आजच्या भागात आपण देशमुखीविषयी जाणून घेऊयात. मागील एका भागात आपण पाटीलकीविषयी माहिती घेतली होती.
चला तर आज पाहुयात देशमुख.
इतिहासात डोकावलं तर असं दिसेल कि देशमुखांचा अधिकार हा एखाद्या लहानश्या मांडलिक राजासारखा होता. त्यांचे स्वतःचे खाजगी काम करण्यासाठी दिवाणही ते पदरी बाळगत असत. पाटलापेक्षा जास्त मोठी फौज देशमुख आपल्या पदरी बाळगीत.
परगण्यातील दिवाणी आणि फौजदारी तंटे सोडविणे, गावाच्या सीमा निश्चित करणे, गुराढोरांवर आणि रयतेवर जुलूम होऊ न देणे, एखाद्या व्यक्तीने विशेष कामगिरी केली असता त्यास
इनाम व मिराशी हक्क देणे हि सर्व कामे देशमुखाच्या कार्यक्षेत्रात येत.
गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी.लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. आपल्या
परगण्यांतील गावाची वार्षिक जमाबंदी करणे, गावाच्या पेठांतील जे व्यापारी असत त्यांजवर कर बसविणे, इत्यादी बाबी देशमुखाच्या सल्ल्यानेच देशमुखीवरचा सुभेदार
ठरवत असे.
सुभेदाराच्या ताब्यात एक किंवा त्यापेक्षा अधिक परगणे येत. ह्या सुभेदाराच्या कचेरीत जे अंमलदार असत त्यांत मुजुमदार म्हणून एक अधिकारी असे. ह्या मुजुमदाराचे काम म्हणजे परगण्यात हिंडून पीक पाहणी करणे, एखादी जमीन पडीक
असल्यास ती लागवडीखाली आणणे हे असे. ह्या कामास ह्या मुजुमदारास त्या भागातील देशमुखाची मदत घ्यावी लागे.
सुभेदार हा कायम स्वारीवर जात असे. त्यामुळे देशमुखाने आपल्याच गावी न राहता ठाण्याच्या गावी वरचेवर जाऊन तिथे कामकाजास लागेल ती मदत करावी लागत असे. या
मुजुमदारांचा पगार हा देशमुखासच करावा लागत असे.
अशी हि वहिवाट थेट मलिक अंबरच्या काळापासून असल्याचे दाखले सापडतात.
या मुजुमदाराचे आणि देशमुखांचे कधी कधी भांडणेही होत असत.
ह्यातीलच एक गमीतीदार किस्सा सांगतो.
हा किस्सा आहे मलिक अंबरच्या काळातील.
म्हणजे १४ ऑगस्ट १६२४चा.
भोरच्या देशमुखाची तक्रार बहिरो गणपती म्हणून जो मुजुमदार होता त्याने मलिक अंबर यास केली. ह्या तक्रारीत ह्या मुजुमदाराने सांगितले कि "भोरचा देशमुख हा ठाण्यास येऊन दिवाणगिरीचे काम चालवीत नाही. देशमुखाने करावयाचे दिवाणीचे काम तो स्वतः न करिता त्याच्या 'कमीन' म्हणजे हलक्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करवतो. त्या देशमुखांचा अधिकारी एक दोन दिवस कचेरीस येतो आणि काम करून निघून जातो."
मुजुमदार बहिरोने अशी तक्रार मलिक अंबर यास केल्यावर मलिक अंबरने त्याची चौकशी देशमुखाकडे केली. तेंव्हा देशमुखाने ह्या मुजुमदार बहिरो गणपतीचा कामचुकारपणा मलिक अंबर च्या नजरेस आणून दिला. त्यात हा मुजुमदार दोषी निघाला. तेंव्हा मलिक अंबरने ह्या बहिरो मुजुमदारास बोलावून त्याची चांगलीच कान उघडणी केली आणि सक्त ताकीद दिली.
