेधे-बांदल देशमुख ही मराठा घराणी,काही इतिहासकारांनी जाणीवपूर्वक लपवली गेली,फक्त बाजीप्रभू देशपांडे याचाच इतिहास पिढीला शिकवला गेला, आमच्या तकरीरी काही इतिहासकारांनी गोड गोड बोलून नेल्या त्या माघारी दिल्याचं नाहीत.
बांदलांच्या तीन पिढ्यांनी स्वराज्यावरून जीव ओवाळले त्याच घराण्याचा एवढा मोठा इतिहास २ ओळीत लिहला आणि जगासमोर आणला याचीच खंत वरील छायाचित्रात बांदल तकरीरी आणि बाजीप्रभू देशपांडे याचा उल्लेख असलेले पत्र आहे

निंबाळकर घराण्याची माहिती

 


निंबाळकर घराण्याची माहिती

फलटण हे फक्त चौऱ्याऐंशी गावांचे संस्थान. आकाराने आटोपशीर; परंतु त्याचा मान आणि दबदबा मोठा होता. फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्याची सत्ता सातशे वर्षे निरंकुशपणे होती. त्या राजघराण्याने एकूण सत्तावीस पिढ्यांच्या राज्यकर्त्यांची वैभवशाली कारकीर्द घडवली. प्रजाप्रिय घराणे म्हणून त्यांची ओळख होती.
नाईक-निंबाळकर घराण्याचे मूळ इतिहासात नवव्या शतकात सापडते. तेव्हा मध्य भारतातील धार येथे परमार वंशाच्या राजपूत राजाने त्याचे राज्य स्थापन केले होते. नंतरच्या काळात दिल्लीच्या सुलतानांनी सतत हल्ले करून त्यांना राज्य चालवणे मुश्किल करून टाकले. त्या हल्ल्यांना कंटाळून काही राजपूत घराणी मध्य प्रांतातून दक्षिण भारतात आली, त्यांपैकी नाईक-निंबाळकर हे घराणे होय. त्यावेळी ते ‘पवार’ होते.
त्यांना ‘निंबाळकर’ हे आडनाव मिळाले त्याची कहाणी आहे. इसवी सन 1270 च्या सुमारास त्या घराण्याचा पुरुष निंबराज परमार याने फलटणजवळच्या शंभू महादेवाच्या जंगलात मुक्काम ठोकला. ‘निंबराज’ या नावावरून त्या जंगलाला आणि त्या परिसराला लोक ‘निंबळक’ असे म्हणू लागले. त्यावरून घराण्याला आडनाव मिळाले ‘निंबाळकर’ असे. निंबराजाने त्याची अकरा वर्षांची कारकीर्द चांगल्या पद्धतीने घडवली. त्याने फलटण संस्थानाची स्थापना 1284 मध्ये केली. तो सुलतान महंमद तुघलक याच्या पदरी होता. निंबराजाचा पराक्रमी मुलगा पोडखल जगदेवराव. तो युद्धात मारला गेला. महंमद तुघलकाने त्याच्या मुलाला म्हणजे दुसऱ्या निंबराजाला सरदारकीची वस्त्रे, फलटणची जहागिरी; तसेच, नाईक हा सन्मानाचा किताब बहाल केला. त्याला सोन्याचा तोडा दिलाच, पण मस्तकावर ‘मोरचेल’ वापरण्याचा हक्क देऊन एक प्रकारे ‘राजे’ म्हणून त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली.
नाईक-निंबाळकर घराण्याचा शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी पिढीजात स्नेहबंध आणि नातेसंबंध गहिरा आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वजांना नाईक-निंबाळकर घराण्याने सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भोसले घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या संबंधातील हकिगत अशी – 1570 ते 1630 या काळात जगपाळराव ऊर्फ वणगोजी दुसरे हे फलटणच्या गादीचे अधिपती होते. हिंगणी बेरडीचे भोसले सरदार शंभू महादेवाच्या यात्रेला दरवर्षी चैत्र महिन्यात येत तेव्हा ते फलटणला नाईक-निंबाळकर यांच्याकडे मुक्काम करत असत. एकदा काही कामाच्या निमित्ताने बाबाजी भोसले फलटणला जगपाळराव यांच्याकडे आले असताना, त्यांनी सोबत मालोजी आणि विठोजी या त्यांच्या दोन्ही पुत्रांना आणले. ते दोघेही तडफेचे जवान मुलगे होते. जगपाळरावांनी त्या दोघांना बाराशे होनांची आसामी देऊन स्वत:च्या पदरी ठेवले. त्या दोघांची फलटण संस्थानाचा विस्तार वाढवण्याच्या कामी जगपाळरावांना मदत झाली. दोन्ही घराण्यांचे मैत्र असे वाढीस लागले.
