विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 November 2020

विश्वासराव पेशवे :

 


विश्वासराव पेशवे :

(२२ जुलै १७४२ – १४ जानेवारी १७६१).
मराठा साम्राज्यातील सेनानी. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाई यांचा मुलगा. त्यांचा जन्म पुणे येथे शनिवारवाड्यात झाला.
त्यांची मुंज मार्च १७४९ मध्ये झाली. मे १७५० मध्ये पटवर्धन घराण्यातील लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले. सिंदखेड स्वारीमध्ये असताना दत्ताजी शिंदे हे त्यांचे कारभारी होते. जनकोजी शिंदे हेदेखील त्या मोहिमेत होते. जनकोजी व विश्वासराव हे समवयस्क मित्र होते.ऑक्टोबर १७५७ मध्ये औरंगाबाद व सिंदखेडा येथे मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. त्यावेळी या युद्धात विश्वासराव हजर होते.
निजाम अलीसोबत जानेवारी १७६० मध्ये झालेल्या उदगीर येथील लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंच्या बरोबर विश्वासरावदेखील होते. त्यांनी या युद्धाच्या वेळी हत्तीवर बसून कमालीची तिरंदाजी केली.
१४ मार्च १७६० मध्ये मराठी फौजा सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात निघाल्या, तेव्हा विश्वासरावांचे वय अवघे १८ वर्षांचे होते. विश्वासरावांच्या हाती स्वतंत्र अशी दहा हजारांची फौज पानिपतच्या युद्धात होती.
पानिपतच्या भूमीवरून विश्वासराव यांनी वडील नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले एक पत्र हृदयाचा ठाव घेणारे आहे. त्यामध्ये ते लिहितात की, ‘फौज व खजिना पाठविणे. मी आपल्यासाठी लिहित नाही, माझ्यासारखे पुत्र आपल्यास आणखी आहेत व होतील; परंतु भाऊसाहेबांसारखा बंधु मिळणार नाही.ʼ
पानिपतच्या रणभूमीवर १४ जानेवारी १७६१ रोजी सदाशिवराव भाऊ मराठी सैन्याच्या मध्यभागी प्रथम हत्तीवर बसून लढत होते. सकाळी लढाई सुरू झाली. त्यावेळी विश्वासराव हत्तीवरून लढत होते. दुपारी हत्तीवरून उतरून ते दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले. मात्र याचवेळी तिसऱ्या प्रहरी गोळी लागून ते धारातीर्थी पडले.
त्यावेळी सदाशिवराव भाऊ जवळच लढत होते. त्यांनी विश्वासरावांचे पार्थिव हत्तीवरील अंबारीत ठेवले. बापूजी हिंगणे ते पार्थिव धरून बसले. विश्वासराव पडताच मराठी सैन्याचा धीर खचला. सैन्यात पळापळ सुरू झाली. सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत घुसले व तेही दिसेनासे झाले.
युद्धानंतर शुजाउद्दौलाने विश्वासरावांचे पार्थिव ताब्यात घेतले. अब्दालीने स्वार पाठवून ते पार्थिव पाहण्यासाठी आपल्या छावणीत आणले. अठरा वर्षांच्या मिशीही न फुटलेल्या सुंदर तरुणाचे प्रेत पाहून सर्वांनाच हळहळ वाटली.
शुजाच्या विनंतीवरून ते त्याच्या छावणीत परत आणून त्याचे शास्त्रोक्तपणे दहन करण्यात आले.
पानिपतावर पडलेल्या या पेशव्याला मानाचा मुजरा!!
©maratha_riyasat

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...