देशमुखाला फसविण्याच्या खोट्या कटात ह्या बहिरो मुजुमदारास साथ दिली म्हणून नारायण ठाणेदार आणि तिमाजी नरसिंग मुजुमदार ह्या अधिकाऱ्यांना मलिक अंबरने
कामावरून काढून टाकले.
वतनाचे प्रेम जनतेत इतके दृढमूल झाले होते कि एक देशमुख शेजारच्या देशमुखाच्या हद्दीतील जमीन लाटण्यास मागेपुढे पाहत नसे.
याच एक उदाहरण पाहू.
भोरच्या पलीकडे रोहिडेश्वराचा डोंगर आहे. त्याच्या एका अंगास भोरचा मुलुख तर दुसऱ्या अंगास हिरडस मावळच्या मुलुख होता. हे दोन्ही मुलुख ह्या दोघा देशमुखांच्यात वाटलेले होते. त्यांपैकी कृष्णाजी बांदल देशमुख यांनी दोघांच्या हद्दी ठरलेल्या असतानाही स्वतःच्या सैनिकांच्या जोरावर मधली पठारावरची जमीन आपल्या ताब्यात घेण्याचा उद्योग केला. याची तक्रार मलीक अंबर कडे गेल्यावर निवड होऊन मलिक अंबरने कृष्णाजी बांदलास ताकीदपत्र पाठविलेले आहे.
परगण्यांतील आणि देशमुखाच्या अखत्यारीतील कारभारात सरकार आपण होऊन हात घालीत नसे. त्यामुळे देशमुख आपल्या स्वायत्ततेचा उपभोग घेत असत. जनतेच्या हिताची कामे देशमुखांना आपल्या अधिकारात करता येत. गावाच्या उत्पन्नातून नवीन वर्षासनेंहि देण्याचा त्यांना अधिकार होता.
पुण्याजवळील चाकण गावी इसवीसन १६२४ साली पाऊसच पडला नाही. लोक हवालदिल होऊन परागंदा होऊ लागले. तेंव्हा देशमुखाने गावच्या जोतिषाला विचारून पावसाचा योग आहे कि नाही याचा शोध घेण्याचे ठरविले. त्या प्रमाणे मुरार भटजी ब्रम्हे याना विचारले. त्यांनी अमुक दिवसांत पाऊस पडेल असे भविष्य वर्तविले व तसा पाऊस पडलाही. त्यामुळे त्यांना धर्मदाय २५ टक्के वर्षासन लावून दिले. अशी सर्व अधिकाराची कामे देशमुख करत असत.
जे देशमुख तेच केंव्हा केंव्हा सर देशमुखी ( मोठे देशमुख) असत. शंकराजी बिन मकाजी घाटगे (घाडगे) शिवाय पदाजी घाटगे ठाणेदार हे सातारा जिल्ह्यात छत्रपती राजाराम महाराजांच्या वेळेस
सरदेशमुख असून त्यांच्याकडे कार्यात निमसोड, कार्यात मायणी, व कर्यात विटे अश्या तीन कार्याती होत्या.
देशमुख केवळ परगण्यावरच असत असे नसून तर्फ, कर्यात, तपे, या भागांवरही असत.
देशमुखांस सत्तेत असणारे राजे- सुलतान फार जपत असत कारण देशमुख त्या राज्यास उत्पन्न मिळवून देतच असत, शिवाय युद्धप्रसंगी स्वतःची फौजही मदतीस पाठवीत असत.
अफझलखानाचे शके १५७८ कार्तिक शुद्ध ११ रोजीचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात तो मल्हारजी देशमुख, परगणे शिरवळ यास लिहितो कि, " देशमुखाने आपल्या प्रदेशात फिरून तसू भर हि जमीन पड राहू न द्यावी. सर्व जमीन कीर्दी करावी. दरसाल जमिनीचा दस्त ( सारा) वाढवीत जावा. सरकारचा पैसा सरकारांत वक्तशीर भरावा व रयतेस राजी राखावे."