नंतरच्या काळात कोल्हापूरजवळील लढाईत जेव्हा विजापूरचा आदिलशहा जगपाळरावांच्या सैन्यावर चालून आला, तेव्हा प्राणांची शर्थ करून मालोजी आणि विठोजी भोसले यांनी निंबाळकरांचा मुलख राखला, जगपाळरावांची बाजू सांभाळली. त्या लढाईत भोसले बंधूंच्या पराक्रमाची कीर्ती सर्वदूर पसरली. ती ऐकून निजामशहाने भोसले यांना त्यांची जप्त वतने परत केली आणि ‘राजे’ हा किताब दिला. भोसले घराणे पुन्हा निजामशाहीत रुजू झाले. भोसले आणि नाईक-निंबाळकर या दोन्ही घराण्यांतील स्नेहसंबंधांची परिणती परस्परांशी नातेसंबंध जोडण्यात झाली. जगपाळरावांच्या बहिणीशी मालोजीरावांचा विवाह झाला ! त्या विवाहाचा परिणाम म्हणजे नाईक-निंबाळकर यांच्यासारख्या मातब्बर राजांचे पाठबळ मिळाल्यामुळे शहाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक कार्याला मोठे यश मिळू शकले. या दोन्ही घराण्यांतील जिव्हाळा इतका होता, की शहाजीराजे यांच्या विवाहाची बोलणी जगपाळरावांच्या मध्यस्थीने पार पडली. जगपाळराव हे त्या काळातील मोठे मातब्बर मराठा सरदार होते. त्यांनी लखुजी जाधव यांच्याकडे त्यांच्या मुलींसाठी शब्द टाकला. जगपाळरावांचा शब्द प्रमाण मानून लखुजी जाधव यांनी त्यांची कन्या जिजाबाई शहाजीराजे यांना दिली. नंतरच्या काळात- 1631 च्या सुमारास जगपाळरावांच्या नंतर फलटणच्या गादीवर आलेले मुधोजीराजे दुसरे आणि विजापूरचा आदिलशहा यांचे संबंध बिघडले. आदिलशहाने मुधोजीराजे यांना साताऱ्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवले. त्यावेळी मुधोजीराजांनी त्यांच्या धाकट्या पत्नीला बजाजी आणि जिऊबाई या मुलांसह साताऱ्यात स्वतःजवळ बोलावून घेतले. त्यांना त्यांच्या जीवाला दगाफटका होईल अशी भीती वाटली. त्यांना अशी कैदेत दहाएक वर्षे गुजरावी लागली. दरम्यानच्या काळात, शहाजीराजे आदिलशहाकडे रुजू झाले होते. नाईक-निंबाळकर आणि भोसले या घराण्यांतील ऋणानुबंधांना जागून शहाजीराजे यांनी आदिलशहाकडे शब्द टाकला आणि मुधाजीराजे यांची सुटका करवली. या घटनेमुळे नाईक-निंबाळकर व भोसले या घराण्यांचे मैत्रीसंबंध अधिक घट्ट झाले. मुधोजीराजे यांनी त्यांची कन्या जिऊबाई शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजी राजे यांना 1640 साली दिली. जिऊबाई हीच ‘सईबाई’. शहाजीराजे यांची आई आणि सून दोघी नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातून आलेल्या होत्या.
शिवाजीराजांना मुधोजीराजांची मदत आहे याची चाहूल आदिलशहाला लागल्यावर मुधोजीराजे यांच्याशी आदिलशहाचे संबंध पुन्हा बिघडले. मुधोजीराजे यांची इच्छा फलटणचे आधिपत्य बजाजी यांना द्यावे अशी होती. परंतु त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांना- म्हणजे साबाजी आणि जगदेवराव यांना – पित्याचा हा निर्णय मान्य नव्हता. मुधोजीरावांनी बजाजीला अधिपती करावे यासाठी आदिलशहाचे मन वळवले. परंतु त्यामुळे क्रुद्ध होऊन त्यांच्या दोन्ही मुलांनी आदिलशहाचीच मदत घेऊन मुधोजीरावांशी लढाई केली. ती लढाई शिरवळच्या जवळ असलेल्या भोळी या गावापाशी झाली, तीत मुधोजीराव एका वडाच्या झाडाखाली मारले गेले. प्रत्यक्ष पोटच्या मुलाच्या हातून तेथे झालेल्या हत्येमुळे या वृक्षाला ‘बापमारीचा वड’ असे नाव पडले !
