शाहू छत्रपतींच्या कालखंडात पूर्वेत आणि दक्षिणेत पराक्रम गाजवलेल्या दोन व्यक्ती म्हणजे रघुजी भोसले आणि फत्तेसिंग भोसले. बंगालमध्ये रघुजी भोसलेंनी केलेला पराक्रम सर्वश्रुत आहेच. मात्र राघुजींनी दक्षिणेत त्रिची, अर्कोत आणि पोर्तो नोवो च्या केलेल्या यशस्वी लढाया आजपर्यंत दुर्लक्षित राहिल्या. पोर्तो नोवो वर केलेली चढाई आणि मिळालेला विजय मराठ्यांच्या दक्षिण मोहिमेतील महत्वाचा भाग होय. मात्र त्या बरोबरच त्रिची वरील विजय मराठ्यांचे अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करण्यास कारणीभूत ठरला. जिंजीवर मुघलांनी विजय मिळवला मात्र राजाराम महाराज त्यांच्या हाती आले नाहीत. त्यानंतर औरंजेबाच्या मृत्युनंतर अर्कोतच्या नवाबाचे दक्षिण भारतामध्ये विशेष वर्चस्व होते. अर्कोत आपली राजधानी ठेऊन आसपासच्या प्रदेशामध्ये नवाब आपली सत्ता पसरू लागला होता.
शाहू महाराजांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्य चौफेर पसरत होते. १७४० मध्ये दक्षिणेकडे मराठ्यांनी आपला मोर्चा वळवला. मराठ्यांना दक्षिणेत उतरू द्यायचे नाही असा चंग अर्कोट चा नवाब दोस्त अली खान याने बांधला होता.
मराठ्यांनी दक्षिणेत केलेली वाटचाल १५ मे १७४० च्या वृत्तांतात कथन करताना पोन्देचारी येथील फ्रेंच दुभाष लिहितो , “ ४०००० ते ५०००० एवढे घोडदळ घेऊन मराठे कंदनुर वर चालून गेले. ६०००० ते ७०००० हजार रुपयांची मागणी करून कडापा वर देखील हल्ला केला. मराठा आणि अब्दुल नबी खान याच्या घोडदळात झालेल्या एका दिवसाच्या लढाईत खानाचा पराजय झाला. त्याने आपले कुटुंब गेंदी च्या किल्ल्यावर पाठवले. आता मराठे दक्षिणेकडे सपाटीच्या प्रदेशात निघाले आहेत. मात्र नवाब दोस्त अली खान, हसन अली, सिद्दी जोहर आणि मीर असद यांनी आपले सर्व घोडदळ आणि पायदळ घेऊन शत्रूला आपल्या प्रदेशत येण्यापासून रोखण्यासाठी पाऊले उचलली आहेत.” १३ मे च्या आनंद चेट्टी आणि इमाम साहेब यांनी पोन्देचेरी गव्हर्नर ला पाठवलेल्या पत्रात हीच माहिती दिली आहे. जिंजी , वान्दिवाश आणि वलीकोंडापुराम येथील किल्लेदारांनी देखील पत्रे पाठवली आहेत. मराठ्यांनी प्रचंड लुटालूट केली, याच कारणाने भयभीत होऊन अनेकांनी पत्रे पाठवून पोन्डेचेरी मध्ये आसरा मागितल्याचे दिसून येते.
या घटनेची अधिक माहिती आनंद चेट्टी याचा दूत याने पोन्डेचेरी ला दिलेल्या निरोपात आहे. निरोपात असा उल्लेख आहे कि निझामाने ४०००० ते ५०००० फौज आणि २०००० घोडदळ आपल्या मुलासोबत मराठ्यांशी सामना करण्यासाठी पाठवले आहे. मराठ्यांशी झालेल्या चकमकीत अब्दुल नबी खानच्या दोन्ही मुलांना पराजय पत्कराव लागला असून त्यांनी मराठ्यांना दीड लक्ष रुपये आणि इंतर नजराणे देऊन सुटका करून घेतली. मराठ्यांचा आता या भागात प्रवेश निश्चित असून हसन अली आणि ताकी साहिब अजूनही आपली फौज घेऊन तैनात आहेत. १७ मे च्या पत्रात सफदर अली खान २००० पायदळ घेऊन अर्कोत मधून निघाला असल्याही नोंद आहे.
