विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील पूर्वज राजांच्या निर्मितीतील 👇👇👇 उक्कडगावचे त्रिकूटपंथी उत्तरेश्वर महादेव मंदिर...

 



राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील पूर्वज राजांच्या निर्मितीतील
👇👇👇
उक्कडगावचे त्रिकूटपंथी उत्तरेश्वर महादेव मंदिर...
-------------------------------
-------------------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
................✍️
हर हर महादेव
‌ श्रावणातील दुसऱ्या सोमवार निमित्ताने आज राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील पूर्वज राजांच्या निर्मितीतील उत्तरेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. उत्तरेश्वराचे हे महादेव मंदिर जालना जिल्ह्यातील उक्कडगाव, ता. घनसावंगी येथील गोदावरी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित आहे. भगवान प्रभू श्री रामाची सीताशोधाची चिंता गेवराई येथील चिंतेश्वर महादेवांनी मिटविल्यानंतर त्यांचा दंडकारण्यातील गोदावरी काठावरचा पश्चिम आणि उत्तर दिशेकडूनचा पूर्व दिशेने होणारा प्रवास उक्कडगाव येथील उत्तरेश्वर ठिकाणापासून दक्षिण दिशेकडे सुरू झाला; म्हणून या मंदिराचे नामोभिधान उत्तरेश्वर मंदिर असल्याची आख्यायिका येथील भाविकांतून ऐकविली जाते.
प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दंडकारण्याचा एक प्रमुख भाग असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शिवाची राजे साळुंखे चाळुक्य निर्मित अनेक पुरातन कालीन शिवालये असून, त्यापैकी एक म्हणजे घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव हे येथील भगवान उत्तरेश्वराचे पूर्वमुखी जलवाहिनी असलेले त्रिकूटपंथी महादेवाचे मंदिर आहे. मंदिर रचना उत्तराभिमुख असून भगवान शिवाची जलवाहिनी पूर्वाभिमुख असल्यामुळे शिवाय या ठिकाणी गोदावरी नदीप्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असल्याने गोदावरी काठाचे हे एक मोठे महत्वाचे तीर्थाचे ठिकाण मानले जाते.
उत्तरेश्वराचे हे मंदिर अकराव्या बाराव्या शतकातील निर्मित असून मंदिर निर्माण शैली सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर उत्तरकालीन कल्याण साळुंखे चाळुक्य नरेश षष्ठ विक्रमादित्य याची आहे. अख्ख्या दख्खनावर ५१ वर्षाचे स्थिर शासन केलेल्या षष्ठ विक्रमादित्याने त्याच्या कार्यकाळात हजारो मंदिरे निर्माण केली, त्यापैकी एक असलेले हे उत्तरेश्वर भगवान शिवाचे मंदिर आहे. या राजाने दण्डकारण्याचा भाग असलेल्या गोदावरी नदीच्या दोन्ही तीरावर अनेक शिवमंदिरांची निर्मिती केली आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आणि गौतम ऋषींच्या पावन पदस्पर्श वास्तव्याने पुनीत झालेल्या गौतमी अर्थात गोदावरी नदीच्या काठावर पुढील काळात साळुंखे राजवंशातील राजांनी भगवान शिवाच्या या मंदिरांचे निर्माण केले आहे.
उत्तरेश्वर मंदिरात राजे साळुंखे चाळुक्यांच्या शैलीतील अनेक वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहावयास मिळतात. मंदिर शैलीतील ही वैशिष्ट्ये आणि शिल्प वैशिष्ट्यांना पाहिल्यानंतर या मंदिराचे निर्माण विक्रमादित्य साळुंखे (सहावा) राजाने इ.सन १०७५ ते ११२६ या काळात केलेले लक्षात येते. चाळुक्य शैलीतील मंदिर निर्माणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये असलेली मकरमुख जलवाहिनी आणि सप्त नृत्यमातृका या ठिकाणी पाहावयास मिळतात. याशिवाय राजे साळुंखे चाळुक्य शैलीतील अनेक वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहावयास मिळतात. चाळुक्य मंदिर निर्माण शैलीच्या बहुतांश वैशिष्ट्यांना (टोटेम) मंदिरावर कोरलेली दिसून येते.
