विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 May 2021

उत्तर मराठेशाहीतील एक असाधारण व्यक्तिमत्व असे महादजी शिंदे यांच्यावर देखील काही बखरी

 




उत्तर मराठेशाहीतील एक असाधारण व्यक्तिमत्व असे महादजी शिंदे यांच्यावर देखील काही बखरी

संकलन: प्रमोद करजगी
मित्र हो, मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासात त्या काळातील बखरींचे एक अनन्यसाधारण असे महत्व आहे. शिवकाळाचे वर्णन करणारी 'सभासद बखर' ही सर्वदूर परिचित आहे यात शंका नाही. त्याच प्रमाणे उत्तर मराठेशाहीतील एक असाधारण व्यक्तिमत्व असे महादजी शिंदे यांच्यावर देखील काही बखरी तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासात सापडतात. अशा या बखरीचा मागोवा या लेखात आपण घेणार आहोत. या लेखाचे शीर्षक "बखरींची खबर" असे केले आहे, यातील "खबर" हा शब्द माहिती किंवा वर्णन अशा ढोबळ अर्थाने वापरला आहे.
बखरीबद्दल थोडेसे विवेचन: इतिहासाला पूरक माहिती देणारा प्रकार असे बखरीच्या संदर्भात म्हंटलेले जाते. बऱ्याच वेळेस या बखरी प्रत्यक्ष घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांनी किंवा महिन्यानंतर लिहिल्या जात असत. त्यामुळे त्यामध्ये वास्तवा बरोबर काही इतर सांगोपांगीच्या घटनांची भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच वेळेस ऐतिहासिक वास्तवतेचा संबंध पौराणिक परंपरेशी व देवांच्या कथेशी जोडून सांगण्याची परंपरा बखरकारांनी अंगिकारलेली दिसते. बऱ्याच वेळेस तत्कालीन युद्धांची वर्णने तसेच राजघराण्याचा इतिहास सांगणारे हे लिखाण असते. परंतु काही प्रसिद्ध इतिहासकारांच्या मते ऐतिहासिक घटनांसाठी केवळ बखरीवर अवलंबून राहणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे इतर मूळ साधनांच्या तुलनेत इतिहास लेखनात बखरींना दुय्यम स्थान दिले जाते.
महादजी शिंदे यांच्यावरील ऐतिहासिक संदर्भ व बखरी: आतापर्यंत अलिजाबहादूर महादजी शिंदे यांच्या संदर्भात प्रामुख्याने बखर स्वरूपात जे काही ऐतिहासिक लिखाण केले गेले आहे त्याची माहिती एकत्रित करून इतिहासाच्या अभ्यासकांसाठी संदर्भ म्हणून याठिकाणी दिली आहे. यांपैकी काही लिखाण आज उपलब्ध आहे तथापि बरीचशी कागदपत्रे काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत. त्यांचा आज फक्त नामनिर्देशच काही इतिहासाच्या पुस्तकात आढळतो. बखरींच्या बरोबरीने इतर काही महत्वाच्या साहित्याचा येथे उल्लेख केला आहे कारण महादजी शिंद्याबद्दलची माहिती मिळण्यात त्यांचे मोट्ठे योगदान आहे.
अलिजाबहादूर महादजी शिंदेशाहीच्या बखरींचा मागोवा: रामजी अनंत दाभोलकर यास शिंदेशाहीचा पहिला बखरकार म्हणून मान द्यावा लागेल. दुर्दैवाने त्यांनी लिहिलेली बखर उपलब्ध नाही.'भाऊसाहेबांची बखर’ हीचा कर्ता शिंदेशाहीचा दुसरा इतिहासकर होय. ही बखर लिहिणारा कोणीही असो, तो शिंद्यांच्या पदरी असून मोठा शोधक व बुद्धिमान असला पाहिजे. किंबहुना तो शिंद्यांचा पक्षपाती असला पाहिजे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.शिंद्यांची बखर लिहिणारा तिसरा ग्रंथकार हा मोरो लक्ष्मण रानवडे होय . दौलतराव शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती मैनाबाई ह्या कुलाबेकर आंग्रे ह्यांच्या कन्या होत्या आणि रानवडे हा आंग्रे यांचा बहुधा कारभारी असावा किंवा माहितगार असावा. सालबाईच्या तहानंतर इंग्रजांचा वकील महादजी शिंदे यांच्या दरबारी राहू लागला. त्यापैकी सर रॉबर्ट क्लोज याने शिंद्यांच्या इतिहासाची माहिती मागितली असता ती पुरवण्याचे कामी रानवडे यांची योजना झाल्यावरून त्याने ही बखर लिहिली आहे. मराठीतील ही बखर उपलब्ध नाही, पण तिचे फारसीत भाषांतर उपलब्ध आहे . ही अद्याप अज्ञात व अप्रकाशित आहे.
नरसिंगराव सदाशिव नेवाळकर हा शिंदेशाहीचा चौथा बखरकार होय. छत्रसिंग जाट राणा गोहद याने फिरंग्यांशी संधान बांधून (त्यांची) कुमक घेऊन ग्वाल्हेरचा किल्ला घेतला होता,त्या मोहिमेचे वर्णन श्रीयुत नेवाळकरांनी यात केलेले आहे. अर्थात गोहद प्रकरणी महादजी शिंदे यांनी इंग्रजांबरोबर खेळलेल्या राजकारणाचे तपशीलवार वर्णन यांत दिलेले आहे. या बखरीच्या लेखकांचा म्हणजेच श्रीयुत नेवाळकरांचा शोध लागत नाही. तो महादजी शिंदे यांचा आश्रित असावा असे वाटते. अनंत वामन वाकणकर (धार येथील)यांचे संग्रही या बखरीची प्रत आहे असा उल्लेख आढळतो. तथापि ही बखर पूर्ण नसून बखरीचा एक अध्याय असावा असे तिच्या उपसंहारावरून वाटते. उपसंहारात म्हंटले आहे की, 'महाराज (अलिजाबहादूर महादजी) यांणी (यांनी) (सदाशिव मल्हार) बक्षीवर मेहेरबानी करून जहागीर, बहू(मान) महावस्त्रे दिली. पुढे हिंदुस्थान, आग्रा वगैरे सर होणार .या प्रकारे फिरंग्यांचा सलूक झाला .' असा मजकूर या बखरीत श्रीयुत नरसिंगराव सदाशिव नेवाळकर यांनी लिहिलेला आहे. ही बखर समाप्त केल्याची तारीख संवत १९०१,शके १७६५ सन (हिजरी)१२५९, मुकाम लष्कर नजीक ग्वालेर ,श्रावण वद्य ४ रोज शनिवार ते दिवशी समाप्त. अशी दिली आहे. 'पुढे हिंदुस्थान दिल्ली सर होणार’ या वाक्यावरून महादजी शिंदे यांच्या चरित्रातील (गोहद वृत्तांत समाप्त करून) गोहदोत्तर प्रकरणाची रचना करण्याचे बखरकाराचे मनात होते असा संकेत दिसतो. ही मूळ प्रत भारत इतिहास संशोधक मंडळाकडे आहे. (???)
शिंद्यांची बखर लिहिणारा शंकरतात्या फडके हा पाचवा इतिहासकार होय. त्याने 'शिंद्यांचे घराण्याचा इतिहास’ या ग्रंथाची रचना करून तो ग्रंथ १८६४ साली प्रकाशित केला. ग्रंथकाराचा लिहिण्याजोगा वृत्तांत मिळत नाही. किंबहुना त्याने तो कुठे दिलेला नाही.'शिंदे सरकारचे घराण्याचा ईतिहास' हे भूतपूर्व पुरोहित विपट यांचे संग्रही आहे. यातील लिखाणाचे शिंद्यांच्या घराण्याचा इतिहास या ग्रंथाशी खूप साम्य असल्याने दोन्हीचे लेखक एकच असावेत का असा प्रश्न पडतो. बाळकृष्ण रामचंद्र मुळे (खडकतकर) असा हा अज्ञात इतिहासकार असावा.
जगन्नाथ प्रभाकर सरंजामे यांनी १८७२ साली "शिंदे यांचे घराण्याचा इतिहास” हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांचे वाचनालयात उपलब्ध आहे. 'शेणवी वीर व मुत्सद्दी‘ ही बखर विविधज्ञानविस्तार मासिकात १८७९ साली प्रसिद्ध झाली. तिचा कर्ता कोण हे कळत नाही.
कै. सरदार बळवंतराव भैय्यासाहेब शिंदे यांचे प्रोत्साहनावरून विष्णू रघुनाथ नातू यांनी 'अलिजाबहाद्दूर माधवराव शिंदे ' यांचे चरित्र १८९४ साली रचले. हे पुस्तक नुकतेच पुनर्प्रकाशित करण्यात आले आहे. ह्या ग्रंथावर टीकात्मक जे लेख केसरी पत्रकात प्रथम प्रकट झाले ते लेख नंतर पुस्तकरूपात चिंतामण गंगाधर नातू यांनी 'नाना व महादजी 'या मथळ्याखाली प्रकाशित केले, त्याच्या प्रत्युत्तरादाखल हरिश्चंद्र नारायण नवलकर यांनी 'माधवराव शिंदे व नाना फडणीस यांची तुलना ' या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. या दोन्ही पुस्तकातून अलिजाबहादूर महादजी शिंदे आणि नाना फडणीस यांच्या स्वभावाची आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांची चांगली माहिती मिळते.
१९०७ साली नरहर व्यंकोजी राजाध्यक्ष यांनी लिहिलेले 'जिवाजी बल्लाळ केरकर यांचे चरित्र’ या नावाचे पुस्तक शिंदे घराण्याच्या इतिहासावर पुष्कळ प्रकाश टाकणारे आहे. हे पुस्तक जीर्ण अवस्थेत भारतीय इतिहास संशीधक मंडळात उपलब्ध आहे. इतर काही शिंदेशाहीच्या संदर्भातील उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे १९०७ साली उर्दू भाषेत श्रीयुत रघुनाथदासजी यांनी लिहिलेले 'तारीख सिंदिया ' आणि धनुर्धारी कृत 'काळीज शिंदे ' ही होत. याबद्दलची फारशी माहिती मिळाली नाही.
ऐतिहासिक पत्रव्यवहार: जगन्नाथ विश्वनाथ हा गृहस्थ महादजी शिंदे यांच्या बरोबर सतत स्वारीवर असे. तो लालजी बल्लाळ (कोटा येथील महादजी शिंदे यांचा वकील) याच्याशी त्याकाळात संपर्कात असे. महादजीच्या मोहीमा, त्याचे मुक्काम, पुढच्या स्वारीच्या योजना, राजकीय बेत व उलाढाल अशा प्रकारची वेगवेगळी माहिती जगन्नाथ विश्वनाथ यांनी पाठविलेल्या पत्रातून मिळते. त्याच बरोबर महादजीला भेटायला येणारी माणसे, महादजी यांच्या बरोबर असणारे सरदार व मुत्सद्दी लोक,महादजीचे प्रकृतिमान, दैनंदिन कार्यक्रम, नात्यागोत्यांतील संबंध इत्यादी अनेक गोष्टीवर या पत्रातून प्रकाश पडतो. महादजींच्या बद्दलची माहिती मिळण्यास यांतील पत्रांचा चांगलाच उपयोग होऊ शकतो.
हिंदी भाषेतील इतर साहित्य: “ग्वालियरनामा”या नावाचे एक ऐतिहासिक हिंदी काव्य असून कवीचे नाव अज्ञात आहे. गर्ग कवीने रचलेले “गोपाचल” नावाचे काव्य आहे ज्यात ग्वाल्हेरच्या किल्ल्याचे वर्णन आहे, त्यात आरंभापासून शेवटपर्यंत अलिजाह महाराज महादजी शिंदे यांचे वर्णन दिले आहे.
