या लेण्यातील प्रलंबपाद आसनातील बुद्धाची भव्य मूर्ती, मकरवाहन, गंगेची मूर्ती, गंधर्व-अप्सरांची मिथुन शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण असून गौतम बुद्धाच्या चरित्रातील घटनांना अनुलक्षून क्रमाने ती काढली आहेत. चित्रांतील गौतमाची ज्ञानप्राप्ती, अवकाशगामी अप्सरा,नंदाचा धर्मप्रवेश इ. चित्रे लक्षणीय असून त्यांची स्तुती अनेक कलाकोविदांनी मुक्त कंठाने केली आहे. बुद्धाचा मावसभाऊ नंद याने भिक्षू होण्याचे ठरविल्यावर त्याचा सेवक त्याचा मुकुट घेऊन त्याची पत्नी सुंदरी हिच्याकडे येतो. तेव्हा सुंदरी हताश होऊन मरणोन्मुख होते. या ग्लानी येऊन मूर्च्छित झालेल्या सुंदरीचे चित्र कला इतिहासातील एक अप्रतिम कलाकृती आहे. याशिवाय येथे हस्तिजातक, महाउग्मगजातकादी कथांतील प्रसंग चित्रित केलेले आहेत. स्त्रियांच्या गळ्यांतील अलंकार, बोटांतील अंगठ्या, हातांतील बांगड्या आणि केशरचनेचे विविध प्रकार ह्यांतून तत्कालीन दागिन्यांचे नमुने आणि सौंदर्यप्रसाधनांची साधने दृग्गोचर होतात.

लेणे क्रमांक सतरा हे ॠषिक राजाने आपल्या भावाच्या स्मरणार्थ खोदले असावे, असे एक मत आहे. हे लेणे प्रामुख्याने बौद्ध भिक्षुंच्या निवासासाठी खोदलेला विहार असून हरिषेणाच्या एका मांडलिकाने ते दान केल्याची माहिती या लेण्यातील लेख सांगतो. या लेण्यात मुख्यत्वे बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या जातककथांतील सुंदर चित्रे आहेत. त्यात मानवी सद्गुणांच्या कथांवर अधिकतर भर दिला असून ओवरीच्या छतांवर पुष्पालंकाररचना चितारलेल्या आहेत. ओवरीच्या मागील बाजूस भिंतीवर विश्वंतर जातकातील कथा चित्रित केली आहे. या ठिकाणी विश्वंतर भिक्षा देत असून ती स्वीकारण्यासाठी अनेक याचकांनी गर्दी केली आहे, असे दाखवून चित्रकाराने त्याचे व त्याच्या पत्नीचे वनवासगमन, आकाशातून उडत येणारा इंद्र व त्याच्या अप्सरा यांची अत्यंत मनोवेधक चित्रे चितारलेली आहेत. पडवीच्या प्रवेशद्वाराजवळ छद्दंत जातककथेतील चित्रे असून त्यांत कोचावरील राणी, तिच्या दास-दासी, जवळचे प्रशांत सरोवर, सहा दातांचा हत्ती, व त्याच्या पाठीवरील लांडगा इ. चित्रे आहेत. या लेण्यात महाकपी, हंस, विश्वंतर, सुत्तसोम इ. जातककथांतील प्रसंग चित्रित केले आहेत. बुद्धाचे महाबोधी प्राप्तीनंतरचे चित्र त्यांतील शांत, तेजस्वी भावांमुळे उठून दिसते, तर बुद्धाचे स्वागत करणारी पत्नीयशोधरा व मुलगा राहुल हे चित्र त्यांतील करूणरसांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
गुहा क्रमांक एकोणीस ही येथील चार चैत्यलेण्यांपैकी एक चैत्य असून तेथे प्रामुख्याने कोरीवकाम आढळते. या गंधकुटीतील स्तूपात दोन स्तंभांवरील कमानींत बुद्धाची उभी मूर्ती खोदली आहे. या चैत्यात दोन लहान मंदिरे असून उजव्या गर्भगृहात वर्तुळाकार स्तंभ असेल, तरी त्यांची स्तंभशीर्षे चौकोनी आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर प्रलंबपाद आसनातील एक बुद्धाची मूर्ती आहे. चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंस यक्षमूर्ती खोदल्या असून भिंतींवर बुद्ध प्रतिमा रंगविल्या आहेत. येथे अनेक मिथुन मूर्तीही आहेत. क्रमांक सतराप्रमाणेच येथे बुद्ध, यशोधरा व राहुल यांची चित्रे आहेत. त्याच्या उजवीकडे भिक्षा मागणारा बुद्ध, नागराज, त्याची राणी इत्यादींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. स्तूपाचा आकार अर्धअंडाकृती आहे. यातील सर्व कोरीवकाम दगडात आहे. तज्ञांच्या मते हे लेणे भारतातील बौद्ध कलेचा सर्वागपूर्ण असा अत्युत्कृष्ट आविष्कार आहे.
