विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 May 2021

"राणोजी आणि मल्हारबा म्हणजे जशीकाही राऊंची जीवंत कवचकुंडलेच.."

 माळवा, दिल्ली, देवगीरी, कर्नाटक, बुंदेलखंड वा वसई.. मोहीम कोणतीही असो तित राणोजी अन मल्हारबा हवेतच.. हा जणु राऊंचा शिरस्ताच..



"राणोजी आणि मल्हारबा म्हणजे जशीकाही राऊंची जीवंत कवचकुंडलेच.."
थोरल्या बाजीरावांचे विश्वासू सहकारी व पेशव्यांचे जेष्ठ सरदार राणोजी व मल्हारबा म्हणजे पुढील पेशव्यांच्या वडीलकीच्या स्थानी..
आज मल्हारबांची २५५ वी पुण्यतिथी
दिनांक २० मे सन १७६६ रोजी मराठ्यांच्या दौलतीचे उत्तरेकडील सुभेदार मल्हारराव होळकर अर्थात मल्हारबा यांचे झाशी जवळील आलमपूर येथे कर्णविकाराने निधन झाले. मल्हारबांच्या निधनसमयी श्रीमंत दादासाहेब व महादजी शिंदे जवळ होते. अंतिम क्षणीही मालेरावांचा हात दादासाहेब यांचे हाती देऊन "माझे नांव व श्रीमंतांची चाकरी तुच करशील.." ऐसे बोलून मल्हारबांनी देह ठेवला.
दहाव्या दिवशी क्रियाकर्माचे वेळी काकस्पर्श होईना. अखेर दादासाहेबांनी स्वतः, मालेरावांचे, महादजींच्या हस्ते उदक सोडीले तरीही काकस्पर्श होत नाही हे पाहून तुकोजीरावांचे मार्फत जाटाचे पारिपत्य करेन असे म्हणोन उदक सोडीले आणि काकस्पर्श झाला. मराठ्यांचे इमान.. इमान.. काय तर ते हे असे.. खरंच धन्य ते मल्हारबा.. आणि धन्य त्यांची निष्ठा..
मल्हारबांच्या पत्नी द्वारकाबाई व बजाबाई सती गेल्या. मल्हारबांचे अंतिमसंस्कार व तद्प्रित्यर्थ दानधर्मावर दादासाहेबांनी यथोचित दोन लाख रूपये खर्च केले. दहनस्थानी अतिशय सुंदर अशी समाधीमंदिराची वास्तू उभारण्यात आली. या समाधीमंदिरात मध्यभागी मल्हारबा दोन्ही बाजूस द्वारकाबाई व बजाबाईंची प्रतिमा स्थापन केली आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांनी या समाधीमंदिराची व्यवस्थेसाठी १. आलमपूर २. खुजया ३. खरीपा ४. रंतरापूर ५. मूरधर ६. गेयरी ७. बेलवा ८. जनापूर ९. बीडा भेंडरी (भेंडरी बीडा) १०. रतनपूर खुर्द ११. गंगापूरा १२. देहे १३. साईपूरा १४. भाडेर १५. अरचर ही पंधरा गावे लावून दिली.
अटकेपासोन बंगालपर्यंत व पानिपतापासोन तंजावरपर्यंत आपल्या गौरवशाली इतिहासाची असंख्य प्रेरणास्थळे आहेत.. मल्हारबांच्या स्नुषा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी प्रचंड दानधर्म व पैसा खर्च करोन उभ्या आडव्या हिंदुस्थानात स्थापत्यरूपातून मराठा साम्राज्याची वैभवशाली व कल्याणकारी प्रतिके भक्कमपणे उभारून ठेवली आहेत.
आज आपण जे काही आहोत ते यांच आपल्या पूर्वजांच्या दैदिप्यमान कारकिर्दीने व त्यांच्या बलीदानामुळे आहोत..
मराठा असलेल्या प्रत्येकाने किमान एकदा तरी नक्कीच जाऊन आपल्या पूर्वजांच्या पवित्र स्मृतीस मुजरा घालावा आणि तेथील रोमांचित क्षण अनुभवावेत..
हल्ली अनेकांना शुल्लक किरकोळ अडचणींमुळे "टेन्शन" व "फ्रस्टेशन" येत असतं. हे "टेन्शन" व "फ्रस्टेशन" आलं की "नसते" उपाय करण्यापेक्षा ते येऊच नये यासाठी स्वतःस "मराठा" समजत असलेल्या प्रत्येकाने किमान एकदा तरी या आपल्या दैदिप्यमान पराक्रमी स्थळांवर जाऊन आपल्या पूर्वजांच्या पवित्र स्मृतीस मुजरा घालावा आणि तेथील रोमांचित क्षण व अभिमानास्पद असलेला "मराठ्यांच्या जरीपटक्याचा भगवा दरारा" अनुभवावा..
ही नम्र विनंती..
आज मल्हारबांची २५५ वी पुण्यतिथी.. पुण्यतिथी निमित्ताने समस्त भट परिवाराकडून मल्हारबांना विनम्र आदरांजली...
मल्हारबांच्या समाधीस्थळी जाण्यासाठी खालील लिंक पहावी.
Chatri Bagh Trust
Alampur, Madhya Pradesh 477449
श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...