विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 July 2021

पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांचा एक प्रमुख सरदार इब्राहिमखान गारदी (Ibrahim Khan Gardi)

 


पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांचा एक प्रमुख सरदार

इब्राहिमखान गारदी (Ibrahim Khan Gardi)
पोस्तसांभार :: घनश्याम ढाणे
गारदी, इब्राहिमखान : (? – १७६१). पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांचा एक प्रमुख सरदार. या लढाईत त्याने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. तुकडीचे नेतृत्व असल्याने त्याने खान या नावाची पदवी धारण केली.
पाँडिचेरी येथे द ब्यूरी नावाचा एक कामगार होता. त्याच्या पालखीपुढे छडी घेऊन धावणारा एक लहानसा शिपाई म्हणून इब्राहिम खान काम करीत असे. त्यास थोडेफार पोर्तुगीज येत होते. लवकरच त्याने आपल्या कार्यकर्तृत्वावर फ्रेंच फौजेत अंमलदारी मिळवली. पुढे फ्रेंचांची नोकरी सोडून तो निरनिराळ्या दरबारांत आपली कर्तबगारी दाखवू लागला. हैदराबादच्या निजामाच्या सेवेतही तो होता.
फ्रेंचांच्या पलटणीतील अधिकारी बुसी याने हिंदुस्थानात प्रथम गारद्यांची पलटण तयार केली. इब्राहिमखानानेही प्रशिक्षण घेतले होते. तो या बुसीचा चेला होता. मराठ्यांकडे मुज्जफरखान हा तोफखाना चालविणारा एक उत्तम गारदी होता. परंतु, तो जितका हुशार,कल्पक, तितकाच बेइमानी आणि खुनशी होता. त्याच्या ह्या वृत्तीमुळे सदाशिवराव भाऊ आणि त्याचे पटत नसे. इब्राहिमखान हा वऱ्हाडात निजाम अलीकडे काही दिवस होता. पेशवा आणि निजाम यांच्यात डिसेंबर १७५७ साली सिंदखेडला झालेल्या लढाईत इब्राहिमखान निजामाकडून लढला. मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. पुढे सलाबतजंगने बसालतजंगास आपला कारभारी म्हणून बदलून त्या जागी निजामअलीची नेमणूक केली. ही नेमणूक करताना निजाम अलीने इब्राहिमखानास नोकरीवरून काढावे, ही अट ठेवली. याचा फायदा घेऊन मराठ्यांनी इब्राहिमखानास नोकरीवर ठेवले. जून १७५८ नंतर हा मराठ्यांना येऊन मिळाला. उदगीरच्या लढाईत हा सदाशिवराव भाऊंच्या बरोबर होता. उदगीरनंतर सदाशिवराव भाऊंची पानिपतावर रवानगी झाली. तेव्हा इब्राहिमखान यांच्या इमानाविषयीचा उल्लेख भाऊसाहेबांच्या बखरीत सापडतो. एकनिष्ठतेची शपथ म्हणून सदाशिवराव भाऊंनी त्यास बेलभंडारा दिला, तर त्याने भाऊंना साजक रोटी (शपथेचा एक प्रकार) दिली. सदाशिवराव भाऊंच्याबरोबर दिल्लीस जाताना त्याच्या हाताखाली दहा हजार गारदी व शंभर तोफांचा तोफखाना होता.
इब्राहिमखान नावाची व्यक्ती म्हणजे अंगाखांद्याने धिप्पाड असावी, असे वाटू शकते; परंतु तो अंगाने अगदी किरकोळ होता. त्याचा वर्ण काळा होता, तर तोंड देवीच्या व्रणांनी खूपच विद्रूप झाले होते.
महाराष्ट्रातून अब्दालीच्या पारिपत्यासाठी उत्तरेत गेलेल्या मराठी सैन्याने दिल्लीचा किल्ला घेतला. तिथे बातमी कळली की, दत्तजी शिंदे यांचे मारेकरी हे येथून उत्तरेस पाऊणशे मैलांवर असलेल्या कुंजपुरा किल्ल्यात आहेत. कुंजपुराकडे भाऊसाहेब निघाले, तेव्हा बातमी लागली की, कुत्बशहा व शहामतखान हे कुंजपुराच्या किल्ल्यात असून त्यांना अब्दाली कुमक पाठवणार आहे. तेव्हा सदाशिवराव भाऊंनी इब्राहिमखानास तातडीने बोलावून घेतले. हा रातोरात मजल-दरमजल करत तेथे दाखल झाला. सदाशिवराव भाऊंनी हल्ला करण्यास ठरवलेल्या वेळेस तीन घटका अवकाश होता. अजून तीन घटका अवकाश आहे, तूर्त न उठावे असा निरोप भाऊंनी पाठवला. तेव्हा त्याने उत्तर पाठवले की, मुहूर्त कशास पाहिजे, आम्ही किल्ला फत्ते करतो आणि हुजूर येतो. त्याप्रमाणे त्याने हल्ला करून किल्ला सर केला. पुढे पानिपतावर महिना-दोन महिने जी काही चकमक झाली, त्यामध्ये इब्राहिमखानाने चांगलाच पराक्रम गाजवला.
