पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed)
लेखक :शशिकांत पित्रे
पहिला बाजीराव आणि निजाम-उल-मुल्क यांच्यामध्ये १७२८ साली औरंगाबादच्या नैऋत्येस २८ मैलांवर (सु. ४५ किमी.) असलेल्या पालखेड (गोदावरी नदीच्या तीरावर महाराष्ट्रातील सध्याच्या पुणतांबे गावाजवळ) येथे झालेला संग्राम. जगाच्या इतिहासात एक महत्त्वाची रणनीती म्हणून या संग्रामाचा उल्लेख होतो. बाजीरावांच्या रणनीती आणि राजकारणचातुर्याने प्रभावित होऊन शाहू महाराजांनी बाजीरावांना वयाच्या १९व्या वर्षीच पेशवाईची वस्त्रे दिली होती आणि बाजीरावांनी तो विश्वास या लढाईत सार्थ करून दाखविला.
पार्श्वभूमी : बाजीरावांनी १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपदाचा पदभार घेतल्यानंतर लागलीच ते आलमखानाबरोबर मोहिमेवर गेले. पालखेडमधील त्यांचा प्रतिस्पर्धी निजाम-उल-मुल्क याच्या बरोबर त्यांची पहिली भेट ४ जानेवारी १७२१ रोजी चिखलठाण्यात आणि दुसरी २३ फेब्रुवारी १७२३ रोजी झबुवाजवळ बलाशामध्ये झाली. या भेटींदरम्यान आपल्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या बाजीरावांची कर्तबगारी चलाख निजामाने हेरली. दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशाहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारीझखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ रोजी शक्करखेडा लढाईत मुबारीझखानाचा पराभव झाला. निजामाने मराठ्यांना ‘चौथाई’ देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, या लढाईदरम्यान निजामानिकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली. या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबरील भावी लढायांत पुरेपूर उपयोग केला.
२० जून १७२५ रोजी बादशाहाने निजामाला दख्खनचा सुभेदार नेमले. लागलीच आपमतलबी निजामाने मराठ्यांविरुद्ध कारस्थाने सुरू केली. १७२५ आणि १७२७ मध्ये बाजीरावांनी कर्नाटकामध्ये मोहिमा काढल्या. याच काळात १७२७ मध्ये निजामाने शाहू महाराजांचे चुलतबंधू कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्याशी संधान बांधले आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की, छत्रपतिपदाचा हक्क उभयता दोन्ही बंधूंनी निश्चित करावा व मगच चौथ-सरदेशमुखीसंबंधी धोरण ठरविण्यात येईल. वास्तविक शाहू महाराजांनी कृष्णा आणि घटप्रभा नद्यांदरम्यानच्या प्रदेशाची मालकी संभाजीराजांना देऊ केली होती; परंतु त्यांना ते मान्य नव्हते. निजामाची ही विनाकारण लुडबुड शाहू महाराजांना आवडली नाही. शाहूंच्या छत्रपतिपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव होता. बाजीरावाने हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली होती. निजाम आणि संभाजी महाराज यांच्या सैन्याची हालचाल साताऱ्याच्या दिशेने होत असल्याची बातमी शाहू महाराजांना मिळाली. त्यांचा कट्टर शत्रू उदाजी चव्हाण साताऱ्याला शह देण्याच्या इराद्याने रहिमतपूरजवळ पोहोचला होता. निजामाच्या कारस्थानांची खात्री शाहू महाराजांना पटली. निजामाला धडा शिकविणे आवश्यक होते. १७२७चा पावसाळा संपताच बाजीराव फौजेनिशी निजामाच्या मुलखावर चालून गेले. खानदेश, बऱ्हाणपूर, सुरत इ. भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाच्या सैन्याला बेजार केले. चपळाईने विविध ठिकाणी हल्ले करून शत्रूला दमविण्याच्या रणनीतीमुळे निजामाचा तोफखानाही निरुपयोगी ठरला.
No comments:
Post a Comment