विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 May 2021

कान्होजी जेधे

 छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात मावळातील ज्या देशमुख यांचा सक्रिय सहभाग होता त्यात कारी ता. भोर जि. पुणे येथील जेधे देशमुख यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.


कान्होजी जेधे आणि त्यांचे पुत्र बाजी तथा सर्जेराव जेधे या दोघांनी स्वराज्यनिर्मीतीच्या प्रारंभीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना मौलिक मदत केली.
इ.स. १६४८ मध्ये अदिलशहाने जेव्हा शहाजीराजांना अटक केली. व सुटकेनंतर त्यांची बंगलोरला रवानगी झाली. तेव्हा शहाजी महाराजांनी कान्होजींकडुन शिवाजी महाराजांना मदत करण्याविषयी वचन घेतले आणि त्यांना व त्यांचे कारभारी दादाची कृष्ण लोहकरे यांना शिवाजी महाराजांकडे पाठवून दिले.
कान्होजी जेधे यांनी येथून पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वतोपरी सहाय्य केले व त्यांच्यासारखे मातब्बर देशमुख महाराजांना सामील झाल्यामुळे मावळातील इतर मंडळीही महाराजांकडे हळूहळू रुजू होऊ लागली. कान्होजींचा खरा कस लागला तो अफजलखान स्वारीच्या वेळी. कान्होजी आदिलशहाच्या सेवेत होते. आदिलशहाने शिवाजी राजांच्या बंदोबस्तासाठी अफजल खानास मदत करण्याचे फर्मान जारी केले. ते १६ जून १६५९ रोजी कान्होजींना मिळाले. (शिवकालिन पत्रसार संग्रह खंड 1)
कान्होजींच्या जीवनातील हा सत्वपरीक्षेचा प्रसंग होता. कान्होजींनी शिवाजी राजांशी 'इमाने वर्तू' अशी शपथ शहाजीराजांसमोर घेतली होती. तर इकडे खानाच्या मदतीला न गेल्यास वतन जाण्याचा धोका निर्माण झाला होता. शेवटी कान्होजी आपल्या ५ पुत्रांसह राजगडी शिवाजी महाराजांकडे आले व बादशहाकडून आलेला फर्मानाचा कागद दाखविला. महाराजांनी तो पाहिला व म्हटले-
"तुमचे सेजारी केदारजी व खंडोजी खोपडे देशमुख हे अफजलखानाकडे गेले. तुम्ही पातशाही हुकूम मोडून राहिले म्हणजे वतनास अपाये होईल. जीवावर गोष्ट येऊन संकट पडले याकरिता तुम्हीही जाणे"
पण निष्ठावान कानोजी उद्गारले -
"महाराजांनी (शहाजीराजांनी) आपली क्रिया (शपथ) घेऊन तुमचे हाती दिली तेच क्रिया व इनाम आपला (माझा) शाबूत आहे. वतन साहेबांच्या (छत्रपती शिवाजी महाराजांच्या) पायावरी ठेविले. आपण व आपले लेक साहेबापुढे खस्त होऊ. (मरून जाऊ) तेव्हा जे होणे ते होईल"
"कान्होजी नाईक ऐसे बोलून शपथ केली. त्यावरी राजश्री स्वामी बोलले की हातावर पाणी घेवुन वतनास घालणे"
कान्होजींनी खरोखरच हातावर पाणी घेऊन वतनावर सोडले. कान्होजींच्या निर्धाराची परीक्षा महाराजांनी पुरेपूर घेतली व कान्होजीही त्या कसोटीत पूर्ण उतरले.
©maratha_riyasat

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...