विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 May 2021

अर्वाचीन मराठी वाङ्मयांतील निबंधप्रवर्तक विष्णुशास्त्री चिपळुणकर

 मराठी भाषेचा शिवाजी!

शके १७७२ च्या वैशाख शु. ९ रोजी

अर्वाचीन मराठी वाङ्मयांतील निबंधप्रवर्तक विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचा जन्म झाला.
देशाभिमान, निस्पृहता, विद्वत्ता व ग्रंथकर्तृत्व हे शास्त्रीबुवांचे गुण सर्वमान्य झालेले आहेत. न्यू. ई. स्कूल, केसरी, मराठा, चित्रशाळा व किताबखाना, यांवरून त्यांचा कर्ता देशाभिमान व्यक्त होतो. स्वधर्म, स्वदेश, स्वतःचा इतिहास, स्वभाषा-वाङ्मय यांच्याबद्दल आपल्याच सुधारकांत मनस्वी तिटकारा वसत असलेला पाहून शास्त्रीबुवांना वाईट वाटे. समाजातील दोष त्यांनी कधीच लपविले नाहीत. 'संपत्तीचा उपयोग,' 'लोकभ्रम' या निबंधांतून त्यांनी समाजाचे दोषाविष्करण केले आहे. आपल्या लोकांना विशेषतः पंडितांना-स्वाभिमानशून्यतेने घेरले आहे ही गोष्ट चिपळुणकरांनी ओळखली. स्वाभिमानशून्यता ही राष्ट्रविध्वंसक राक्षसी आहे असे त्यांचे ठाम मत होते. हा स्वाभिमान निर्माण करण्यासाठीच त्यांचे सद्गुण व त्यांच्या सत्कृति उपयोगी पडल्या आहेत. त्यांची निबंधमाला सहाच वर्षे चालली, परंतु तिने साऱ्या महाराष्ट्रास मोहिनी घातली. ह. ना. आपटे, शि. म. परांजपे, वि. का. राजवाडे, श्री. कृ. कोल्हटकर, ल. रा. पांगारकर, न. चिं. केळकर यांना देशसेवेची व वाङ्मयसेवेची स्फूर्ति निबंधमालेपासून झाली आहे ! अवध्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यांत येवढे श्रेय चिपळुणकरांना मिळाले होते!
याच आठवड्यांत शिवजयंतीचा उत्सव चालू असतो आणि चिपळूणकर “I am the Shivaji of Marathi language " असे म्हणत असत. या उक्तीचे समर्थन आणि स्पष्टीकरण नागपूरचे डॉ. वि. भि. कोलते असे करतात:
होता शिवाजी न, जाती तरी मातृभूमि अविधांचिया बंधनी
शेंडी शिरी राहती ना मुळी भ्रष्ट होत्या सदा हिंदुच्या नंदिनी !
विष्णूविना पूज्यभाषा मराठी, तशी हाय ! ही कां न आंग्लाळती ?
सौभाग्य होतें न कां नष्ट तीचे, तिची काव्यगंगा न कां भ्रष्टती ?
-२० मे १८५०

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...