फक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद
संयुक्त लेखन- प्रतीक कुलकर्णी व शुभम क्षीरसागर
आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यात तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली.
त्याच पराक्रम शिलेदारांपैकी एक होते “कोंडाजी फर्जंद”!अवघ्या ६० मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा स्वराज्याला समर्पित केला.
अश्या या शूर योध्याविषयी आणि त्याच्या पराक्रमाविषयी माहिती करून देणारा हा लेख!
घोडेस्वार दौडत किल्ल्यावर आला, आलेला स्वार पायउतार होऊन राजांना मुजरा करुन म्हणाला,
राजे साल्हेरच्या किल्ल्यावर फत्ते झाली, पण सूर्यराव पडले.राजे आनंदी झाले तेवढेच दु:खी पण झाले. साल्हेर किल्ला मिळाल्याचा आनंद होता तर पुन्हा एक मावळा गमावल्याचे दुःख होते. पण स्वराज्य आणायचं तर असे बलिदान होतातच म्हणून राजांनी तोफखान्याला वर्दी दिली, किल्ल्यावर साखर वाटली व आनंद केला.
राजे पुढच्या मोहिमा ठरवायला बसले होते, सोबत अनाजी दत्तो, मोत्याजी खेळकर, कोंडाजी फर्जंद सगळेच होते. राजे बोलू लागले.
अनेक दुर्ग व मुलुख परत स्वराज्याला मिळाले पण एक सल अजून मनात तशीच आहे, अगदी आजही!सर्वांनी राजांकडे प्रश्नार्थी नजरेने बघितले, पण अमात्य बोलले,
राजे, पन्हाळ्याबद्दल बोलतायं ! हो ना ?राजे सुद्धा ‘हो’ म्हणाले, पण लगेच पुढचा प्रश्न टाकला,
कोण पन्हाळा घेईल ?सर्वांनी एकसोबतच आवाज दिला,
मी !राजे म्हणाले,
कोंडाजी, जाशील तू पन्हाळा घ्यायला ?कोंडाजी मुजरा करून ‘हो’ म्हणाले! मागील अनेक दिवस दक्षिणेचा दरवाजा असणारा हा पन्हाळगड आदिलशहाच्या ताब्यात होता. मागे एकदा हल्ला करूनही जिंकता आल नव्हत व युद्ध सोडून पळावे लागले होते. तो पन्हाळा घ्यायला कोंडाजी निघाला.
मोहिमेसाठी २०० तरी याने मागणं अपेक्षित होतं. पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने?
कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं :
राजे, ३०० गडी द्या फक्तराजे अचंबित झाले!
कोंडाजी फक्त ३००? पुरतील ?कोंडाजी म्हणला,
राजे, ६० च पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३०० सांगितले.कोंडाजीने मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती तिकडं जायला निघाला, राजांनी त्याला वापस बोलावले, तो लगेच वळला,
जी राजे! बोलावलत ?राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं, कोंडाजी खुश झाला. येसाजी म्हणला
राजे, मोहिमेच्या आधी इनाम ?राजे शांत झाले व कोंडाजीला आज्ञा दिली. अवघे ३०० स्वार घेऊन स्वारी राजापूरला गेली व किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली.
किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत? आणि नेमकी माहिती कळली,गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे जिथं तटबंदी विरळ आहे व पहारे सुद्धा कमी असतात.
आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले, ठरलं तर ! इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५, ३ मार्च , १६७३!
कोंडाजी ३०० जण घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपला. अनाजी दत्तो यांना सांगितलं,
पंत आपण हितचं थांबा, मी ६० जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या.पंत २४० स्वार घेऊन तिथंच थांबले, कोंडाजी निघाला. त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते. तो नियोजनाचा भाग होता. गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले. अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये, अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले.
पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. घोषणा, आरडाओरडा आणि त्यात कर्णे… सगळ्यांनी एकदाच आवाज धरला. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. निळोजी सबनीस म्हणून किल्ल्यावर होता. त्याला वाटलं इतके कर्णे वाजत आहेत म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे. तो ओरडत पळू लागला.
सोबत अनेकांना सांगू लागला “सैन्य खूप आहे…जीव वाचवा…पळा…गनीम संख्येने फार आहे.”हे ऐकून अजून ४०० -५०० लोक पळू लागले, येवढं वजा जाता देखील किल्ल्यावर १२०० माणसं बाकी होती. ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होते, मराठे सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते.
आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.
किल्लेदार पडला?!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला.
मग काय? सगळे सैन्य कच खाऊन पळू लागले. बघता बघता किल्ला घेतला गेला. पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती, तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला.
गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले, तोफांना बत्त्या दिल्या. त्याही मराठ्यांच्या कीर्तीचे गाणे गात धडाडू लागल्या. एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला.तो किल्ल्यावर गेला तो दिवस चैत्र शु प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा! राजांना बातमी कळली आणि मग काय विचारता, राजे भारावून बोलू लागले,
तोफा द्या, साखर वाटा, सरनोबत आपल्या हुजुरातीची तयारी करा! आपल्याला आज पन्हाळ्यास निघायचे!
राजांनी पन्हाळ्याला जाऊन कोंडाजी व बाकी साथीदारांचे सत्कार कौतुक केले !
कोंडाजी आणि त्यांच्या ६० सहकाऱ्यांना मानाचा मुजरा ! जय शिवराय !!
===
No comments:
Post a Comment