


वीरगतीला प्राप्त झालेल्या वीराची स्मृतीशिळा
-------------------
-------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
-------------------.........,

सदरील शिल्पप्रकार एका अनाम पराक्रमी वीरांची वीरगळ अथवा त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या पराक्रमाला कोरलेली त्याची स्मृतीशिळा आहे. ही वीरगळ प्राचीनकाळीन आहे. सदरील वीरगळ शिल्प उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या शैलीतील असून या शिल्पाचा निर्माण काळ साधारणपणे अकरावे-बारावे शतक असावा.
वीरगळ शिल्पाचा सर्वात वरचा सूर्य, चंद्र, मंगलकलश भाग फुटलेला दिसतो. याचा अर्थ सूर्य, चंद्र असेपर्यंत या वीराची कीर्ती अजरामर राहील असा होतो.
वीरगळीच्या सर्वात खालच्या कप्प्यात संगीतकारांचे वाद्यपथक दाखवले आहे. वीर गतीला प्राप्त झालेला वीर कैलासात जात असल्याने, हे वाद्यपथक कैलासातील आहे. विशेष म्हणजे, हे वाद्य पथक कैलासातील तंडू संगीतकार आहेत. ज्यांच्या संगीतावर महादेव तांडव नृत्य करतात.
वीरगळीच्या सर्वात खालच्या कप्प्यांमध्ये तंडू संगीतकार दाखवावेत, हा विरगळीतला अत्यंत दुर्मिळ प्रकार समजावा. त्यावरच्या कप्प्यामध्ये पराक्रमी वीराने रणात मोठे रणकंदन करून, त्याने रणातील अनेक प्रतिस्पर्धी वीरांना बंदी बनवले आहे. विरगळीमध्ये प्रतिस्पर्धी वीरांना बंदी बनवण्याचा प्रसंग दर्शविणे ही सुद्धा फार दुर्मिळ बाब आहे.
आपल्या मनगटाच्या जोरावर रणात पराक्रम गाजवून सदरील वीर धारातीर्थी पडल्यानंतर त्याला पालखीत बसवून कैलासातील अप्सरा सन्मानाने कैलासास घेऊन जात आहेत. वीरगळीमध्ये वाद्यपथक खाली दाखविल्यामुळे या वीराला वाजत-गाजत कैलासात मोठ्या सन्मानाने पालखीत बसवून नेले जात आहे.
वीरगळीच्या सर्वात वरती कैलास दाखवला असून कैलासातील महादेवाचे लिंग, त्याखाली नंदी आणि कैलासात एकरूप झालेला वीरगतीला प्राप्त झालेला तो वीर दर्शविला आहे. त्याच्यासमोर त्याची सेवा करणारी कैलासातील अप्सरा दिसत आहे. वीरगळीचा सर्वात वरचा कप्पा काळाच्या ओघात फुटलेला असावा, ज्यावर सूर्य-चंद्र मंगलकलश आणि कैलासाचे शिखर कोरलेले असते.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment