विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 July 2020

#रूस्तूमराव_सरदार_थोरात_घराणे


#रूस्तूमराव_सरदार_थोरात_घराणे
( भाग एक )
छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि अनेक पराक्रमी व वीर पुरुषांच्या कर्तबगारीला वाव मिळून अनेक नवीन सरदार घराणी नावारूपाला आली.अनेक जुनी सरदार घराणी ज्यांचा पराक्रम आणि शौर्य यांच्या जोरावर बहामनी सुलतान शाहीची पाळेमुळे जेथे घट्ट झाली होती तेथेच शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या उद्दात्त हेतूने भारावलेली काही घराणी स्वराज्याच्या सेवेला दाखल झाली.त्या घराण्या पैकीच एक पुणे जिल्यातील हवेली तालुका हिंगणगाव च्या थोरात पाटलांचं धनगर घराणं हि तीच कल्पना मनात आणून स्वराज्याच्या सेवेला दाखल झालं.
याच घराण्यातील एक वीर पुरुष येसाजीराव थोरात शिवाजी राज्यांच्या काळात स्वपराक्रमाने नावारूपाला आला.त्याबदलात महाराजांनी त्याला सरदारकी देऊन त्याचा गौरव केला.लवकरच या घराण्यात आणखी एक वीर पुरुष नावारूपाला आला.मराठ्यांच्या इतिहासात तो बर्यापैकी स्मरणात राहिला तो त्याच्या बंडखोर वृत्तीमुळे ....त्या शूर सरदाराच नाव दमाजी थोरात रुस्तुमराव
#रुस्तुमराव या नावाने त्याने मराठ्यांच्या इतिहासात ओळख निर्माण केली ती कायमची ...
दमाजीचा उदयकाळ : काही अस्सल शिवकालीन पत्रांमध्ये दमाजीचा उल्लेख येतो.त्यावरून तो शिवाजी राजांच्या काळातच नावारूपाला आला होतं हे स्पष्ट होत.शिवाजी राजांच्या शेवटच्या काही मोहिमांमध्ये तो सहभागी झाला असावा.असाही एक तर्क निघतो.पण खऱ्या अर्थाने दमाजीचा उदयकाळ हा मराठ्यांचा २७ वर्षे चाललेला स्वतंत्र संग्राम मानता येईल.याच काळात त्याच्या अंगच्या उपजत गुणांना व पराक्रमाला वाव मिळून दमाजी हा मराठ्यांच्या इतिहासातील एक मात्तब्बर सरदार म्हणून नावारूपाला आला.
सरदार थोरात घराणे ( भाग दोन )
दमाजी थोराताची स्वराज्यासाठीची कामगिरी : त्याने स्वराज्यासाठी पार पाडलेल्या कामगिरीची इत्यंभूत माहिती उपलब्ध नाही.पण तो रामचंद्र पंत अमात्य यांच्या दिमतीस देण्यात आलेल्या सरदारांपैकी एक असल्याने जिंजीच्या वेढ्याच्या प्रसंगी त्याने काहीतरी विशेष कामगिरी पार पाडली असावी किंवा त्याच काळात मोघल सरदारान विरुद्ध चालू असलेल्या रणधुमाळीत त्याने विशेष लौकिक प्राप्त केलेला असावा कि ज्याच्यामुळे छ राजाराम महाराजांनी त्याला पाटस व सुपे प्रांताची जहागीर दिली.त्याशिवाय रुस्तुमराव हा किताब देऊनही त्याचा गौरव करण्यात आला.
रुस्तुमराव या किताबाविषयी थोडस काही : मराठे शाहीच्या अथवा सुलतान शाहीच्या काळात मर्दुमकी गाजवणार्या पराक्रमी वीर पुरुषांना व सरदाराना वेगवेगळे किताब व पदव्या देऊन गौरवण्यात येत असे.