वकील मुतलकीचा बहुमान व प्रेमकिशोर फिराकी: १४ नोव्हेंबर १७८४ रोजी अलिजाबहाद्दर महादजी शिंदे यांनी दिल्लीचा बादशहा शहाआलम यांची भेट घेतली. १ डिसेम्बर १७८४ या तारखेला बादशहांनी पेशव्यांना आपला प्रतिनिधी नायब आणि सेनापती बक्षी उल्मुमलिक हा सर्वोच्च 'किताब दिला आणि प्रत्यक्ष कारभार महादजी शिंदे यांनी करावा अशी सूचना केली.शहाआलम व शिंदे यांच्या फौज जयपूरकरांकडे खंडणी गोळा करण्यासाठी जात असताना हलेना या गावी थांबल्या होत्या. या मुक्कामी ४ डिसेंबर या दिनी शहाआलम यांनी मोंगल साम्राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा असा 'वकील मुतलक' हा बहुमान महादजी शिंदे याना बहाल केला. या काळात प्रेमकिशोर फिराकी हा शहा आलम यांच्या छावणीत हजर होता. बंगालच्या सुभेदाराचा मोंगलांच्या दरबारातील वकील राजा जुगलकिशोर यांचा हा नातू होय. नोकरीच्या निमित्ताने हा शहा आलम यांच्या छावणीत प्रथम ५ जुलै १७८४ रोजी तलपत मुक्कामी दाखल झाला. प्रेमकिशोर फिराकी हा १५ जानेवारी १७८५ पर्यंत शहा आलम बरोबर होता. शहा आलम यांच्या छावणीत काही दिवस काढल्यावर प्रेमकिशोर याला वाटले की आपण छावणीतील हकीकत दैनंदिनीच्या स्वरूपात लिहून काढावी. त्याप्रमाणे २५ नोव्हेंबर १७८४पासून त्याने दैनंदिनी लिहायला सुरुवात केली. दैनंदिनीच्या एकूण पानांची संख्या एकशे सोळा पाने आहे. प्रेमकिशोर याने आपल्या दैनंदिनीचे नाव 'वकाये आलमशाही' असे ठेवले आहे. या वकाये आलमशाही यावरून महादजी शिंदे व बादशहा शहा आलम यांचा संबंध कसा होता आणि महादजी शिंदे यांचे बादशहाच्या दरबारातील वर्तन आणि त्यांचा दिलदार स्वभाव यावर प्रकाश पडतो. त्या दोन पुरुषातील संबंधाच्या दृष्टीने या ग्रंथाचे महत्व असाधारण आहे. या ग्रंथाचे एक हस्तलिखित रामपूर येथील राजाच्या ग्रंथालयात होते. ते सन १९४९ साली प्रसिद्ध झाले. याचे मराठीत भाषांतर प्रसिद्ध इतिहासकार सेतूमाधव पगडी यांनी केले आहे. या बद्दलची अधिक माहिती आपण एका आगामी लेखात घेणार आहोत.
श्रीयुत नरसिंगराव सदाशिव नेवाळकर यांची बखर: नरसिंगराव सदाशिव नेवाळकर यांची मूळ बखर अस्तित्वात आहे व ती वाचनीय आहे. महादजी व इंग्रज यांच्यातील लढायांचे वर्णन या बखरीमध्ये दिले आहे. इंग्रजांचा महादजीशी तह झाला या घटनेपाशी बखरीचा समारोप केलेला आहे. त्यातील मूळ भाषा सामान्य वाचकास वाचून समजण्यास कठीण नाही.
नेवाळकरांच्या बखरीचा शेवट: या बखरीचा शेवट आगळा वेगळा व अतिशय मनोरंजक आहे. धार्मिक ग्रंथाच्या शेवटी आपल्याकडे फलनिष्पत्ती देण्याची प्रथा रूढ आहे. त्याच चालीवर नेवाळकरांच्या बखरीच्या शेवटी फलनिष्पत्ती दिलेली आहे. रसिक वाचकांच्या संदर्भासाठी ती खाली दिली आहे.
ही (बखर) जो वाचील अथवा श्रवण करील, त्यास महाभारत पारायणे केली याचे फळ प्राप्त होऊन त्याचे शत्रू पराजय होऊन तो भाग्यवंत,जगवंत होईल हे सत्य जाणावे. ही बखर समाप्त संवत १९०१ शके १७६५ सन १२५२ मुकाम लष्कर नजीक ग्वाल्हेर श्रावण वद्य ४ रोज शनिवार दिवशी समाप्त. बहुत काय लिहिणे हे विनंती.
सारांश:महादजी शिंदे यांच्याकाळातील ऐतिहासिक पत्रव्यवहार आज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातून त्याकाळातील घडामोडींची व्यवस्थित संगतवार माहिती मिळते. तरी सुद्धा त्यांच्या संदर्भातील बखरीसुद्धा तितक्याच महत्वाच्या व मनोवेधक आहेत यात शंका नाही. वाचकांपैकी काहींना महादजींच्या बखरी संदर्भात अजून काही माहिती असेल तर ती त्यांनी अवश्य द्यावी. भविष्यातील लेखामध्ये त्याचा योग्य तसा उपयोग करता येईल.
________________________________________________________________________
संदर्भ:शिंदेशाही इतिहासाची साधने भाग १ला,कोटा संस्थान येथील शिंदे सरकारचे वकील गुलगुले यांचे दप्तरातील शिंदे राजघराण्याचा असल पत्रव्यवहार यातील प्रस्तावना,समग्र सेतूमाधव पगडी- भाग २, इतिहास लेखनशास्त्र: डॉक्टर श्रीनिवास सातभाई

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...