बजाजी निंबाळकर यांची पुढील कहाणी हृदयस्पर्शी आहे. त्या लढाईत बजाजी यांना कैद करून विजापुरात नेले गेले. विजापूर दरबाराकडून तेथे त्यांना ठार मारण्याचा आदेश आला. परंतु माने-घाटगे-घोरपडे आणि काळजी शिंदे या सरदारांनी आदिलशहाला विनंती करून ती आज्ञा मागे घेण्यास लावली. बजाजी यांना त्या जीवदानाच्या मोबदल्यात आदिलशहाच्या मुलीशी विवाह करावा लागला, एवढेच नव्हे तर त्यांना मुसलमान धर्मही स्वीकारण्यास भाग पाडले गेले. नंतर, बेगमेचे फर्मान घेऊन बजाजी जेव्हा फलटणला आले, तेव्हा जिजाबार्इंनी शिंगणापूरमधील शंभू महादेवाच्या मंदिरात धर्मविधी करून बजाजी यांना परत हिंदू धर्मात आणले. एवढेच नाही, तर शिवाजी राजांनी त्यांची कन्या सकुबाई हिचा विवाह बजाजी यांच्या मोठ्या महादजी नावाच्या मुलाशी करून दिला. त्या विवाहामुळे दोन्ही घराणी नातेसंबंधांच्या रूपात अधिक जवळ आली. बजाजी यांचे निधन 1674 साली झाले. त्यानंतर बजाजी यांचा तिसरा मुलगा वनगोजी 1676 -1693, त्यानंतर त्यांचा पुतण्या जानोजी 1693-1748 आणि त्यानंतर जानोजी यांचा पुत्र मुधोजी (तिसरे) 1748-1765 यांनी फलटण संस्थानाधिपती म्हणून राज्य केले.
मुधोजी तिसरे यांच्या पत्नी सगुणाबाई दयाळू आणि परोपकारी होत्या. त्यांनी मुधोजी (तिसरे) यांच्या निधनानंतर (1765) नंतर काही काळ राज्यकारभार केला. परंतु माधवराव पेशवे यांच्या सगुणाबार्इंवरील नाराजीमुळे त्यांनी सगुणाबार्इंची जहागिरी जप्त करून फलटणचे आधिपत्य निंबाळकरांच्या दूरच्या नात्यातील मुलाला दिले. सगुणाबार्इंनी मालोजी तिसरे यांना दत्तक 1774 मध्ये घेतले. मालोजी तिसरे यांच्या निधनानंतर त्यांचे दत्तक पुत्र जानराव हे गादीवर आले, परंतु ते अज्ञान होते. राणी सगुणाबार्इंनी त्यांच्या नावाने राज्यकारभार 1791 पर्यंत समर्थपणे चालवला. त्या धर्मपरायण होत्या व त्यांच्या ठायी राज्यकुशलताही होती. त्यांनीच फलटण येथील ग्रामदैवत श्रीराम मंदिर बांधले. त्यासाठी बनारसमधून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती तयार करवून घेतल्या. सगुणा राणीसाहेब यांचे नाव फलटणमध्ये कृतज्ञतेने घेतले जाते. राणी सगुणाबाई 1791 साली निवर्तल्या. त्यानंतर जानराव नाईक यांनी 1825 पर्यंत राज्यकारभार केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी साहेबजीबाई यांनी कारभार सुरू केला. साहेबजीबाई यांनी त्यांच्या पुतण्याच्या मुलाला म्हणजे महादजी यांना दत्तक घेतले. दत्तक प्रसंगी महादजी यांचे नाव मुधोजी असे ठेवले. तो अज्ञान असल्याने साहेबजीबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थानात चांगल्या पद्धतीने कामकाज केले. त्यांचा मृत्यू 1853 मध्ये झाला. तोपर्यंत 1818 मध्येच मराठेशाहीचा अस्त होऊन ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली होती. 1853 नंतर 1860 पर्यंत ब्रिटिशांनीच फलटण संस्थानाचा कारभार चालवला.

मराठा लाइट इन्फंट्रीचा गौरवशाली वारसा

 


मराठा लाइट इन्फंट्रीचा गौरवशाली वारसा

भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट. ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सिपॉयच्या रूपात 'मराठा'ची स्थापना झाली. त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजेच जंगी पलटण आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या. या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला. ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार हेच मराठे होते. दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सँग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते. त्यांना सोडविण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युतवेगाने तब्बल ४० किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाइट (विद्युतवेगाने काम करणारी) बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचवेळी सँग्रो नदीच्या किनाऱ्यावर सॅपर्स पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दाखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मराठा रेजिमेंटचे नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे (मरणोत्तर) या दोघांनाही मिळाला. घाडगे यांनी सिटा डे कॅस्टेलो येथे जर्मन मशिनगनधारी सैनिकांना कंठस्नान घातले. मात्र, छातीवर लागलेल्या गोळीमुळे त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. तर शिपाई नामदेव जाधव यांनी एकट्यानेच सेनिओ नदीच्या तीरावर पराक्रम गाजवत जर्मनीची दोन ठाणी ताब्यात घेतली.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मराठा बटालियनने ब्रह्मदेशातही मोठा पराक्रम गाजवला. त्यांचा पराक्रम पाहून ब्रिटिशही थक्क झाले. ज्या मराठ्यांनी आपल्याला विजयश्री मिळवून दिली, त्यांचा पराक्रम पाहता आणखी अधिक काळ आपल्याला भारतावर सत्ता गाजवणे शक्य नाही, हे त्यांना कळून चुकले आणि त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यलढ्याशी मराठा बटालियनचा थेट संबंध नसला, तरी त्यांचे युद्धकौशल्य आपल्यावर भारी पडेल, याची जाणीव ब्रिटिशांना होणे यात मराठा बटालियनचे मोठे योगदान आहे. उत्तर व दक्षिण कोरिया युद्धातही मराठा बटालियनचे मोठे योगदान होते.
स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्ती संग्रामावेळी आदेश मिळताच बेळगावमधील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे सैनिक बेळगाव, वेंगुर्लामागे गोव्यात पायी गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करत माघारी जाण्यास भाग पाडले. तसाच पराक्रम त्यांनी दमण दीव येथेही गाजवला. १९६२च्या युद्धात सिक्कीममध्ये मराठाची तुकडी आघाडीवर होती. १९६५ च्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाचीच होती. पुण्यात ज्यांच्या नावाने साळुंके विहार हा परिसर ओळखला जातो, त्या पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी महावीरचक्र मिळाले होते. हडपसरमधील लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला ठक्कर विहार हा परिसर ज्यांच्या नावे ओळखला जातो, त्यांनी मिझोराम नागालँडमध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना अशोकचक्राने सन्मानित करण्यात आले होते. १९७१ च्या युद्धात तत्कालिन पूर्व पाकिस्तानात मराठा लाइटच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले. मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाकाच्या लढाईसाठी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या २२ मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला ढाक्यावर कब्जा केला. या विजयाचे श्रेय या तुकडीलाच जाते. त्याचवेळी लाहोरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठाणे मराठाच्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले. या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साळुंके यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.
काश्मीर असो वा अरूणाचल, राजस्थान असो वा सियाचिन अशी एकही सीमा नाही, जिथे मराठाची तुकडी तैनात नाही. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेतही मराठाची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे. गरिबी, मागासलेपणा, भ्रष्टाचार याचा जवळून अनुभव घेतलेले आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतात, याची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे.
भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही मराठा रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. सेकंड पॅराच्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. सर्जिकल स्ट्राइकसारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठाच्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल वाय. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली. अलिकडे २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरून दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारी पहिली व्यक्ती ही मराठाचेच कर्नल होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना “बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…!!” अशी जबरदस्त आहे…
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ही एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, एका महापुरूषाच्या नावाने आहे…
🚩🚩🚩🚩
असा हा मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी, आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे मरठ्यांचे दैवत आहे. बोल श्री शिवाजी महाराज की जय ही आमची युद्धघोषणा आहे. आपण शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये, हेच मराठा रेजिमेंटमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येकाला शिकवले जाते. बाकी चपळता, उत्तम शरीरसंपदा, काटकपणा, गनिमी कावा आणि युद्धकौशल्य त्यांच्याकडे असतेच, त्याच्या बळावरच मराठा लाइट इन्फंट्री आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे, आणि यापुढेही राहील.
🚩🚩🚩🚩🚩

देवगिरीचे यादव आणि अलाउद्दीन खिलजी यांचा इतिहास

 देवगिरीचे यादव आणि अलाउद्दीन खिलजी यांचा इतिहास 

अलाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र तर लुटून नेलाच, पण महाराष्ट्राची होऊ घातलेली सूनही पळवून नेली. संत ज्ञानेश्वर जेव्हा पैठणमध्ये होते, साधारणतः त्याच काळात अलाउद्दीन खिलजी तिथपासून 65 किलोमीटर अंतरावर स्वारी करून आला होता.

इतिहासाच्या या विस्मृतीत गेलेल्या महत्त्वाच्या कालखंडाविषयी लिहीत आहेत इतिहासाच्या अभ्यासक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन व्यवस्थापन विभागाच्या माजी संचालक डॉ. दुलारी कुरेशी.

देवगिरीचे यादव आणि अलाउद्दीन खिलजी यांचा इतिहास म्हणजे एक अत्यंत रोमांचक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे.

यादव राजघराण्याचं खरं नाव 'सेऊन' असं होतं. सेऊन घराणं हे मूळ द्वारावतीमधलं (द्वारकामधलं). त्यांनी आपली राजधानी चंद्रादित्यापूर म्हणजे आताच्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः नवव्या शतकात स्थापन केली.

राजा रामचंद्र हे 1271 मध्ये राजगादीवर बसले. पूर्वजांच्या परंपरेनुसार त्यांनीही शेजारच्या वाघेला, काकातिया, होयसाला या राज्यांशी लढाईचं सत्र सुरू ठेवलं. अनेक युद्धं जिंकून खूप संपत्ती जमा केली.

लढाई, युद्ध आणि त्यात मिळवलेला विजय असं जीवनचक्र सुरू होतं. त्यांच्या या घोडदौडीला दृष्ट लागली. म्हणूनच की काय अलाउद्दीन खिलजी हा दिल्लीहून इतक्या लांब देवगिरीला येऊन धडकला.

अलाउद्दीन हा भयंकर महत्त्वाकांक्षी होता. तो दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन फिरोझ याचा जावई होता. त्याला सुलतान बनण्याची घाई झाली होती. त्याने जलालउद्दीनला खोटं सांगून 8000 अत्यंत विश्वासू सेनापती आणि सैन्याला सोबत घेऊन देवगिरीच्या दिशेनं गुप्तपणे कूच केली. हा प्रसंग आहे 1296चा

हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा रामचंद्र यांचं पूर्ण लक्ष दक्षिणेकडील राज्यांवर हल्ला करण्याकडे होतं. त्यांना उत्तरेकडील राजकीय स्थितीची कल्पना नव्हती. हल्ल्याच्या वेळी रामचंद्र (आताच्या औरंगाबाद जिल्ह्यातील) लासूरजवळ होते.

या अकस्मात आक्रमणामुळे रामचंद्र पूर्णपणे गोंधळून गेले. कसाबसा जीव वाचवत त्यांनी देवगिरी किल्ल्यात आसरा घेतला. त्याच वेळी अलाउद्दीननं अफवा पसरवली की अजून वीस हजारांचं सैन्य उत्तरेकडून मदतीला येत आहे.

शेवटी रामचंद्र यांनी नाईलाजानं अलाउद्दीनसोबत तह केला. हा तह रामचंद्र यांना खूप महागात पडला. अलाउद्दीनला 6 मण सोनं, 7 मण मोती, 2 मण हिरे, माणिक, पाचूसह मौल्यवान खडे, 1000 मण चांदी आणि 4000 गज रेशमी कापड मिळालं.

पण नंतर या धनराशीत अधिकची भर पडणार होती. असं म्हणतात की, इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती घेऊन जाणारा तो एकमेव सुभेदार होता.

अलाउद्दीन हा सारा ऐवज घेऊन जाण्याच्या तयारीत असताना रामचंद्र यादवचा पुत्र संकरा हा एका मोहिमेवरून परतला होता. त्याच्याजवळ या मोहिमेत मिळालेला अमाप खजिना होता. अलाउद्दीनच्या हल्ल्याचा सारा वृत्तांत त्याला कळला, तेव्हा त्याला भयंकर राग आला.

तो अलाउद्दीनला धडा शिकवायला निघाला. रामचंद्रानं त्याला बरंच समजावलं, पण त्याचा उतावीळपणा नडला. अलाउद्दीननं त्याचा पराभव केला आणि मोहिमेवरून आणलेली संपत्तीही लुटण्यात आली.

सोनं, चांदी, मौल्यवान खडे, हत्ती, घोडे यांव्यतिरिक्त इलिचपूर (आताच्या विदर्भातील अचलपूर) नावाच्या जिल्ह्याचा वार्षिक महसूलही त्याला मिळाला.

अलाउद्दीनला इतक्या मोठ्या प्रमाणावर गडगंज धनराशी मिळाल्यानं तो अधिकच मस्तीत आला. त्याला सुलतानपणाचे वेध लागले. त्यानं कपटानं सुलतान जलालउद्दीनचा काटा काढला आणि 19 जुलै 1296 ला तो दिल्लीच्या राजगादीवर बसला.

सुलतानपदावर असताना अलाउद्दीनला राज्याचा विस्तार करण्याचं सुचलं. त्याची सर्वांत पहिली शिकार होती गुजरातच्या श्रीमंत प्रांताचे रखवालदार राजे करणराय. संपत्तीची हाव असल्यानं अलाउद्दीननं गुजरात प्रांताची निवड केली. अलाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना या मोहिमेवर पाठवलं.

1297ला झालेल्या हल्ल्यात करणराय यांचा मोठा पराभव झाला आणि त्यांना आपल्या मुलीला- राजकन्या देबाला देवीला- घेऊन पळ काढावा लागला. देवगिरीचा राजा रामचंद्र यादव याच्या आश्रयाला ते आले.

अलाउद्दीनचा सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांनी संपत्तीची तर लूट केलीच, सोबत राजा करणराय यांची राणी कमला देवी हिलाही बंदी केलं. कमला देवीला दिल्लीत आणण्यात आलं. तिची रवानगी अलाउद्दीनच्या जनानखान्यात करण्यात आली. अलाउद्दीन तिच्या सौंदर्यावर इतका भाळला की त्यानं तिच्याशी लग्न केलं.

इतिहासकारांनी लिहिलं आहे की अलाउद्दीन हा कमला देवीवर खूप प्रेम करायचा. म्हणूनच जेव्हा कमला देवीला आपल्या मुलीची आठवण आली, तेव्हा अलाउद्दीननं ताबडतोब उलूग खान आणि मलिक कफूर यांना देबाला देवीला कुठूनही शोधून आणायला सांगितलं.