उत्तरेश्वर मंदिर रचना उंच जोत्यावर केलेली असून एकूण साडेबावीस पायर्यांना चढून वरती गेल्या नंतर मंदिरात प्रवेश होतो. मंदिराच्या साडेबावीस पायऱ्या आणि गोदा काठावरील राजे तौर ठाकूर राजवंशाच्या वंशजांची साडेबावीस गावची जहागीरदारी हा निव्वळ योगायोग समजावा का? शिवाय राजे तौर ठाकूरांच्या जहागिरीतील साडेबावीस गावांची मोजदाद उक्कडगाव येथूनच केली जाते. उक्कडगाव हे तौरांच्या जहागीरदारीतील सर्वात थोरले गाव समजले जाते. राजे तौर ठाकूर यांच्या गावातून तौर वंशजांना उत्तरकालीन कल्याणच्या मल्ल साळुंखे राजांनी दिलेल्या मल्ल अर्थात माली/मुलकी पाटीलक्या असल्यामुळे राजे तौर ठाकूरांची ही साडेबावीस गावे राजे साळुंखे चाळुक्यांच्या काळापासून अस्तित्वात असल्याचे लक्षात येते. राजे तौर ठाकूर हे उत्तरेतील कुरू अर्थात पांडव तर दक्षिणेतील होयसळ राजवंशाचे वंशज आहेत. या वंशजांची गोदा काठावर बीड जिल्ह्यात साडेबारा, जालना जिल्ह्यात नऊ तर परभणी जिल्ह्यात एक अशा साडेबावीस गावांतून बहुसंख्येने लोकवस्ती पाहावयास मिळते.
भगवान उत्तरेश्वर शिवाच्या नावावरून या गावचे नाव उकडगाव झाल्याचे लक्षात येते. उत्तरेश्वराच्या मंदिराचे निर्माण अगदीच गोदाकाठी असून, या मंदिराचे बांधकाम त्रिकूटपंथी स्वरुपातील करण्यात आलेले आहे. मंदिराला उत्तराभिमुख मुख्य दरवाजा असून पूर्व आणि पश्चिमेकडून अजून दोन दरवाजे आहेत. मंदिराला तिन्ही बाजूंनी (दक्षिण सोडून) दरवाजे असल्यामुळे या वास्तू प्रकाराला त्रिकूटपंथी प्रकारातील मंदिर निर्माण संबोधले जाते. मंदिर उंच जोत्यावर स्थित असून प्राचीन नंदीचे मुंडके भग्न झाल्यामुळे या नंदीला अलीकडील काळातील मुंडके बसवल्याचे लक्षात येते. नंदीची स्थापना प्रवेश मंडपात करण्यात आलेली आहे. मंदिराची रचना प्रवेश मंडप, सभामंडप, अंतरंग मंडप, गर्भगृह तसेच मुख्य मंडपाला तीन द्वारशाखा आणि प्रत्येक द्वार शाखेला स्वतंत्र प्रवेश मंडप अशी आहे. मंदिर परिसरात अग्नैय्यकडून पुष्करणी बारव असल्याचे सांगितले जाते. मात्र सदरील बारव काळाच्या ओघात नष्ट झाली आहे, जमिनीखाली गाडला गेला आहे. आज त्याच्या खुणा तेवढ्या दिसून येतात.
उक्कडगाव परिसरात कोसो दूर छोटा दगड सुद्धा बघायला मिळत नसताना शिवाय जमिनीखाली शंभर फूट खोलवर काळी माती आहे, त्यामुळे मंदिराचे निर्माण मोठमोठ्या घडीवजोडीव काळ्या कातळातील दगडांनी कसे केलेले असावे? याचे उत्तर म्हणजे मंदिराच्या मोठमोठ्या शिळा गोदावरी नदीच्या प्रवाहात तराफ्यातून आणलेल्या असाव्यात आणि यातून या मंदिराचे निर्माण केलेले असावे हे लक्षात येते. मंदिर निर्माण ३० खांबावर उभे आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबाला रांगोळी वगैरे डिझाईन शिल्पे कोरलेली आहेत. मंदिर स्तंभाला उलट्या नागफडा, त्रिपुंडी तिलक, रांगोळी डिझाईन कोरलेले आहे. मंदिराचे काही स्तंभ शिल्पाकृती प्रकारातील असून स्तंभावर साळुंखे राजांनी त्यांच्या विविध शिल्प वैशिष्ट्यांना कोरलेले आहे. साळुंखे राजांनी मंदिराच्या आत आणि बाहेरूनही राजवंशाच्या परिवार देवतांना ठेवण्यासाठी देवकोष्टकांच्या निर्मिती केलेल्या असून आज मात्र कोणत्याही देवकोष्टकात साळुंखे राजवंशाच्या परिवार देवता दिसत नाहीत. काळाच्या ओघात या परिवार देवता नष्ट झालेल्या असाव्यात. साळुंखे राजांनी मंदिरात कोरलेल्या प्रत्येक शिल्पांमधून त्या काळातील धार्मिक, अर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीची जाणीव व्हायला मदत मिळते.
उत्तरेश्वराच्या सभामंडपात आणि रंगशिळेवर आधुनिक काळातील फरशी काम केल्यामुळे तसेच संपूर्ण मंदिराला बटबटीत रंगकाम केल्यामुळे मंदिराचे मूळ सौंदर्य लय पावले आहे. गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तीमुख कोरलेले असून चौकटीच्या ललाटबिंबावर गणेश पट्टीला कोरलेले आहे. गणेश पट्टीच्या वरती साळुंखे राजांनी त्यांच्या परिवार देवता असलेल्या सप्त नृत्यमातृकांच्या पट्टीकेला कोरलेले आहे. उत्तरेश्वराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर गर्भगृहातील विस्तीर्ण प्राचीन शिवलिंग दृष्टीस पडते. हे शिवलिंग पूर्वमुखी (तीर्थी) आहे. असे पूर्वमुखी जलवाहिनी असलेले शिवलिंग गोदावरी काठावर बहुदा दुसरे नसावे ! गर्भगृहाला मकरमुख जलवाहिनी शिल्प लावलेले असून मकरमुख हे राजे साळुंखे चाळुक्यांच्या मंदिर निर्माण शैलीतील एक प्रमुख वैशिष्ट्ये आहे.