हे सर्व घडत असताना हजारोंच्या संख्येने आश्रित पोन्डेचेरी मध्ये दाखल होत होते. अनेकांनी आपल्या मौल्यवान वस्तू , पैसा असा सर्व संसार तिथे आणला होता. गव्हर्नर देखील याच कारणाने मराठ्यांच्या सर्व हालचालींवर नजर ठेऊन होता. १९ मे रोजी सुमारे २ ते ३ हजार लोक पोन्डेचेरी मध्ये आल्याची नोंद आहे.
मराठ्यांची आगेकूच पाहता त्रिची वरून चंदा साहेब देखील आपल्या फौजेसह बाहेर पडला. त्याने गव्हर्नर ला पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे कि, “नवाबांनी मला तुमची मदत घेण्यास सांगितली आहे. मी सर्वांना एकत्र घेऊन मराठ्यांवर चाल करणार आहे आणि मराठ्यांची या प्रदेशात येण्याची शक्यात कमी आहे.” पुढे आलेली नोंद सांगते कि दिनांक २४ मे रोजी अर्कोत आणि वेल्लोर च्या किल्ल्यातून पत्रे अली . या पत्रांमधून मराठ्याची आगेकूच नमूद केलेली आहे. महत्वही मानस पडली असून मराठ्यांनी आपल्या प्रदेशात प्रवेश केला आहे अशी माहिती मिळताच गव्हर्नर ने पोन्डेचेरी शहराची सुरक्षा वाढवली. शहरात येणारे सर्व प्रवेश बंद करण्यात आले आणि पश्चिमेकडील एकच द्वार इतर लोकांसाठी खुला ठेवण्यात आला. यासमयी सर्व महत्वाच्या लोकान्हे कुटुंबीय देखील पोन्डेचेरी मध्ये दाखल झाले. २४ तारखेला इमाम साहिब यांची पत्नी अलाम्पाराई वरून तर २५ तारखेला नवाब दोस्त अली खान यांही पत्नी पोन्देहेरी मध्ये दाखल झाली. पुढे नवाबाचे इतर कुटुंबीय सर्व सामानासह तिथे पोचल्याची नोंद ६ जुलै रोजी केली आहे. आपल्या कुटुंबियाला केलेली मदत लक्षात घेऊन नवाबाने गव्हर्नरला खूप जडजवाहीर आणि नजराणे पेश केले. नवाब सफदर अली खानने पाठवलेल्या पत्रात तो लिहितो, “तुम्ही केलेली मदत मोठी असून त्याचा परतावा मी कसा करू? आपली हि मैत्री अशीच कायम राहो.” याच पत्रात युद्धाची सद्य स्थिती सांगितली आहे.