जसे कि झुंजारराव , प्रतापराव ,,हंबीरराव ..इत्यादी ...
असा किताब देऊन त्या सरदाराचा विशेष बहुमान करण्यात येई.दमाजीच्या अगोदरच्या काळात इतर कोणा मराठा सरदाराला हा किताब देण्यात आला होता का( मराठा छत्रपतींकडून ) या विषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही.पण दमाजीनंतर जाधव व कडू या मराठा समाजातील तर कोकरे व पांढरे या धनगर समाजातील सरदारांनी हा किताब अर्जित केल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत.त्यामुळे दमाजी हा मराठ्यांच्या इतिहासातील पहिला रुस्तुमराव ठरतो.रुस्तुम हे अत्यंत कडव्या व लढवय्या समजल्या जाणाऱ्या काबुलकडील पठाण या जमातीतील एका श्रेष्ठ वीराचे नाव आहे.त्यामुळे रुस्तुमराव या शब्दाचा अर्थ एक श्रेष्ठ वीर किंवा अत्यंत लढवय्या असाही घेता येऊ शकतो.दमाजीने त्याच्या या किताबाचा उल्लेख त्याच्या शिक्क्यात हि केलेला दिसतो.त्याशिवाय त्याच्या नामे देण्यात आलेल्या कित्येक सनद पत्रान मधेही दमाजी थोरात रुस्तुमराव असेच उल्लेख आढळतात.काही कागद पत्रान मध्ये त्याचा दमसिंग असाही उल्लेख आढळतो.
सरदार थोरात घराणे भाग तीन
१७०७ साली बादशाऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा थोरला मुलगा शहाआलम(बहादूरशहा) दिल्ली चा मोघल बादशाहा झाला. त्याने मराठ्यांच्यात वारसा कलह लावून दिला. त्याने संभाजी पुञ शाहूला मुक्त केले.शिवाजी राजांची सून ,राजाराम महाराजांची पत्नी असलेल्या महाराणी ताराबाईने शाहूचा छञपतीच्या गादीवरील हक्क नाकारला.त्यावेळी मराठा सरदार दोन गटात विभागले गेले. एका गटाने शाहूचा पक्ष उचलून धरला.तर दुसर्याने ताराराणीचा त्यामुळे मराठी मुलखात आपआपसातच संघर्ष पेटला. या संघर्षात सुरूवातीला दमाजीने ताराराणीचा पक्ष घेतला,पण काही दिवसातच तो शाहूच्या पक्षाला मिळाला.शाहूने त्याला सरंजाम ही बहाल केला.शाहू तर्फे दमाजीला देण्यात आलेला सरंजाम व जागीर अशी १ गुजरात , प्रांत कडेवळीत व भागानगर येथील काही महाल त्याला सरंजामी खर्चासाठी देण्यात आले. त्याशिवायही हवेली संगमनेर,बाळापूर,कुंभारी,बेल्हापूर,देपूर,कन्नड,सिन्नर,खानापूर,सावरे,पाटोदे,उडणगाव,चाळीसगाव,धोञे इ..काही महालांचे मोकासा हक्क ही त्याला प्राप्त झाले.कोळवडी,हिंगणगाव,व उरळी कांचन येथे इनाम देण्यात आले.त्याशिवायही अनेक गावांचे मोकासा हक्क ही त्याला प्राप्त झाले.वरील त्याला देण्यात आलेली जागीर पाहता छ शाहू ने त्याला आपल्या पक्षात खेचण्याचा जोरदार व निकाराचा प्रयत्न केलेला दिसतो पण लवकरच त्याच्यामध्ये व शाहू मध्ये बेबनाव निर्माण झाला त्यामागचे कारण माहित नाही पण त्याची व शाहूची गोडी झाल्यावर २-३ वर्षातच दमाजी पुन्हा ताराराणीच्या पक्षाला मिळाला असला पाहिजेकारण शके १६३४ च्या आश्विनात त्याला मौजे मोरगाव प्रांत पुणे येथील इनाम चालविण्याबद्दल राजा शिवछञपतींचे आज्ञापञ उपलब्ध आहे. त्याशिवायबी तो व त्याचा हस्तक येसाजी गायकवाड माळी यांनी याच सालात सासवड जवळच्या कोडीत गावाला लिहेलेली पञे मिळतात.