अजिंठ्याच्या पश्चिमेस सु. सोळा किमी. वर जंजाल गावाजवळ घटोत्कच या नावाने प्रसिद्ध असलेली तीन विहार-लेणी होती. त्यांपैकी दोन अवशिष्ट आहेत. हरिषेणाचा मंत्री वराहदेव याने ती खोदून घेतली, असे तेथील लेखात म्हटले आहे. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला एक खंडित लेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवातीपासूनची वंशावळ दिली आहे. मोठ्या लेण्याच्या द्वारशाखेवर शिल्पांकन आहे. तीत उभ्या बुद्धमूर्ती, मिथुने कोरलेली असून छावणीच्या उंचीवर दोन्ही बाजूस एक-एक देवता आहे. आतील मंडपात चैत्य मंदिर आहे. अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ‘ये धर्मा हेतुप्रभवः’ असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही.
वरील लेण्यांव्यतिरिक्त वाकाटकांनी काही मंदिरे बांधली. त्यांपैकी रामटेक येथील श्रीरामचंद्राचे, प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे, अश्वत्थखेटकातील विष्णूचे आणि दुसऱ्या प्रवरसेनाने बांधलेले श्रीरामचंद्राचे उत्तुंग मंदिर ही प्रसिद्ध आहेत. ही बहुतेक सर्व मंदिरे अभिलेखशेष झाली आहेत मात्र त्यांचे भग्न अवशेष आढळतात. या अवशेषांत रामटेक येथील वराह दरवाज्याच्या ईशान्येस एक भग्न अवस्थेत मंदिर आहे. तेथे फक्त जीर्ण लहान मंडप असून त्याचे छत सपाट आहे. त्याला सहा स्तंभ असून चारांवर पद्मबंधक खोदलेले आहेत. त्याच्या शेजारी चतुर्भुज त्रिविक्रमाची सुंदर मूर्ती भग्नावस्थेत आहे. तिच्या शिरावर किरीटमुकूट असून सभोवती तेजोवलय दाखविले आहे. कानात कुंडले आणि गळ्यात पदकासहीत मुक्ताहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दाखवली असून अधोवस्त्र रशनेने बांधले आहे. त्रिविक्रमाची उभी राहण्याची ढब आणि त्याच्या मुद्रेवरील निश्चय यांतून या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होते.
प्रवरपुर (पवनार) येथील भग्नावशेष विनोबाजींच्या आश्रमाच्या आवारात एका झोपडीत (भरतभेट) ठेवले असून त्यांमध्ये रामजन्म, वनवासगमन, भरतभेट, सुग्रीव-वालियुद्ध, वालिवध असे रामायणातील कथाप्रसंग विशद करणारे काही शिल्पपट्ट आहे. यांशिवाय येथे एक अतिशय गतिमान अंधकासुर वध मूर्तीचा शिल्पपट्ट आहे. भरतभेट या शिल्पपट्टात राम-सीता, लक्ष्मण, भरत यांच्या लक्षणीय मूर्ती असून त्यांच्या चेहऱ्यांवरील भाव प्रसंगानुरूप दर्शविले आहेत. रामाची मुद्रा गंभीर असून लक्ष्मणाने मात्र उदासीन होऊन तोंड फिरविले आहे. वालिवध या दुसऱ्या शिल्पपट्टात रामाच्या बाणाने घायाळ झालेला वाली रक्तस्त्रावाने व्याकुळ झाला आहे. राम प्रत्यालीढ आसनात उभा आहे. त्याच्या मुद्रेवर तिरस्कारयुक्त अभिमान दिसतो.

