विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 August 2021

गनिमी कावा – युद्धतंत्र

 


गनिमी कावा – युद्धतंत्र

शिवाजी महाराजांनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी गनिमी कावा या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे.
गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमी हे त्या शब्दाचे रूप आहे. कावा या शब्दाला लक्षणेने फसवणूक, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि शत्रुचा कपटयुक्त हल्ला अथवा कपट-युद्’ असा ‘गनिमी कावा’ या संज्ञेचा अर्थ रूढ झाला.
मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख ‘गनिमी कावा’ या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, ‘आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!” ‘गनिमी कावा’ हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.
‘धूर्तपणा’, ‘कपट’, ‘कावेबाजपणा’ अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ ‘कावा’ या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून ‘कावा’ या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.
महाराष्ट्र शब्दकोशात कावा या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे’. गनिमी काव्याच्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.
कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे. पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते. तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो. मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने काव्याचे होते. भरवेगात धावणार्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता निरनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच ‘कावा’. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस ‘गनिमी कावा’ हे नाव दिले.
संदर्भ ग्रंथ: शिवकालीन राजनीती आणि रणनीती

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...