


आई ब्राह्मण वंशाची तर वडील क्षात्रिय!
--------------------
--------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
--------------------..........

देवगिरी यादवांचे काही रंजक इतिहास किस्से कदाचित इतिहास अभ्यासकांना ठावे नसतील! इसवी सन ९७३ ते ११८९ अशा काळात दोनशे वर्षांहून अधिक काळ उत्तरकालीन कल्याणच्या चाळुक्यांचे (साळुंखे) महासामंत अर्थात मांडलिक राहिलेले यादव घराणे देवगिरीवर सत्तेत आल्यानंतर यांनी इ.सन ११८९ ते १२९४ अशा केवळ १०५ वर्षाच्या काळात देवगिरीवर स्वतंत्र राज्य केले. १२९४ ते १३१३ अशा काळात ते अल्लाउद्दीन खिलजी, मुस्लिम सत्तेचे मांडलीकही राहिले होते. यादव वंशातील देवगिरी नरेश कॄष्णदेवराय यादव यांची पत्नी लक्ष्मी ही ब्राह्मण वंशातील होती, रामदेवराव यादव हा तिचाच मुलगा होता.
विदर्भातील देवगाव खोलापूर येथील वंशाने ब्राह्मण असलेला सेनापती खोलेश्वर हा सिंघना यादव यांचा सेनापती होता. सिंघनाने आंबेजोगाई गाव त्याला इनाम दिले होते. खोलेश्वराची मुलगी लक्ष्मी ही कॄष्णदेवराय यादव यांची पत्नी तर, रामचंद्रदेव यादव याची आई होती. याची माहिती प्रा.डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या 'बीड जिल्हयातील शिलालेख व ताम्रपट' या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये आली आहे. याचाच अर्थ असा होतो की, रामदेवराव यांची आई ब्राह्मण तर वडील क्षात्रधर्मीय (मराठा) होते !
याबाबत विस्तृत माहिती ही की, विदर्भातील देवगाव खोलापूर येथील ब्राह्मण सेनापती खोलेश्वर हा सिंघना यादव यांचा सेनापती होता. सिंघनाने आंबेजोगाई गाव त्याला इनाम दिले होते. त्यामुळे महानुभाव साहित्यात सुद्धा आंबेजोगाईला खोलनायकाचे आंबे असेच संबोधन होताना दिसते. त्याचे चार शिलालेख आंबेजोगाई येथे आहेत. खोलेश्वराची मुलगी लक्ष्मी हिचा खोलेश्वर मंदिरावर शिलालेख असून, लक्ष्मी ही कॄष्णदेवराय यादव यांची पत्नी होती. रामचंद्र यादव हा तिचाच मुलगा. खोलेश्वराने गुजरात मोहिमेत मोठा पराक्रम गाजवला. त्याने सिंघन यादव दुसरासाठी दिग्विजय केला. त्याने जिंकलेल्या अनेक राजांची नावे या शिलालेखात आली आहेत.
खोलेश्वराचा मुलगा राम हा गुजरात मोहिमेत मारला गेला. तेव्हा सेनापती खोलेश्वर ब्राह्मणांची मुलगी आणि कॄष्णदेवराय यादव यांची पत्नी असलेल्या लक्ष्मी हिने आंबेजोगाई येथील ब्रह्मपुरीत रामनारायण मंदिर बांधले. हे मंदिर सध्या खोलेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदीरांवर तिचा शिलालेख आहे.
देवगिरीचा राजा कृष्णदेव यादवाची पत्नी आणि रामचंद्रदेव यादवाची आई असणारी लक्ष्मी ही आंबेजोगाई ची शासक होती. अगदी अलीकडे तिची नाणी देखील उपलब्ध झाली असून, त्यावर लशुमादेवी असा लेख आहे. यादव उर्फ जाधव(!) काळातील महिला शासक म्हणून खोलेश्वराची मुलगी, कॄष्णदेवराय यादव यांची पत्नी आणि रामचंद्र यादव यांची आई म्हणून लक्ष्मीचे नाव इतिहासात महत्वाचे ठरते.
(संदर्भ : बीड जिल्ह्यातील शिलालेख व ताम्रपट)
@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment