विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 17 April 2021

बाळाजी विश्वनाथ पेशवे

 


बाळाजी विश्वनाथ पेशवे
🚩
कोकणातील श्रीवर्धनची देशमुखी असलेल्या भट घराण्यात बाळाजी विश्वनाथ यांचा जन्म झाला. बाळाजी १६७९ मध्ये कोकण सोडून देशावर आले. लवकरच ते सेनापती धनाजी जाधव यांच्याकडे दाखल झाले. महाराष्ट्रात या काळात स्वतः औरंगजेब प्रचंड सैन्यानिशी मराठा राज्य नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत होता .मोगल महाराष्ट्रात आले होते त्या सुमारास बाळाजी हे पुणे प्रांताचे सर सुभेदार होते .सेनापती धनाजी जाधव यांच्या हाताखाली या प्रांताच्या वसुलीचे काम बाळाजी करीत होते.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या कैदेतून मुक्त होऊन छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रात आले त्यावेळी मराठ्यांमध्ये महाराणी ताराराणी व शाहू महाराज असे दोन तट पडले. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांच्या सेवेत आले.१७०७ च्या खेडच्या लढाईत ताराराणी यांच्या पक्षात असणारे धनाजी जाधव ऐनवेळी शाहू राजांकडे आले .या योजनेत बाळाजींचा महत्त्वाचा भाग होता .शाहूराजे विजयी झाले त्यानंतर अनेक मराठे सरदार शाहुराजांना सामील होऊ लागले.१७१० मध्ये सेनापती धनाजी जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र चंद्रसेन जाधव सेनापती झाले .
धनाजी जाधवांतर्फे कारभार व वसुलीचे काम पाहणाऱ्या बाळाजींचे व चंद्रसेनांचे वसुलीच्या कारणामुळे बिनसले .चंद्रसेनानी बाळाजीवर हल्ला करून त्यांचा पाठलाग चालू केला व शाहू महाराजांच्या हुकुमाची अवज्ञा केली. शाहू महाराजांनी बाळाजी यांची बाजू योग्य आहे हे पाहून त्यांना पाठिंबा देताच चंद्रसेन जाधव ताराराणींना मिळाले. बाळाजी विश्वनाथांकडे पुरेशी फौज नसल्याने शाहू महाराजांनी त्यांना १७११ मध्ये 'सेनाकर्ते ' पद देऊन फौज तयार करायला आज्ञा केली. शाहूमहाराजां विरुद्ध कारवाया करणाऱ्या कृष्णराव खटावकर यांचा बाळाजींने पिलाजी जाधव व श्रीपतराव प्रतिनिधी यांचे सहाय्य घेऊन मोड केला .दुसरे जबरदस्त शाहूराजा विरोधी सरदार दमाजी थोरात यांच्यावर बाळाची चालून गेले तेव्हा दमाजींनी भेटीची बोलणी लावून विश्वासघाताने बाळाजींना कैद केले.अखेर दंड घेऊन दमाजींनी बाळाजींची मुक्तता केली. त्यानंतर दमाजीने नारो शंकर सचिवांना कैद करून पुन्हा मोठा दंड वसूल केला. यामुळे संतापून शाहू महाराजांनी मोगल सुभेदार सय्यद हुसेन यांची फौज व तोफखाना तसेच पिलाजी जाधवांना बाळाजींबरोबर दमाजींचा मोड करण्यास पाठविले. या सैन्याने दमाजींचा हिंगणगावच्या गढीवर आक्रमण करून पराभव केला.दमाजी थोरातांना कैद करण्यात आले. अखेर कैदेतच दमाजी थोरात मरण पावले. ताराराणी यांच्या पक्षातील सरखेल कान्होजी आंग्रे हे मोठे सामर्थ्यवान सरदार होते. त्यांच्याविरुद्ध त्यांच्याविरुद्ध शाहू महाराजांनी पेशवे बहिरोपंत पिंगळे यांना पाठवले असता कान्होजींनी बहिरोपंतांचा पराभव करून त्यांना कैद केले .तेव्हा बाळाजी विश्वनाथ यांना शाहू महाराजांनी कान्होजी विरूद्ध पाठवले .कान्होजींच्या सामर्थ्याची जाणीव असलेल्या बाळाजींने युद्धाऐवजी कान्होजींची भेट घेऊन अत्यंत हुशारीने कान्होजींना शाहू महाराजांच्या पदरी सेवेत आणले.या अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीने प्रसन्न होऊन शाहूमहाराज यांनी बाळाजी विश्वनाथांना १७१३ मधे पेशवे पद दिले.
