विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 28 April 2021

राऊ!

 


राऊ!
मराठेशाहीचा डंका नर्मदेपार थेट दिल्लीपर्यंत पिटण्याचा पराक्रम गाजवणाऱ्या व आपल्या २० वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल ३६ लढाया जिंकणाऱ्या श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ भट उर्फ राऊ यांचा आज स्मृतिदिन.
१७४०मध्ये आजच्या दिवशी बाजीराव पेशवे यांचे मध्य प्रदेशात हिवतापाने निधन झाले. त्यावेळी ते जेमतेम ४० वर्षांचे होते. वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांना छत्रपती शाहू महाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. आपल्या कारकिर्दीत ते सातत्याने लढतच राहिले.
बाजीराव व त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर उत्तरेत मोगल व पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांना जेरीला आणून मराठेशाहीची पताका सर्वत्र फडकवली.
रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्यात तरबेज होते. बाजीराव पेशव्यांनी मैदानी युद्धे जिंकून मराठा सैन्याचा आत्मविश्वास वाढवला.
शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनीही पराक्रम गाजवत मराठेशाहीची इभ्रत वाढवली. कट्टर हिंदुभिमानी असलेल्या शंभु महाराजांनी औरंगजेबाला शरण जाण्यास नकार देत हौतात्म्य पत्करले.
त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबास रोखले व तब्बल २७ वर्षे झुंजवले. त्यानंतर बाजीराव पेशवांसारखा 'विजयी योद्धा' महाराष्ट्राला लाभला.
बाजीराव पेशव्याचे वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्यही वादळीच होते. बुंदलच्या छात्रसाल राजांना त्यांनी मोगलांविरुद्धचा लढ्यात मदत केली तेव्हा छत्रसालाने त्यांना मोठा भूभाग तर दिलाच शिवाय याच कामगिरीच्या दरम्यान त्याची कन्या मस्तानी बाजिरावाच्या संपर्कात आली व त्यांचा विवाहसुद्धा झाला.
त्या नात्यामुळे पेशवाईत जे नाट्य घडले त्याचे ललीत चित्रण २०१५च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटात घडते.
पेशव्यांच्या कायम निवासासाठी त्यांनी पुण्यात शनिवार वाडा ही भव्य व कडेकोट वास्तू उभारली. ती आजही पर्यटकांचे आकर्षण आहे.
नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे प्रदेश बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी ताप बळावल्याने २८ एप्रिल १७४० रोजी पहाटे थोरले बाजीराव यांचे निधन झाले. तिथे आजही त्यांची समाधी अस्तित्वात आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...