दुसरे मंदिर विंध्यप्रदेशात नाचना कुठारा या गावी आहे. येथे वाकाटक नृपती दुसरा पृथिवीषेण याचा मांडलिक उच्चकल्पवंशी व्याघ्रदेव याचा शिलालेख मिळाला. त्यावरून तो भाग वाकाटकांच्या आधिपत्याखाली होता, असे अनुमान वा. वि मिराशी काढतात. साहजिकच येथील पार्वतीचे मंदिर वाकाटककालीन असावे. त्याप्रमाणे हेही मंदिर सपाट छपराचे असून गर्भगृहद्वाराच्या चौकटीच्या आतील पट्टीवर नक्षीकाम असून बाहेरील शिल्पपट्टात दंपतिशिल्पे आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूंस तिगव्याप्रमाणेच गंगा-यमुनांच्या मूर्ती आहेत. प्रदक्षिणापथाच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूंस सिंह, अस्वल, हरिणे, मोर,माकडे इ. पशु-पक्षी आणि यक्षगण, सुरसुंदरी इत्यादींच्या मुर्ती खोदल्या आहेत. एका ठिकाणी गोवर्धन पर्वत-उद्धाराचा शिल्पपट्ट दिसतो. मागील भिंतींवर नाग-नागी आणि नाग बालक यांच्या मूर्ती आहेत.तिगवा व नाचना कुठारा येथील मंदिरे ही प्रामुख्याने उत्तरेकडील वाकाटक-गुप्तकालीन वास्तुशैलीतील वाकाटक साम्राज्याबाहेरील मंदिरे आहेत मात्र बाकाटकांच्या कलेचे वस्तुनिष्ठ दर्शन अजिंठ्याच्या गुहा क्र. सोळा, सतरा व एकोणीस तसेच विदर्भातील अवशिष्ट भग्न अवशेषांतुन घडते.
संस्कृत व प्राकृत वाङ्मयाला वाकाटकांच्या काळी अतिशय बहर आला होता. तत्कालीन संस्कृत काव्यांवरून वैदर्भीनामक विशिष्ट रीती किंवा शैली प्रसिद्धीस आली. दंडी, वामन वगैरे आलंकारिकांनी तिची सर्वगुणयुक्त अशी प्रशंसा केली आहे. तिच्या गुणांमुळे कालिदासादी अन्य देशीय कवींनीही त्याच शैलीत आपली काव्ये रचली. कालिदासाचे मेघदूत हे सुधामधुर काव्य या काळात विदर्भात रचले गेले. स्वतः वाकाटक नृपतींनी प्राकृतात उत्कृष्ट काव्यरचना केली. दुसऱ्या प्रवरसेनाचे सेतुबंध हे काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचलेले अद्यापी उपलब्ध आहे. त्यात सेतुबंधापासून रावणवधापर्यंतचे रामचरित पंधरा आश्वासांत (सर्गांत) वर्णिले आहे. या काव्याची बाणभट्ट, दंडी, आनंदवर्धन इत्यादिकांनी अत्यंत स्तुती केली आहे. या काव्याच्या रचनेत महाराजाधिराज विक्रमादित्याच्या आज्ञेने कालिदासाने प्रवरसेनास मदत केली, अशी आख्यायिका एका प्राचीन टीकाकाराने उल्लेखिली आहे. ती अंतस्थ पुराव्यावरून खरी वाटते. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याने हरिविजय नामक उत्कृष्ट काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचले होते, असे संस्कृत काव्यालंकार ग्रंथातील अनेक उल्लेखांवरून आता ज्ञात झाले आहे. त्यामध्ये कृष्णाच्या पारिजातहरणाचे कथानक घेतले होते. याचीही अनेक आलंकारिकांनी स्तुती केली आहे. याशिवाय प्रवरसेन, सर्वसेन इ. वाकाटक नृपतींनी कित्येक सुंदर प्राकृत सुभाषिते रचली होती. त्यांपैकी काही नंतर गाथासप्तशतीत घालण्यात आली.
पहा : अजिंठा गुप्तकाल प्रभावती-गुप्ता.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.
2. Yazdani, Gulam, Ed, TheEarly History of the Deccan, London, 1960.
३. मिराशी, वा. वि. वाकाटक नृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५७.
४. सांकलिया, ह. धी. माटे, म. श्री. महाराष्ट्रातील पुरातत्त्व, मुंबई, १९७६.
मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.




No comments:
Post a Comment