सहजिकच दमाजीची शाहूच्या सरदारांशी झटापट होणे स्वाभाविक होते,दमाजीचा शाहूशी झगडा ६-७ वर्ष चालू होतो.यादरम्यान पुणे सातारा भागातील बराचसा मुलूख त्याने कोल्हापूरकरांच्या अमलाखाली आणला. त्याच्यामार्फत केल्या जाणाऱ्या कारवायामध्ये येसाजी गायकवाड माळी याचा मुख्य सहभाग असायचा दरम्यान याच येसाजी गायकवाडाच्या हातासी फौज देऊन त्याने पुरंदर किल्लाही जिंकून घेण्याचा प्रयत्न केला पण पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या झटापटीत गायकवाडचा पराभव झाला व त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. दमाजीची शाहूच्या मुलखातील धामधूम ही कोल्हापूरकर छञपतींकरता आसल्याने त्याच्या उद्योगास पुंडावा वा बंड असली विशिष्ट अर्थदर्शक विशेषणे लावता येत नाहीत.कोल्हापूरकर छञपतींकरता शाहूला ञास देणारे जर पुंड,गुंड,बंडखोर ठरत असतील तर शाहूतर्फे हेच उद्योग करणारे याच सदरात मोडले जातील पण तसे कोण समजत नाही.
सरदार थोरात घराणे भाग 4
मराठेशाहीच्या काळात व त्या अगोदरही मराठा व धनगर या दोन्ही समाजातील थोरात मंडळींनी मोठा पराक्रम करून आपआपल्या कुळाचा लौकिक वाढविलेला आहे.या लेखात धनगर थोरात घराण्याची थोडक्यात माहिती देण्यात येत आहे.माहितीसाठी पुणे पुरालेखागार पुणे येथील अस्सल कागदपञ उदा.संरजामपञ,वतनपञ,सनदा,
आज्ञापञ,राजपञ इ. छञपती सातारा व पेशवे दफ्तरातील अस्सल कागदपञांचा आधार घेण्यात आला आहे. सरदार थोरात मूळ गाव मौजे हिंगणगाव ता सांडस प्रांत पाटस हल्ली पुणे जिल्हा हवेली तालुका.
घराण्यात होऊन गेलेल्या वीर व पराक्रमी सरदारांची नावे
सरदार येसाजी थोरात,देवजी,तावजी,संताजी,दमाजी रूस्तूमराव,चंद्रभान,खंडोजी रूस्तूमराव,..छ राजाराम महाराज जिंजी येथे असताना सरदार दमाजी यांस रूस्तूमराव हा किताब व सुपे व पाटस प्रांतांची जहागीर बहाल केली.
...छ शाहूने दमाजीला दिलेली इनाम गावे १ मौजे हिंगणगाव २मौजे उरुळी कांचन ३ मौजे कोळवडी एकूण गावे ३ ता सांडस प्रांत पाटस येथील...
वतने...१मौजे हिंगणगाव पाटीलकी हे वतन
२ ता कडे प्रांत कडेवळीत व ता नगरहवेली प्रांत कडेवळीत येथील देशमुखी
* सरंजाम ...
गुजरात,भागानगर व प्रांत कडेवळीत मधील काही महाल.
वरील माहिती 4 स्वतंत्र पोस्ट त्या एकत्रित करण्यात आल्या आहेत.
माहिती व फोटो साभार
संतोष पिंगळे
इतिहास संशोधक मोडी लिपी तज्ञ
लेखक सरंजामी मरहट्टे.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...