विजापूरच्या पादशहाच्या राज्यात मान तालुक्यात मलवडीचे घाटगे उर्फ घाडगे देशमुख प्रसिद्ध होते. यांजकडे देशमुखीचे वतन पिढी दर पिढी चालत असून त्यांजपैकी झुंजारराव घाडगे हे अली आदिलशहाच्या कारकिर्दीत त्यास युद्धकर्मात मदत करीत व देशमुखीचे वतन गुमास्ता नेमून चालवीत. त्यांच्या या वतनास त्यांच्या शत्रूकडून उपद्रव होऊ लागला तेंव्हा त्याचा बंदोबस्त पादशहाने त्यांना सनदपत्र देऊन केला होता.
देशमुख स्वतःची मोठी फौज बाळगीत आणि वेळ प्रसंगी तिचा वापरही करत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यास जेंव्हा म्हणून फौजेची गरज पडली तेंव्हा बारा मावळच्या देशमुखांनी पूर्ण मदत केलेली आहे.
देशमुखांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत.
पाटलांस त्याच्या गावचेच हक्क गोळा करता येत. देशमुखांस मात्र त्यांच्या परगण्याच्या हद्दीतील सगळ्या गावांतून हक्क मिळत. दर गावास १० चिवटे, वाख १० पेंड, दोन बकरी, एक घागर तूप, कोष्टी मागास रुपये निमेप्रमाणे, नारळ, मीठ,
तांदूळ , कैली, चितव, व गूळ आणि खोबरे मिळत असे.
पूर्वी पाटीलकी किंवा देशमुखी विकत घेणे हे मोठे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाई.
खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे जश्या काही गावांच्या पाटीलक्या होत्या तश्याच त्यांच्याकडे देशमुख्याही होत्या. आपल्या जन्मगावाची म्हणजे जुन्नरची आणि आपल्या वडिलांनी म्हणजे शहाजी महाराजांनी जिथं आपली मर्दुमकी गाजवली अश्या अहमदनगरची देशमुखी मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा भाऊ मुरादबक्ष ह्याच्याकडे विशेष खटपट केलेली होती.
ह्या संदर्भाचे ३० नोव्हेंबर १६४९ चे एक पर्शियन पत्र उपलब्ध आहे. वयाच्या १९व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हे पत्र मुरादबक्षला पाठविले होते.
या शिवाजी महाराजांच्या पत्राला मुरादबक्षने उत्तर दिले. ह्या पत्रात मुरादबक्ष शिवाजी महाराजांना म्हणतो," तुमचे पत्र राघोपंत यांजबरोबर पाठविले, ते पावले. तुम्ही जुन्नर व अहमदनगर येथील देशमुखीविषयी लिहिले. त्यास आम्ही हुजूर गेल्यावर हा मजकोर घडून येईल. खातरजमा ठेवावी. आपणकडील एक वकील पाठवून द्यावा. मजकूर समजून घेऊन अमलात येईल. वकिलास जो मजकूर विचारू त्याचे उत्तर द्यावे. म्हणजे काम होण्यास दिरंग होणार नाही. जाणोन उद्योग करावा व लोभ पूर्ण जाणावा."
देशमुख हे एका अर्थी सरकार व रयत यांचे मध्यस्थ असत. एक सरकार जाऊन दुसरे सरकार आले तरी त्याची बाधा देशमुखास होत नसे. त्याचे काम अव्याहत चालूच राहत असे.
देशमुखांचा स्वतःचा असा शिक्का असून त्यावर नांगराचे चिन्ह असे. परगण्यासंबंधी जमाबंदी प्रकरणी सर्व खतपत्रे, गोत महजर आणि न्यायनिवाडापत्रे यांवर हा नांगराचा शिक्का असल्याशिवाय ती प्रमाण मानली जात नसत. प्रस्थापित सत्तेशी देशमुख इमामाने वागत असत त्यामुळे शिवाजी महाराजांची सत्ता प्रस्थापित झाल्यावरही मराठ्यांच्या राज्यात देशमुखांची देशमुखी अबाधित राहिलेली आहे.
लेख समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर

No comments:
Post a Comment