विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 May 2021

अखंड सावधान असावे” या उपदेशाचे तंतोतंत पालन करणारी शिंदे घराण्यातील व्यक्ती म्हणजे जयाप्पाचे धाकटे बंधू महादजी

 अखंड सावधान असावेI दुश्चित्त कदापि नसावेII

संकलन: प्रमोद करजगी
घटना क्रमांक दोन :“

अखंड सावधान असावे” या उपदेशाचे तंतोतंत पालन करणारी शिंदे घराण्यातील व्यक्ती म्हणजे जयाप्पाचे धाकटे बंधू महादजी होत.
भाग २
पुढे जाऊन एका प्रसंगात या महादजींवर मारेकऱ्यांनी अचानक हल्ला केला होता परंतु अखंड सावध असणाऱ्या महादजींनी तो यशस्वीपणे परतून लावला होता. एव्हढेच नव्हे तर त्या हल्लेखोरांना पकडून शिक्षा ठोठावल्या होत्या. या घटनेची माहिती इतिहासातील एका पत्रलेखनात सापडते.
जगन्नाथ विश्वनाथ (जुन्नरकर) हे महादजी शिंदे यांच्याकडील कारभारी म्हणून काम पाहत होते. १७ फेब्रवारी १७९१च्या जगन्नाथ विश्वनाथ यांनी लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात की तिसरे प्रहरी महादजींनी जयपूर राज्याचा कारभारी यास भेटण्यासाठी बोलावणे पाठवले. हे कारभारी शिंदे सरकारच्या निमंत्रणावरून मेजवानीस गेले होते. भोजन संपवल्यावर त्यांनी परतण्याची तयारी केली होती. परत येताना जयपूरचे दुसरे एक कारभारी राजश्री सदाशिव मल्हार याचे डेऱ्यास निरोप घेण्यास गेले. तेथून ते भेटण्यास येणार इतक्यात राजश्री कृष्णो बाबा चिटणीस व माईसाहेब उभयता महादजींच्या दरबारात आले. त्यावेळी महादजींच्या कचेरीच्या छावणीत काही लष्करातील शिलेदार (बहुतेक करून ते सर्व उत्तर हिंदुस्थानातील असावेत कारण ही घटना उत्तर हिंदुस्थानातील आहे) थांबले होते. त्यांच्यापैकी काही जण गेले दोनचार दिवस दररोज आपल्या काही दिवस थकलेल्या पगाराची सातत्याने मागणी करीत होते. बरेच दिवस पगार न मिळाल्याने ते सर्व घाईला आले होते. महादजी शिंदे तेथे आले असता त्यांनी महादजीना थांबायची गळ घालून तेथे बसण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून महादजी तसेच पुढे निघाले. महादजी आपले ऐकत नाहीत असे पाहून चिडून जाऊन तेथे वाट बघणाऱ्या शिलेदारापैकी पाच सात जणांनी अचानकपणे महादजीस धरले आणि महादजींना काही कळायच्या आत त्यापैकी दोघांनी तलवार काढून महादजीवर तलवारीचे वार केले. तेथे जमलेल्या चार पाच लोकांनी त्यावेळेस जोरजोरात हाणामारीच्या घोषणा दिल्या. अशा कठीण प्रसंगी महादजींनी प्रसंगावधान दाखवीत उलटे फिरून शेजारचा शिलेदार बाजीबा दाभाडा याची तलवार घेऊन हल्ला करणाऱ्या शिलेदारावर विद्युतवेगाने दोनचार उलट वार केले. त्या हाणामारीत हल्लेखोरांपैकी एकाचा हात तुटला तर दुसऱ्यास बरगडीत जखमा झाल्या. तेंव्हा तेथील गडबड गोंधळ ऐकून आसपासची काही माणसे व चौकीदार जमा झाले. अशा संधीचा फायदा घेऊन महादजी लगोलग आपले वाड्यात सुखरूपपणे निघून गेले. त्यावेळेस महादजीचे इतर सैनिक धावत आल्याने हल्ला करणारे अकरा शिलेदार कचेरीच्या डेऱ्यातच कैद झाले. तथापि त्यातून दोघे पळाले त्यापैकी एकाला देवडीवर धरण्यात आले. बाकीच्यांना महादजीच्या लोकांनी धरून ठेवले. त्यांच्याकडील तलवारी काढून त्यांना निःशस्त्र केले गेले. नंतर त्यांना दम भरून त्यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या व तसेच नेऊन मारून टाकण्यात आले.अशा रीतीने शिंद्यांच्या लष्करातील तंबूत त्यांच्यावर तलवार चालवली गेली पण सावध असणारे महादजी या हल्ल्यातून वाचले. आपल्या पत्रात जगन्नाथ विश्वनाथ पुढे लिहितो श्रीने मोठी खैर केली ज्यामुळे पाटीलबावांचे (महादजींचे) प्राण वाचले. प्राणावर बेतले होते ते किरकोळ जखमांवर निभावले. हल्लेखोर हरामखोरानी जलदी केली असती तर अनर्थ होता. महादजीच्या अखंड सावधपणे त्यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला करून त्यांचे दुष्ट व घातक मनसुबे त्यांनी उधळून लावले.
तात्पर्य: घटना क्रमांक एकमध्ये दिल्याप्रमाणे जयाप्पावर झालेल्या कपटी जीवघेण्या हल्ल्यामुळे त्यांचा प्राण गेला होता. ही घटना महादजीच्या मनावर अगदी कोरली गेली होतो. अशा होणाऱ्या भेकड हल्ल्यापासून महादजी शिंदे यांनी धडा घेतला होता. त्यायोगे आपल्या सर्वच मसलतीमध्ये विशेष करून उत्तर हिंदुस्थानातील स्वाऱ्यांमध्ये ते आपली पुरेपूर खबरदारी घेत असत. शत्रूकडून कुठल्याही क्षणी दगाबाजीने आपल्यावर हल्ला होऊ शकतो हे ध्यानात ठेऊन ते नेहमीच सतर्क असत.
‘अखंड सावधान असावेI दुश्चित्त कदापि नसावेII’या श्री समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशप्रमाणे वागून अनेक वर्षे उत्तर हिंदुस्थानात राहून अखंड सावध असणाऱ्या महादजींनी दहशतवादी लोकांपासून स्वतःचे संरक्षण केले होते. या घटनाक्रमांच्या अभ्यासाचा सारांश एव्हढाच की आपण आपल्या इतिहासातील घटनांपासून काहीतरी शिकले पाहिजे आणि अशा रीतीने इतिहासाचा जे डोळसपणे अभ्यास करतात त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असतो यात शंका नाही !!
_______________________________________________________________________
संदर्भ : शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग १०, पत्र क्रमांक ११ व १२, मराठी रियासत लेखक सरदेसाई गो. स. जीवबादादाचे चरित्र लेखक राजाध्यक्ष संकलन: प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...