बाळाजींना पेशवेपद मिळाले त्यावेळी गुजरातेत दाभाडे, माळव्यात पवार, खानदेशात कदम बांडे,आणि वर्हाडा प्रांतात भोसल्याचा जम बसत चालला होता. या सर्व सरदारांनी मराठा सत्ता एक सामर्थ्यवान शक्ती म्हणून उदयाला आणली होती.मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी या परिस्थितीचा अचूक फायदा उचलला. शाहू महाराज महाराष्ट्रात आले त्याच वेळी मोगलांनी त्यांना शिवरायांचे स्वराज्य व इतर काही प्रांताचा अधिकार दिला होता .पण अद्याप त्या अधिकाराच्या संनदा बादशहाकडून मिळाल्या नव्हत्या .मोगल सुभेदारां मधील सत्तास्पर्धा व मोगल बादशहाचा कमकुवतपणा यांनी बाळाजींना हवी ती संधी प्राप्त झाली .दिल्लीच्या बादशाहीवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या सय्यद बंधूंनी शंकराजी मल्हार ह्यांच्यामार्फत शाहूमहाराजांशी बोलणी करून दिल्लीच्या राजकारणात मदत करण्याची विनंती केली.
शाहू महाराजांनी तत्काळ बाळाजी विश्वनाथांना सैन्य देऊन सय्यद यांना मदत करून आपल्याला पूर्वी मोगलांनी कबूल केलेल्या प्रांताच्या संनदा बादशाहीच्या शिक्यासह आणायच्या व आपल्या मातोश्री येसूबाई साहेब यांना मोगलांच्या बंदीतून सोडवून आणण्याच्या महत्त्वाच्या कामगिरीवर १७१८ मधे बाळाजी विश्वनाथांना दिल्लीला रवाना केले.
बाळाजींनी अत्यंत हुशारीने दिल्लीच्या राजकारणाचा अंदाज घेऊन सय्यद बंधूंना नवीन बादशहा गादीवर स्थापण्यास मदत करून त्या बादशहाकडून शिवरायांनी मिळवलेल्या स्वराज्यासह भारतात मराठ्यांनी आजपर्यंत जिंकलेला प्रदेश मराठ्यांनाच मिळावा अशी सनद मिळवली व त्याशिवाय दक्षिणेतील सहा सुभ्यांच्या चौथाई व सरदेशमुखी वसुलीचा अधिकारही मिळवला.ह्या बदल्यात शाहू महाराजांनी पंधरा हजार फौज दिल्लीच्या रक्षणासाठी ठेवावी व वार्षिक १५ लाखांची रक्कम बादशहाला द्यावी असा करार केला.इंग्रजांनी नंतरच्या काळात चालू केलेल्या तैनाती फ़ौजेच्या तहासारखाच हा प्रकार होता .आता बादशहाच्या नावे मराठे आपला सत्ताविस्तार करायला अधिकृत झाले. मराठा सत्तेचा विस्तार होण्याचा मार्ग पेशवे बाळाजी विश्वनाथाच्या हुशारीचा वापर करून शाहू महाराजांनी मोकळा करून घेतला.
स्वराज्यातील दोन गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडू नये म्हणून बाळाजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांची मती गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्यांनी शब्दसामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्त्वाचे. १७०७ पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणेष सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले. अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्यानी सहजपणे पेलले.
बाळाजी मोहिमेवरून परत आले व लवकरच २ एप्रिल १७२० मध्ये सासवड येथे मरण पावले त्यांची समाधी सासवड मध्ये सध्या सुस्थितीत आहे
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ
मराठ्यांची धारातीर्थे
लेखक : प्रवीण भोसले

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...