#पुरंदर_किल्ल्यावरील_स्वराज्याची_पहिली_लढाई_व_महापराक्रमी_गोदाजी_जगतापांचा_अतुलनीय_पराक्रम ! ( दिनांक १० आॅगस्ट १६४८ ) —
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे प्रेरणास्रोत शहाजीराजे होते . स्वकियांचे स्वतंत्र राज्य असावे हे शहाजीराजांचे स्वप्न होते .
भीमा व नीरा या दोन नद्यांमधे असलेला पुणे व सुपे प्रांत ही शहाजीराजेंची जहागिरी होती . प्रजाहित दक्ष कारभारामुळे जहागिरीतील देशमुख , देशपांडे , पाटील , कुलकर्णी या वतनदारांशी शहाजीराजांचे जिव्हाळ्याचे संबंध होते . डोंगरदर्यांनी व्यापलेल्या या बारामावळ मुलखाचा व तेथील निष्ठावान लोकांचा उपयोग स्वराज्य निर्मितीसाठी होईल हे शहाजीराजेंनी जाणले होते .
स्वराज्य संकल्पक शहाजी राजेंनी बालशिवाजी व जिजाऊसाहेबांना स्वराज्य निर्मितीच्या हेतूने बंगळूरहून पुणे येथे रवाना केले . सोबत भरपूर खजिना , युध्द साहित्य , हत्ती , घोडे तसेच विश्वासू सहकारी दिले . याशिवाय शहाजीराजेंनी शिवबांना स्वतंत्र ध्वज व राजमुद्राही दिली .
शिवरायांच्या नावे पुण्यातून जहागिरीचा कारभार सुरू झाला . रयत सुखावली . लोकांना शिवरायांबद्दल विश्वास वाटू लागला .
तान्हाजी मालुसरे , येसाजी कंक , सूर्याजी काकडे , गोदाजी जगताप , बाजी जेधे या आपल्या सवंगड्यांसह शिवरायांनी रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली .
वीर बाजी पासलकरांच्या नेतृत्वात स्वराज्याच्या झेंड्याखाली पुणे प्रांतातील पासलकर , जेधे , बांदल , जगताप , काकडे , शितोळे , कोंडे , शिळीमकर , मारणे , निगडे , ढमाले , पायगुडे , धुमाळ , मरळ , खोपडे ,ढमढेरे वगैरे देशमुख वतनदार आपल्या मावळी सेनेसह एकत्र आले .
शिवराय व त्यांच्या सवंगड्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा व कोंढाणा किल्ले ताब्यात घेतले आणि राजगड किल्ल्याचे बांधकाम चालू केले या बातम्या विजापूरला आदिल शहाच्या कानी गेल्या .
याच सुमारास शहाजीराजे कर्नाटकातील मोहिमेवर होते . तेथील छोटी छोटी स्वतंत्र राज्ये टिकून रहावीत असे शहाजीराजेंना वाटत असे . शक्यतो तह व कराराने ही राज्ये टिकवण्याचा शहाजीराजेंचा प्रयत्न असे . यामुळे या सर्व राजे लोकांना शहाजीराजेंबद्दल आपुलकी व आदर वाटू लागला . शहाजीराजांचे वाढते महत्व त्यांच्या विरोधकांना खटकू लागले . त्यांनी बादशहाकडे कागाळ्या केल्या .
आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात कपटाने कैद करविले व इकडे पुण्याला शिवरायांना पकडण्यासाठी विजापूरहून फत्तेखानाला पाच हजार फौजेनिशी रवाना केले .
शहाजीराजांना कैद केल्यामुळे शिवराय मोठ्या पेचात सापडले . स्वराज्याचा हट्ट धरावा तर वडीलांच्या जिवाला धोका व वडीलांना सोडवायला जावे तर स्वराज्यावर पाणी सोडावे लागणार .
अखेर सर्व सवंगड्यांशी सल्लामसलत केल्यावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते ही पुरंदर किल्ल्यावरून लढण्याचा .
परंतु पुरंदर किल्ला यावेळेस आदिलशहाच्या ताब्यात होता . गडाचे किल्लेदार होते महादजी सरनाईक . शहाजीराजेंचे व महादजींचे जिव्हाळ्याचे संबंध होते . महादजींनी शिवरायांसाठी गडाचे दरवाजे उघडले व गड शिवरायांच्या ताब्यात दिला .
राजे सर्व फौजेनिशी पुरंदरावर आले . राजांचे हे सैन्य जेमतेम एक हजार ते बाराशे असावे . पुरंदरवरच्या पोरांनी कंबर आवळली . गोदाजी जगताप , बाजी जेधे , संभाजी काटे , बाळाजी शिळीमकर , शिवाजी इंगळे वगैरे वीर सज्ज झाले . सर्वांच्या पुढे होते वीर बाजी पासलकर .
