विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 July 2021

#मावळ्यांचा_शिवकाळातील_आहार..

 


#मावळ्यांचा_शिवकाळातील_आहार
..
इंग्रज प्रवासी आणि डॉ. जॉन फ्रायर, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर उपस्थित होता. त्याने आपल्या प्रवासाचे वर्णन करून ठेवले आहे. त्यात मराठ्यांच्या खाण्याबाबतचा मजकूर आढळतो. तो लिहितो की,
"रायरी (रायगड ) वरील आमच्या मुक्कामादरम्यान घडलेला एक प्रसंग मी येथे सांगू इच्छितो . इथल्या लोकांचे जेवण अत्यंत साधे आहे आणि ते तयार करण्यासाठी फारसा खर्च देखील येत नाही. इथल्या लोकांचा परमोच्च आवडीचा पदार्थ म्हणजे "खिचडी " ( फ्रायर या पदार्थाला cutchery असे म्हणतो ! ) हा खिचडी नावाचा पदार्थ तांदूळ आणि डाळ एकत्र करून , हे मिश्रण लोण्यामध्ये शिजवून तयार केला जातो. या खिचडीवरच या लोकांचे पिळदार देह पोसलेले असतात. परंतु आमच्या सारख्या तिन्हीत्रिकाळ मांस खाण्याची सवय असलेल्या इंग्रजांचा फार काळ पर्यंत मराठयांची ही खिचडी खाऊन निभाव लागणे अशक्य होते , त्यामुळे आम्ही राजाला ( छत्रपती शिवाजी महाराजांना ) आमच्या समूहातील लोकांना पुरेल एवढे मांस रोज देण्याची विनंती केली. आमची ही विनंती मान्य करून शिवाजी महाराजांनी , गडावर थोड्याफार प्रमाणात असलेल्या मुसलमानांसाठी (फ्रायर Moors असा शब्द वापरतो . Moors म्हणजे मुसलमान ) मांस पुरवणाऱ्या खाटकाला , आम्ही गडावर असे पर्यंत आम्हालाही लागेल तेवढे बोकडाचे मांस (दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे मांस गडावर येत नसल्यामुळे ) पुरवत जावे अशी आज्ञा केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आज्ञेप्रमाणे हा खाटीक आम्हाला रोज बोकडाचे मांस पुरवू लागला . आम्हाला प्रत्येक दिवसाला साधारण पणे अर्धा बोकड लागत असे. आमच्या या दररोजच्या मागणीमुळे या खाटकाचा धंदा फारच जोमाने चालू लागला ! त्याला या गोष्टीचे एवढे आश्चर्य वाटले की , " एवढे मटण रोज खातंय तरी कोण ? " हे पाहण्याकरता वृद्ध असलेला हा खाटीक , गड चढण्याचे कष्ट सोसून एके दिवशी आम्हाला पाहायला आला ! गेल्या काही वर्षात त्याच्याकडून इतके मांस कोणीच विकत घेतले नव्हते ! याचे कारण म्हणजे या प्रदेशातील लोक फारच कवचित मांसाहार करतात; शिवाय हिंदू लोक ( फ्रायर येथे Gentiles असा शब्द वापरतो . Gentiles याचा अर्थ यहुदी नसलेले लोक असा होतो, सामान्यपणे इतिहासामध्ये हिंदूंना हा शब्द वापरतात ) अजिबातच मांस खात नाहीत आणि मुसलमान किंवा पोर्तुगीज लोक मांस चांगल्याप्रकारे उकडल्याशिवाय किंवा शिजवल्याशिवाय खात नाहीत . आपल्याप्रमाणे ( इंग्रजांप्रमाणे ) मांस फक्त भाजून असे क्वचितच कोणी खात असेल ! पण मला असे वाटते की मांस खाण्याची आपली ही पद्धत चुकीची आहे. खास करून या उष्ण देशामध्ये मांस नीट शिजवून खाल्ल्यास त्याचा पोटाला त्रास होणार नाही , परंतु आपला स्वभाव सतत धावपळ करण्याचा असल्यामुळे , आपण हे मांस शिजवण्याबीजावण्याच्या भानगडीत पडत नाही . पण माझ्या मते आपली पोटं बिघडण्यामागचे हेच कारण असावे हे अनुभवी लोकांच्या लक्षात येईल !" [1]
यावरून आपल्याला असे वाटू शकेल की त्याकाळातील मराठे अजिबात मांसाहार करत नव्हते. पण तसे वाटणे चुकीचे ठरेल. हिंदू सुद्धा थोड्याप्रमाणात मांसाहार करत होते परंतु युरोपिअन लोकांच्या मांसाहार करण्याच्या तुलनेत ते नगण्य होते.
संदर्भ - Travels in India in the 17th century - Dr. John Fryer's Account of India
लेखन - सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...