अब्दाली पानिपतवर मराठ्यांच्या रस्त्यात आडवा आला, तेव्हा त्याची कोंडी फोडण्यासाठी युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. तेव्हा भाऊसाहेबांनी इब्राहिमखानास मसलतीस बोलवले. त्या वेळी त्याने सांगितले की, ‘तुमचे आमचे इमान प्रमाण झाले तेच करार आहे, आमचे गैर इमान असते तरी प्रत्यय दाखवतो, म्हणून त्याने दुराणी व नजीबखान रोहिला, सिराजदौला यांची २५ पत्रे दाखवली की, तुम्ही आम्ही एक जात आहो. यासमयी आमच्याकडे यावे म्हणजे तुम्हास पंचवीस लक्षाचा मुलूख देऊ. उमरावीही देऊ.ʼ ती पत्रे भाऊसाहेबांनी वाचून पाहिली, तेव्हा त्यांची त्याच्या प्रामाणिकपणाविषयी खातरी झाली.
पानिपतच्या युद्धप्रसंगी सदाशिवराव भाऊ व इब्राहिमखान यांच्यात झालेले महत्त्वपूर्ण संवाद भाऊसाहेबांच्या बखरीत दिले आहेत. भाऊसाहेब म्हणाले की, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु येथून दिल्लीत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल आणि ते कसे साध्य होईल? त्यावर त्याने उत्तर दिले की, गोल बांधून लढाई करावी आणि त्यामध्ये बुणगे स्त्रिया घालून भोवती मोठे मातब्बर सरदार ठेवून सर्वांना त्यांच्या बाजू वाटून द्याव्यात आणि दोन कोस लढत दिल्लीत पोचावे.
पानिपतच्या युद्धाच्या वेळी प्रत्येकाला आपल्या जागा योजून दिल्या होत्या. त्याप्रमाणे इब्राहिमखान तोफखाना घेऊन आघाडीस होता. त्याच्या उजवीकडे शिंदे आणि होळकर होते, तर डावीकडे पवार आणि गायकवाड हे सरदार होते. इब्राहिमखान पानिपतच्या आग्नेयेस तीन मैलांवर उग्रखेडीच्या पुढे निंबडीच्या दक्षिणेस आपल्या गारद्यांसह जाऊन उभा राहिला. ऐन युद्धात त्याच्या तोफांनी शत्रूपक्षाच्या रोहिल्यांची दयनीय अवस्था केली. शत्रूसेनेत भगदाड पडताच विठ्ठल शिवदेव व दमाजी गायकवाड हे सरदार पुढे सरसावले. तोफखाना पाठीशी राहिला. त्यामुळे पुढे गेलेली आपली माणसे मृत्युमुखी पडतील, या भीतीमुळे इब्राहिमखानाने तोफा डागणे बंद केले.
पानिपतावर अखेरीस गोलाच्या लढाईत इब्राहिमखानाने आपल्याकडून अत्यंत शिकस्त करूनही उपयोग झाला नाही. त्याच्या तोफखान्यावर सदाशिवराव भाऊंचा फार विश्वास होता. त्याने ८००० रोहिल्यांना कंठस्नान घातले, पण सैन्य एकत्रित नसल्याने कोणाचीच कोणाला मदत होत नव्हती. सैन्य समोर व तोफखाना मागे अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे तोफखाना बंद पडला. पाच हजार गारदी कापले गेले. त्यामध्ये इब्राहिमखानाचा पुत्र व भाचा मारला गेला. स्वतः इब्राहिमखान जखमी अवस्थेत सापडला. तेव्हा अब्दालीने त्याला विचारले, तू मला का सामील झाला नाहीस? तेव्हा त्याने सांगितले की, सदाशिवराव भाऊंना दिलेले वचन सर्वांत महत्त्वाचे होते. ते सोडून त्यांचा दगा करणे माझ्या तत्त्वात बसणारे नव्हते. हे ऐकल्यावर अब्दालीने इब्राहिमखानास ठार करण्याचा हुकूम दिला आणि एका शूराचा अंत झाला.
पारधी समाजात अजूनही इब्राहिमखान व सुलेमानखान यांच्या विराण्या गायिल्या जातात.
संदर्भ :
राजवाडे, विश्वनाथ काशिनाथ, मराठ्यांच्या इतिहासाची साधने : १७५० ते १७६१, वाई, १८९८.
शेजवलकर, त्र्यं. शं. पानिपत : १७६१, आवृ-९, पुणे, २०१८.
सरदेसाई, गोविंद सखाराम, रियासत : मध्य विभाग ३ : पानिपत प्रकरण, पुणे, १९२२.
हेरवाडकर, रघुनाथ विनायक, संपा., कृष्णाजी शामराव विरचित भाऊसाहेबांची बखर, पुणे, १९९०

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...