याच वेळी मराठे आणि नवाब यांच्यात झालेल्या लढाईत नवाबाचा लढता लढता मृत्यू झाला. नवाबाच्या मृत्युनंतर लढाईची सूत्रे सफदरच्या हाती अली. त्याने सर्व किल्ल्यांवर सैन्य पाठवून मजबुती वाढवली. तरीही वरून बाहेर पडलेल्या चंदा साहेबला देखील बोलवून घेतले. यादरम्यान नसीर जंगने मराठ्यांशी तात्पुरता तह करून परिस्थिती हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या सर्व घडामोडीत पोन्डेचेरीच्या गव्हर्नर ने नवबाला केलेली मदत खूपच महत्वपूर्ण ठरली. नवाबाने देखील फ्रेंचांना स्वताची नाणी पडण्याची मुभा दिली होती. “हे तुमचेच घर आहे, त्यामुळे आपण विना हरकत इथे यावे” अशा आशयाचे पत्र गव्हर्नर ने नवाब सफदरला पाठवले. पुढे चंदा साहेब यांही पत्नी देखील पोन्देचेरीत दाखल झाली. नवाबाने मराठ्यांशी पूर्ण ताकदीने लढायची तयारी केली होती. त्याच अनुषंगाने सर्व नवाबांचा कुटुंबकबिला पोन्देचेरीच्या संरक्षित जागी ठेवला होता. चंदा साहेब यांनी पुन्हा एकदा त्रिची चे ठाणे सांभाळले तर नवाब अर्कोत ला गेला.
मराठ्यांची आगेकूच मात्र थांबली नाही. सप्टेंबर ते नोव्हेंबर मराठ्यांच्या हालचाली थंडावल्या होत्या. कदाचित मराठे मोठी खंडणी घेऊन तह करतील असा समज असला तरी या दरम्यान मराठ्यांनी तिरूवन्नामलई वर हल्ला करण्याची योजना आखली. मराठ्यांनी आपण त्रिची वर हल्ला करत असल्याची अफवा पसरवली आणि शत्रूला गाफील ठेऊन फत्तेसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली तिरूवन्नामलई आणि आसपासच्या परिसरावर चढाई केली. मराठ्यांनी वेल्लीमुडू, तींडीवनम , कैलासापाक्कम आणि परिसर संपूर्ण लुटला. मराठ्यांच्या धास्तीने अनेकांनी कडलोरला आश्रय घेतला.
डिसेंबर महिन्यामध्ये मीर गुलाम हसनच्या नेतृत्वाखाली नवाब सफदर अली खानाने २००० घोडदळाची एक तुकडी मराठ्यांविरुद्ध पाठवली. १५ डिसेंबर च्या नोंदीत नमूद केल्याप्रमाणे नवाबाचा खजिना (सुमारे एक ते दिड लाख पागोडा) चेटपटू किल्ल्यामध्ये आल्याही माहिती मराठ्यांना मिळाली आणि मराठ्यांनी मीरच्या तुकड्यांवर अचानक हल्ला केला. मीर चे अनेक घोडे मराठ्यांनी मिळवले , किल्ल्याला संपूर्ण वेढा घातला. मराठ्यांनी आजूबाजूच्या प्रदेशाची लुट केली. तयानुर, मलयानुर, पेडपेत्ताई, कलसपक्कम अशा भागातील लोक चहुबाजूंना विखुरले गेले. मराठ्यांनी त्यानंतर वेंकटमलपेत्ताई च्या पश्चिमेकडील करडी, कल्लडवी, पालकोल्लाई असा अजून मोठा प्रदेश लुटला. मराठ्यांच्या नोवेंबर नंतरच्या हालचालींमुळे कडलोरला आश्रयासाठी येणार्यांची संख्या प्रचंड वाढली. पोर्तो नोवोच्या अधिकार्याने आपल्या पत्रात मराठ्यांच्या सविस्तर हालचालींची माहिती दिली असल्याचे दुभाष सांगतो.
डिसेंबरच्या शेवटला मराठ्यांनी पोर्तो नोवो वर हल्ला केला आणि प्रचंड लुट मिळवली. गव्हर्नर ने पोन्डेचेरी च्या सुरक्षेसाठी किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करून सैन्याची गस्त वाढवली. मराठ्यांनी पोर्तो नोवो वर विजय मिळवल्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील अनेक गावात लुटालूट केली. सद्रास या डच किल्ल्यावर देखील मराठ्यांनी हल्ला केला मात्र तिथे तैनात असलेल्या सैन्यामुळ मराठ्यांना माघार घ्यावी लागली. रघुजी भोसल्यांनी या दरम्यान गव्हर्नरशी पत्रव्यवहार सुरु ठेवला.
मराठ्यांनी त्यानंतर आपला मोर्चा त्रिचीकडे वळवला. नवाब सफदर अली खानाने देखील अर्कोत सोडून जिंजी मधून सूत्र चालवण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला आणि त्याची भौगोलिक ताकद पाहता तो निर्णय योग्य होता. अर्कोतचा भुईकोट किल्ला मराठ्यांविरुद्ध टिकणे फार अवघड होते. डिसेंबर-जानेवारी असे दोन महिने मराठ्यांनी पूर्व किनारपट्टीवर व्यतीत केले. त्यानंतर त्रीचीला मराठ्यांनी आपली छावणी टाकली. येथून मराठा सैन्यप्रमुख रघुजी भोसले यांनी नियोजन आखण्यास सुरुवात केली. पोन्डेचेरी गव्हर्नरशी रघुजीनि केलेला पत्रव्यवहार दुभाषाने नोंद करून ठेवला आहे. फेब्रुवारी मध्ये मराठ्याच्या विशेष हालचाली दिसत नाहीत. मात्र मराठ्यांनी त्रिचीच्या किल्ल्याला दिलेला वेढा महिनाभर सुरु होता. ४ मार्च १७४१ ला आलेल्या पत्रात त्रिची मधील नवाब सैन्याची आणि इतर लोकांची अवस्था अतिशय वाईट असून खायला अन्न नसल्यचे नमूद केले आहे. मराठ्यांपुढे टिकाव धरणे मुश्कील असून मदतीची गरज वर्तवली आहे.
चंदासाहेब त्रिची मध्ये असल्याने त्यांनी नवाब सफदर ला पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे कि , “मराठ्यांशी लढाई तीव्र झाली आहे. माझी त्यांच्याविरुद्ध लढण्याची क्षमता संपली आहे. जर मराठ्यांशी वाटाघाटी करण्यास आपण विलंब केला तर मला कायमस्वरूपी गमावून बसाल.”
या पत्रातून मराठ्यांनी नवाबाच्या सैन्याची केलेली कोंडी स्पष्ट होते. प्रत्यक्ष लढाई मोठी झाली नसली तरी रसद तोडण्यास मराठे यशस्वी ठरले होते. चंदा साहेब यांना सोडवण्यासाठी नवाबाने २२ लाख पगोडा देण्याचे सांगितले. चंदा साहेब यांच्या पत्नीने मराठ्यांना पैसे घेऊन हि लढाई थांबवण्याची विनंती केली. एवढी मोठी रक्कम जमा करताना नवाब ५ लाख, नावाबाची आई ५ लाख, चंदासाहेब यांची पत्नी ५ लाख, बडेसाहेबाची पत्नी ५ लाख, पोलुराचा मोहमद अली १ लाख आणि अली नाकी १ लाख अशी विभागणी केल्याचेही नमूद आहे. मात्र रघुजींच्या अनुपस्थितीत मराठ्यांनी निर्णय रघुजींकडे राखून ठेवला. नवाबाने चंदा साहेब आणि बडे साहेब (चंदासाहेब त्रीचीच्या किल्ल्यात तर बडे साहेब मदुराई मध्ये होते) यांची मराठ्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्रिची येथील मराठा छावणीत असलेल्या फ्रेंच दूताने २७ मार्च रोजी पाठवलेल्या पत्रात मराठे-बडे साहिब यांच्या लढाईचा सविस्तर वृत्तांत सांगितला आहे, “बडे साहेब यांनी मदुराईचा किल्ला सोडून ४००० घोडदळ घेऊन दिंडीगुल ला प्रयाण केले. येथे मराठ्यांच्या २००० च्या घोडदळासोबत झालेल्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. त्यानंतर बडे साहेब यांनी त्रिची च्या पश्चिमेस ७ मैलावर असलेल्या मालाम्पाराई येथे २० मार्च रोजी छावणी केली. हि बातमी मिळताच रघुजी भोसल्यांनी १०००० घोडदळाची तुकडी बडे साहेब यांच्यावर पाठवली. सुमारे ९ तस चाललेल्या लढाईत २००० ते ३००० मराठा सैन्य कमी आले. बडे साहेबाह्य सैन्याचे देखील मोठे नुकसान झाले. मात्र लढाईत तलवार आणि बाणांनी झालेल्या जखमांनी बडे साहेब मृत्युमुखी पडले. त्याबरोबरच सादिक साहेब( बडे साहेबांच्या बहिणीचा जावई) आणि अजून एक मोठा अधिकारी मारला गेला आणि हे पाहून नवाबाचे सैन्य पळून गेले. रघुजी भोसल्यांनी बडे साहेब यांचा मृतदेह त्रिची येथे चंदा साहेब यांच्याकडे पालखीतून पाठवून दिला.
