विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 25 October 2020

मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर अंबाजी इंगळे भाग ४

 


मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर
अंबाजी इंगळे
भाग ४

इ. स. १८०३ मध्येंच शिंद्यांचें इंग्रजांशीं युद्ध झालें. यावेळीं अंबाजी इंगळे हा गोहद प्रांताचा मामलतदार होता. त्या युद्धांत इंग्रज उत्तर हिंदुस्थानांतील शिंद्यांचा मुलूख भराभर काबीज करीत चालले आहेत असें पाहून अंबाजी इंगळे हा शिंद्याविरुद्ध बंड केल्याचें मीष करून इंग्रजांस जाऊन मिळाला. व त्याच्यांशीं तह करून त्यानें गोदहच्या राण्याच्या मुलुखांतील कांहीं मुलूख स्वत:करितां मिळविला. पण शिंदे व इंग्रज यांच्या दरम्यान तह होतांच अंबाजी पुन्हां शिंद्याकडे गेला; व आपण आपल्या धन्याचा कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें कांहीं मुलूख बचावण्याकरितांच केवळ इंग्रजांनां जाऊन मिळालों होतों असें सांगून त्यानें शिंद्याकडून आपल्या समयोचित वर्तणुकीबद्दल शाबासकी मिळविली. महादजीनें सन १७८४ सालीं गोहदच्या राण्यापासून त्याचा मुलूख जिंकून घेतला असल्यामुळें त्याला ग्वालेरचा किल्ला इंग्रजांस देण्याचा कांहींच हक्क नाहीं, हा मुद्दा स्वत: अंबाजीनेंच उकरून काढला होता असें ग्रांटडफ, अंबाजीच्या जांवयानें त्याला तोंडीं सांगितलेल्या माहितीवरून लिहितो. पुढील सालीं होळकर व इंग्रज यांच्यामध्यें युद्ध उपस्थित झालें. तेव्हां अंबाजीनें होळकराला मिळण्याविषयीं शिंद्यास सल्ला दिला होता असें म्हणतात.

यानंतर शिंद्याची अंबाजीवर पुन्हां इतराजी झाली; व शिंद्याच्या अर्धवट संमतीनें यशवंतराव होळकरानें अंबाजीस (इ. स. १८०५ सालीं) कैद केलें. पण मागून होळकरानें आपल्या फौजेस देण्याकरितां अंबाजीपासून बराच पैसा घेऊन त्यास बंधमुक्त केलें. व सर्जेराव घाटग्यास काढून शिंद्याकडून त्यास दिवाणगिरी देवविली. अंबाजी हुषार असल्यामुळें आपल्या कार्यांत त्याजपासून कांहीं मदत होईल अशी होळकरास आशा वाटत होती परंतु अंबाजी हा होळकर व इंग्रज या दोघांसहि खूष ठेवूं इच्छित असल्यामुळें त्याचें वर्तन एकंदरींत धरसोडीचें राहिलें. अंबाजी हा इ. स. १८०९ च्या सुमारास मरण पावला. असें दिसतें (टॉड व ग्रांटडफ)

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...