उक्कडगाव या गावाच्या नावातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे. उक्कडगाव या शब्दाचा अर्थ 'hi agriculturist Village' असा होतो. उक्कड हे नाव ओक्काळी या नावाचे अपभ्रंशीत रूप आहे. उक्कड अथवा ओक्काळी म्हणजे, ही दक्षिणेतील 'agriculturist Village assembly' अशा अर्थाने घेतली जाणारी एक संज्ञा आहे.
'There are many linguist rules. Sanskrut - Kannada groups of letters etc etc. Linguistics is allied branch in especially ancient India.' ओक्काळी (Okkali) या शब्दापासून ओक्काळगे (Okkalage) अर्थात ओक्काडगे (Okkadage) 'गे' चे अधुनीक रूप म्हणजे गाव (ge = gaon) म्हणजेच या अशा सर्व गोष्टीतून Ukkadgaon (उक्कडगाव) हा शब्द प्रचलित झाला. या वरील बाबीचा विचार केला, तर राजे तौर-ठाकूर जहागीरदारांच्या साडेबावीस गाव समूहातील उक्कडगाव हे प्रमुख गाव असल्याचेही लक्षात येते. शिवाय राजे तौर-ठाकूर यांच्या सर्व साडेबावीस गावामधून तौरांचे थोरले गाव म्हणून उक्कडगाव यालाच मान आहे. राजे तौरांच्या जहागिरीतील साडेबावीस गावांची मोजदाद उक्कडगाव येथूनच करावी लागते.
- - - - - - - - - - - - - - -
भगवान उत्तरेश्वराच्या मंदिराचे निर्माण इ. सनाच्या बाराव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे. हे मंदिर निर्माण राजे साळुंखे चाळुक्य नरेश षष्ठ विक्रमादित्याने इ.सन १०७५ ते ११२६ या कालावधीत निर्मित केलेले आहे. राजे तौर ठाकूर राजांनी तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात केव्हातरी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असल्याचे त्यांच्या वंशजातून सांगण्यात येते. उत्तरेतील कुरू अर्थात (पांडव) तोमर तंवर राजवंशाचे पुढे तौर असा अपभ्रंश झालेला आहे. गोदाकाठचे राजे तौर ठाकूर उत्तरेतील कुरू तर दक्षिणेतील होयसळ राजवंशाचे वंशज आहेत. पुढील काळात या घराण्यात रणांगणे गाजवणारी सरदारांची एक मोठीच फळी निर्माण झालेली दिसते. मात्र इतर मराठा घराण्यांप्रमाणे इतिहास न लिहून ठेवण्याची कीड या घराण्याला सुद्धा लागल्याने, सरदार महादजी तौर ठाकूर, सरदार मेघाजी तौर ठाकुर, सरदार त्र्यंबकराज तौर ठाकूर, सरदार दत्तराज तौर ठाकूर खेरीज इतर सरदारांची नावे अथवा इतिहास राजे तौर ठाकुरातील कोणालाही ठावे नसावा, हे दुर्दैव वाटते. पुढे तेराव्या, चौदाव्या शतकात तोमर(तौर)राजे उदयनसिंगजी राजे तौर-ठाकूर यांनी उक्कडगाव येथील उत्तरेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे उल्लेख सापडतात. राजे उदयनसिंगजी तौर-ठाकूर यांच्या पूर्वज वंशावळीत मानसिंग तौर केशरसिंग तौर-ठाकूर वगैरे नावे सापडतात.
दरम्यान महाशिवरात्री असो वा श्रावणातील सोमवार! या निमित्ताने उक्कडगाव येथे भगवान उत्तरेश्वराची (महादेव) भव्य यात्रा भरते. यावेळी उत्तरेश्वराच्या दर्शनासाठी दूरवरून हजारो भाविक हजेरी लावून जातात. प्रत्येक श्रावणी सोमवाराचे दिवशी येथे शिवभक्तांची मोठीच रेलचेल पाहावयास मिळते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तर गावात सात दिवसाचा सामुहिक जपानुष्ठानचा भव्य कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाची सांगता महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर करण्यात येते.
मार्गदर्शक :
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
@
शब्दांकन :
सतीशकुमार शिवाजीराव सोळंके-देशमुख,
(एम.ए.बी.एड् & बी.पी.एड्),
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर.
👉M.D.R.T. USA
👉L.I.R.T. INDIA
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक काॅलनी गेवराई,
ता.गेवराई,
जि.बीड.
9422241339,
9922241339.

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...