३० मार्च रोजी मराठा छावणीत असलेल्या Francisco Pereira या रोमन डॉक्टरने गव्हर्नर ला पत्र पाठवून त्रीचीतील परिस्थिती सांगितली. रघुजी भोसल्यांनी पिंडारी आणि पोलीगर या लोकांना किल्ल्याची तटबंदी चढून जाण्याचा आदेश दिला, सर्व बाजूंनी मराठे किल्ल्य प्रवेश करू लागले. आपला जीव आता धोक्यात आहे हे पाहून एका वकीला मार्फत चंदा साहेब आयने मराठ्यांशी बोलणी सुरु केली. १२ लाख रुपये देण्याचे काबुल करून आपल्या जीवाला धोका होता कामा नये अशी अट त्याने ठेवली. त्याच रात्री चंदा साहेब, मुलगा आदिब साहेब, जावई खान बहादूर आणि शरीफ साहेब असे चौघे किल्ल्याच्या बाहेर मराठ्यांच्या छावणीत आले. रघुजी भोसल्यांची त्यांनी भेट घेतली. राघुजींनी चौघांची शस्त्रे काढून घेतली आणि त्यांना राजकीय कैदेत ठेवले. मराठ्यांनी त्रिचीचा किल्ला जिंकला आणि मराठ्यांचा ध्वज किल्ल्यावर फडकू लागला.
चेटपेत्तू येथील चंदा साहेब यांच्या घरून पोन्डेचेरी येथे चंदा साहेब यांच्या पत्नीला पाठवलेल्या पत्रात या घटनेची पुष्टी केली असून त्रिची चा किल्ला मराठ्यांनी जिंकला असून तेथे मराठ्यांचा ध्वज फडकत आहे आणि चंदा साहेब मराठ्यांच्या कैदेत आहेत असे नमूद केले आहे.
रघुजी आणि फत्तेसिंह भोसले यांनी पोर्तो नोवो आणि त्रिची असे मोठे विजय मिळवताना दक्षिणेतील मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढवला. त्रिची सारखे मध्यवर्ती ठिकाण मराठ्यांच्या हाती आल्याने दक्षिणेतील सत्ताकारणात मराठ्यांचा सहभाग वाढण्यास निश्चितच मदत झाली. विशेतः किनारपट्टीवरील युरोपीय सत्तांना मराठ्याशी चांगले संबंध ठेवण्यास या दोघांनी भाग पडले. शाहू छत्रपतींचे सबंध भारतावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न रघुजी आणि फत्तेसिंह यासारखी अनेक शूरांच्या प्रयत्नाने साकारले जात होते.
छायाचित्रे
१. मोहिमेमधील तत्कालीन महत्वाची ठिकाणे
२. त्रिची किल्ला
#शाहूपर्व
#जागर_इतिहासाचा




No comments:
Post a Comment