फत्तेखानाचा मुक्काम पुरंदर जवळ बेलसरला होता . शिवाजीराजांच्या फौजेच्या एका तुकडीने एके दिवशी रात्री फत्तेखानाच्या छावणीवर अचानक हल्ला केला व ती तुकडी पुरंदरवर पसार झाली . या हल्ल्यामुळे फत्तेखान चिडून सर्व फौजेनिशी पुरंदरवर चालून आला .
पुरंदरवर राजे स्वतः व बाजी पासलकर , गोदाजी जगताप आणि राजांची सेना सज्ज होती . गोदाजी तर केवळ रणचंडिकेचा अवतार होते !
फत्तेखानासोबत भरपूर सैन्य, मुबलक युध्द साहित्य व अनुभवी सरदार होते . इकडे गडावर साराच पोरखेळ . राजांचे वय यावेळी होते फक्त अठरा वर्षे व बाजी काका सोडले तर बाकी सर्व साथीदारही याच वयाचे होते .
फत्तेखानाचे सैन्य पुरंदर किल्ल्यावर चढू लागले .एका विशिष्ट टप्प्यावर गनीम आल्यावर राजांनी इशारत केली आणि मावळे शत्रूवर तुटून पडले .
गडावर युध्द साहित्याची कमतरता होती . मावळ्यांनी गोफणीतून दगडांचा वर्षाव सुरू केला व गडावरून मोठ्या आकाराचे धोंडे खाली ढकलण्यास सुरवात केली . त्या खाली बरेच शत्रु सैन्य गारद झाले .
राजांचे सैन्य गडाचा दरवाजा उघडून शत्रूवर चालून आले . घनघोर लढाई सुरू झाली !
खानाच्या सैन्यात आघाडीला प्रमुख सरदार मुसेखान होता . त्याच्या सोबत मताजी घाटगे , रतनशेख व मिनादशेख हे सरदार होते . त्यांच्या मागे खासा फत्तेखान होता .
महाराजांचे सैन्य मोठ्या इर्षेने लढत होते . गोदाजी जगताप , बाजी जेधे , संभाजी काटे , शिवाजी इंगळे व बाजी पासलकर बेधुंद झाले होते !
गोदाजी जगतापांनी आघाडीवर असलेल्या खुद्द मुसेखानालाच गाठले ! घोर रणसंग्राम सुरू झाला . एकमेकांवर तलवारीचे जबरदस्त घाव पडू लागले . जणू काही आभाळातून वीजा कडाडत आहेत असा भास निर्माण होऊ लागला !
लढता लढता गोदाजींनी मुसेखानाच्या छाताडात खचकन भाला खुपसला ! पण तो मुसेखानही असा जबर बहाद्दर होता की त्याने दोन्ही हातांनी आपल्या छातीत घुसलेला भाला उपसला ! आणि संतापाने त्या भाल्याचे दोन तुकडे करून टाकले ! त्याने तलवारीने गोदाजींशी युध्द सुरू केले . कुर्हाडीच्या घावासारखे एकमेकांच्या ढालीवर घाव पडू लागले ! दोघेही पराक्रमाची शर्थ करीत होते .
एवढ्यात गोदाजी जगतापांनी मुसेखानाच्या खांद्यावर इतका जबरदस्त घाव घातला की खांद्यापासून पोटापर्यंत खानाच्या शरीराची फाकळी उडाली ! मुसेखान पडला !
आणि .... फत्तेखानाच्या फौजेचा धीरच सुटला . खुद्द फत्तेखान व त्याचे सरदार सैन्यासह पळत सुटले !
महापराक्रमी गोदाजी जगताप व त्यांच्या सहकार्यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने बलाढ्य फत्तेखानाचा पराभव केला आणि स्वराज्याच्या पहिल्या लढाईत विजय मिळवला .
१० आॅगस्ट १६४८ रोजी झालेल्या या ऐतिहासिक लढाईचे नेतृत्व स्वतः शिवरायांनी केले होते . आदिलशहा व शिवरायांचे बळ यामधे सैन्याची संख्या , युध्द साहित्य , अनुभव या सर्वच बाबतीत असमानता होती . पुरंदर किल्ल्यावर झालेल्या या स्वराज्याच्या पहिल्याच लढाईत शिवराय व त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवला .
या लढाईतील विजयाचे दूरगामी परिणाम झाले . स्वराज्यातील रयतेचा व सैन्याचा आत्मविश्वास वाढला . शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी मिळणारा पाठिंबा वाढला . स्वराज्य स्थापनेची वाटचाल सुकर झाली . एवढेच नाही तर या विजयाने स्वराज्याचा पायाच रचला गेला .
मात्र या विजयाला एक गालबोट लागले शत्रु सैन्याचा पाठलाग करताना सासवड जवळ झालेल्या चकमकीत वीर बाजी पासलकरांना वीरगती प्राप्त झाली .
थोर सेनानी वीर बाजी पासलकरांना विनम्र अभिवादन ! आणि महापराक्रमी गोदाजी जगताप व त्यांच्या सहकार्यांना त्रिवार वंदन !!!
लेखक —
*अजयकुमार जगताप*
No comments:
Post a Comment