------------------------------
"कैलासी जाण्याचे रावांचे हे वय नव्हे..परंतु ईश्वरी इच्छा प्रणाम.."
कार्तिक वद्य अष्टमी शके १६९४, नंदननाम संवत्सरी म्हणजेच १८ नोव्हेंबर, बुधवार, १७७२ रोजी माधवरावांच्या मृत्यू झाला.
त्यानंतर पेशवा नारायणराव बल्लाळ यांचा कार्यकाळ होता १७७२-१७७३ चा. पेशवाईची वस्त्रे मिळाली तेव्हा नारायणराव १७ वर्षांचे होते. लहानपणापासून आपल्या आई गोपिकाबाईबरोबर राहिल्यामुळे अध्यात्म,संस्कृत अशा विषयांमध्ये नारायणराव तरबेज झाले होते. परंतु राजकारणाचे धडे जे त्यांना मिळायला हवे होते ते मिळाले नाहीत. कधी कधी माधवराव त्यांना उपदेश देण्याचा प्रयत्न करत असत तरीही नारायणरावांच्या मनातील अल्लडपणा, पोरपणा गेला नव्हता.
नारायराव नेहमी माधवरावांसारखे वागायला बघत असत. माधवरावांचा स्वभाव कडक,तडफदार होता तरीही स्वतःची काही चूक असेल तर मोठ्या मनाने ते मान्यही करत असत. पण नारायणरावांनी असं वागून अनेकांना दुखावले होते. "श्रीमंतांची मर्जी फारच उतावीळ आहे." यावरून त्यांचा उतावीळपणा सुद्धा दिसत आहे.
रघुनाथराव आणि नारायणराव एकमेकांशी सख्याने वागत असत. परंतु वरवरच! गोपिकाबाईंनी नारायणरावांना रघुनाथरावांपासून सांभाळून राहण्यास आणि नाना फडनवीसांच्या सल्ल्याने वागण्यास सांगितले होते परंतु नारायणरावांनी याकडे दुर्लक्ष केले.
नारायणरावांनी रघुनाथरावांना नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे राघोबादादा नाराज होते. सखारामबापूंना कारभारी पदावरून काढून ते पण नाना फडणवीस यांना दिल्यामुळे सखाराम बापू ही नाराज होते. याच दरम्यान नारायनरावांनी एका खटल्यात चंद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या विरोधात निवाडा केला आणि त्यांच्यावर अनेक बंधन घातली त्यामुळे ते ही नाराज होते. या सगळ्यातूनच उदयाला आला नारायणरावांना पकडण्याचा आणि रघुनाथरावांना पेशवा बनवण्याचा कट!
नारायणरावांना पकडण्याचे काम देण्यात आलं शनिवारवाड्याच्या पहऱ्यावर असणाऱ्या गारद्यांचा प्रमुख सुमेरसिंग आणि बहादूरशहा इत्यादी लोकांना.
भाद्रपद शु. द्वादशी दिवशी 'तीन लक्ष रुपयांच्या बदल्यात नारायनरावांस धरावे' या पत्रावर रघुनाथराव आणि सुमेरसिंगच्या स्वाक्षऱ्या झाल्या. इकडे नारायणरावांना त्यांच्या विश्वासू हेराने या धोक्याबद्दल बातमी दिली होती पण पेशव्यांनी दुर्लक्ष केले. पण काही वेळातच त्यांना ७-८०० गारदे येताना दिसले. नारायणरावांच्या बाजूलाच रघुनाथरावांचा बदामी बंगला होता. पेशवा तिकडे गेले."दादासाहेब वाचवावे! पायाशी घ्यावे.." अशा विनवण्या नारायणराव राघोबादादांना करायला लागले.
तेवढ्यात सुमेरसिंग आला. "रावास सोडा नाहीतर तुम्हा दोघांनाही ठार करू.." ही धमकी त्याने राघोबादादांना दिली. दादा दचकले, कारण करार फक्त पकडण्याचा झाला होता. पण सुमेरसिंगाने धमकी देताच राघोबादादांनी नारायणरावांना आपल्या मिठीतुन सोडवले. सुमेरसिंगाने पेश्वयांना धरून, फरफटत चौकात आणले. तेवढ्यात नारायणरावांचा हुजऱ्या चापजी टिळेकर, इच्छाराम ढेरे , नारोपंत फाटक इत्यादी मंडळी पेशव्यांना वाचवण्यासाठी पुढे आली. आणि मारली गेली. आणि लगेचच सुमेरसिंगाने क्षणार्धात त्याची तलवार नारायणरावांच्या गळ्यावरून फिरवली.
अठरा वर्षांचे नारायणराव मारले गेले. "आपल्याला निम्मे राज्य वाटून घ्या आणि जर असं केलं नाही तर तुम्हालासुद्धा मारून समशेर बहाद्दर चा मुलगा अली बहाद्दर याला गादीवर बसवू"' अशी धमकी सुमेरसिंगाने राघोबादादांना दिली. शेवटी ३ लाखांऐवजी ८ लाख रुपये देण्याचे कबुल केल्यानंतर गारद्यांनी शनिवारवाडा सोडला.
भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शके १६९५, विजयनाम संवत्सरी, सोमवार, ३० ऑगस्ट १७७३ रोजी नारायनरावांचा खून झाला.
हा सगळा प्रकार घडत असतानाच राघोबादादांच्या पत्नी आनंदीबाईंनी नारायणरावांच्या गरोदर पत्नी गंगाबाईस आपल्या महालात लपवून घेतले. जेणेकरून गारद्यांनी तिला धक्का पोचवू नये! होय, बरोबर वाचलत. ध चा मा झालाच नव्हता. मोडी लिपीमध्ये ध आणि मा ही पूर्ण वेगळ्या वळणाची अक्षरे आहेत.
त्यावेळचे प्रसिद्ध जज रामशास्त्री प्रभुणे यांनी लिहिले आहे की, 'या राज्यात स्त्री ला शिक्षा होत नसल्यामुळे कटात सामील असलेल्या मुत्सद्यांनी कटाचे खापर आनंदीबाईंवर ठेवले.'
अशाप्रकारे नारायणरावांचा खून महाराष्ट्राच्या इतिहासात आणखी एक दुर्दैवी दिवस म्हणून नोंदला गेला.
संदर्भ - पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे.
No comments:
Post a Comment