तोपर्यंत इकडे राजा करणराय यांनी बगलानाच्या (आताच्या गुजरातमधील) छोट्याशा प्रदेशावर आपलं नवं राज्य स्थापन केलं होतं. आणि यादव राजकुमार संकरा देबिला देवीच्या प्रेमात पडला होता.

त्यानं आपल्या वडिलांकडून लग्नाची परवानगीही मागितली होती. परंतु राजपूत मुलीशी लग्न करायला रामचंद्रानं नकार दिला. शेवटी संकरानं राजा करणरायची संमती घेऊन आपला भाऊ भीमदेव याला देबाला देवीला आणण्यासाठी पाठवलं.

त्याच दरम्यान उलूग खान आणि मलिक कफूर राजकुमारीच्या शोधात सगळीकडे फिरत होते. सर्व शोध घेऊन झाला. राजकुमारी काही मिळत नव्हती.

उलूग खान तर फारच हताश झाला. देबाला देवीला न पकडता अलाउद्दीनच्या सामोरे जाण्याची कल्पना त्याला करवत नव्हती. अलाउद्दीनच्या क्रूर स्वभावाची कल्पना त्याला होती.

उलूग खान आणि त्याचं सैन्य वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळ होते. तेव्हा त्यांना दूरवरून दक्षिणेच्या दिशेने एक सैन्याची तुकडी येताना दिसली. त्यांना वाटलं की हे राजा रामचंद्र आणि करणराय यांचंच सैन्य असून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे.

पण हे सैन्य देबाला देवीला देवगिरी किल्ल्यात लग्नासाठी नेत होतं.

दोन्ही सैन्य समोरासमोर आलं. वेरूळ लेण्यांच्या परिसरात लढाईला सुरुवात झाली. देबाला देवी हे सगळं दूरवरून पाहत होती. त्याचवेळी देबाला देवीच्या घोड्याच्या पायाला बाण लागला. त्यामुळं दासींनी आरडाओरड केली. उलूग खानच्या सैन्याचं लक्ष तिकडं गेलं.

देबाला देवीला पाहून उलूग खानचा आनंद गगनात मावेना. वेळ न दवडता उलूग खान देबाला देवीला घेऊन दिल्लीच्या दिशेनं निघाला.

देबाला देवीला अलाउद्दीनच्या दरबारात हजर करण्यात आलं. कमला देवीला आपल्या मुलीला पाहून अत्यानंद झाला. अलाउद्दीनचा मुलगा खिजर खान यानं देबाला देवीला बघितल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. अलाउद्दीननं खिजरचं लग्न देबालाशी लावून दिलं.

या घटनेवर प्रख्यात कवी अमीर खुसरो यांनी पूर्ण कविताच लिहली आहे. पण आता ही कविता किती काल्पनिक आहे आणि किती वास्तववादी आहे हे सांगता येणार नाही.

अलाउद्दीनची सुरुवातीची वर्षं यशस्वी होती, पण अखेरच्या दिवसांमध्ये अगदी उलट पाहायला मिळतं. अखेरचे दिवस अतिशय दुःखात गेल्याचं इतिहासकार सांगतात. त्याला त्याची बायको आणि मुलं विचारत नव्हती. तो पूर्णपणे मलिक कफूरच्या आहारी गेला होता आणि आजारपणातच त्याचा अंत झाला.

(इतिहासकार मोहम्मद कासीम फरिश्ता यांनी आपल्या 'तारीखे-फरिश्ता'या पुस्तकामध्ये अंत्यत सविस्तरपणे या कालखंडाचं वर्णन केलं आहे. या पुस्तकात अलाउद्दीन आणि रामचंद्र यादव यांच्याशी संबधित प्रसंगांचं जे वर्णन आहे, ते इतर कोणत्याही पुस्तकात सापडत नाही. श्रीनिवास रित्ती यांचं 'द सेऊनास (द यादव ऑफ देवगिरी)' आणि ए. श्रीवास्तव यांचं 'द हिस्ट्री ऑफ इंडिया' या पुस्तकांत यादव आणि अलाउद्दीन यांची माहिती वाचायला मिळते.)


रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...