विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

यादव सत्तेच्या पतनानंतर अल्पकाळ टिकलेली 👇👇👇 हरपालदेव साळुंखे चाळुक्याची देवगिरी राजवट

 


यादव सत्तेच्या पतनानंतर अल्पकाळ टिकलेली
👇👇👇
हरपालदेव साळुंखे चाळुक्याची देवगिरी राजवट
---------------------------
@
‌ शंकरदेव यादव हा देवगिरीचा शेवटचा यादव राजा. यादवांच्या देवगिरी सत्तेच्या अस्तानंतर पुढे हरपालदेव चाळुक्य या रामचंद्रदेव यादवाच्या जावयाने इ.सन १३१३ मध्ये देवगिरीची मुस्लीम जोखडातून मुक्तता केली. त्यासाठी त्याला मुस्लिम विरुद्धच्या मोठ्या संघर्षातून देवगिरीवरील सत्ता स्थापनेचे हे कार्य सिद्धीस न्यावे लागले. त्यामुळे हरपालदेव साळुंखे चाळुक्याने देवगिरीवर चाळुक्य महासत्तेच्या रुपाने मराठ्यांची सत्ता प्रस्थापित केली. मात्र हे स्वातंत्र्य अल्पकालीन ठरले, इ.सन १३१८ मध्ये हरपालदेव साळुंखे चाळुक्याच्या हत्येनंतर देवगिरीचे हे राज्य कायमस्वरूपी पारतंत्र्यात गेले.
हरपालदेव साळुंखे चाळुक्यांने धर्मांतराला नकार दिल्याने त्याची कातडी सोलून त्याचा क्रूर पद्धतीने खून करण्यात आला. मृत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कार करताना त्याच्या चितेवर त्याच्या असंख्य सोबत्यांनी अग्निप्रवेश करून स्वतःचा अंत करविला. आपल्या राजाचा असा एकट्याने अंत व्हावा अशी त्याच्या सोबत लढलेल्या सोबत्यांची इच्छा नसल्याने त्यांनी अग्निप्रवेश करून हरपाळदेव चाळुक्य याची साथ अंतिम क्षणापर्यंत दिली. हरपाळदेवाचा राघव नावाचा एक अधिकारी होता, त्याने ही मुबारक खिलजीचा सेनापती खुसरू खान याच्याशी तेव्हा लढा दिल्याची माहिती मिळते.
तत्पूर्वी देवगिरीवर यादवांनी इ.सन ११८९ ते १२९४ अशा १०५ वर्षाच्या काळात देवगिरीवर आपले स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले. त्यापूर्वी यादव हे उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांचे जवळपास दोनशे वर्षाहून अधिक काळ महासामंत अर्थात मांडलिक होते. पुढे रामचंद्रदेव यादवांच्या काळात देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण झाले. खिलजीच्या आक्रमणानंतर देवगिरीचे यादव खिलजीचे मांडलिक बनले. त्यानंतरच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी व मुस्लिम सत्तेच्या मांडलिकत्वात देवगिरी यादवांनी इ.सन १२९४ ते १३१३ अशा काळात राज्य केले.
दिल्लीतील राजकीय अस्थिरता आणि तेथील अंतर्गत बंडाळीत खिलजीला कैदेत टाकून मलिक कपूर दिल्लीचा सुलतान झाला. रामचंद्रदेवानंतर देवगिरीवर त्याचा मुलगा शंकरदेव याने स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. यावेळी मलिक कपूरने दक्षिणेवर स्वारी करून त्याचे मनसुबे उधळून लावले. शंकरदेव यादवाने इ.सन १३१३ पर्यंत देवगिरीवर राज्य केले. शंकरदेव यादवानंतर देवगिरीची यादव सत्ता कायमची संपुष्टात आली.
मलिक कपूरचा खून करून मुबारकशहा दिल्लीच्या सुलतान पदावर आला. मुबारकशहाने हरपालदेव चाळुक्य याच्यावर खुश्रूखानला देवगिरीवर पाठविले. कारण शंकरदेव मारला गेल्यानंतर रामचंद्रदेव यादवाचा जावई असलेल्या हरपालदेव चाळुक्याने देवगिरीवर त्याचे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. हरपाळदेव चाळुक्याने मुस्लिम सत्ते विरुद्ध बंड करून एकेक किल्ल्यावर विजय मिळवत इस्लामी आक्रमकांना हरवण्याचे पराक्रम केले. तेथील इस्लामी राज्यकर्ते हाकलून लावत त्याने दक्खन मुक्त करून इ.सन १३१३ ते १३१८ अशा काळात दक्खन पुन्हा स्वतंत्र केली. हरपालदेव चाळुक्यावर हल्ला करणारे मुस्लिम तुर्क इत्यादी असंख्य झुंडीने येत होते. हरपाळदेव चाळुक्याने तीन लढाया दिल्यावर त्याची मात्रा या लाटांप्रमाणे येणाऱ्या झुंडीपुढे शेवटी निभाव लागला नाही.
‌‌ खुश्रूखानाने हरपालदेव यास राजे साळुंखे चाळुक्यांची राजधानी असलेल्या संगमेश्वर येथून जेरबंद केले. हरपाल देवास पकडून त्याची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. हरपाल देव आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या हत्येची तुलना करण्याचा येथे कसलाही उद्देश नसला तरी या दोघांच्याही हत्येत मात्र बरेच साम्य वाटते. विशेष म्हणजे हरपालदेव चाळुक्य आणि संभाजी राजे या दोघांचीही कैद कोकणातील संगमेश्वर येथून झालेली आहे, हा सुद्धा निव्वळ योगायोग समजावा! हरपालदेवाच्या मृत्यूनंतर देवगिरीच्या यादवांची हरपालदेवाच्या रुपाने असलेली उरलीसुरली सत्ता देखील कायमची संपुष्टात आली. पुढे महंमद तुघलकाने देवगिरी येथे आपली राजधानी हलविली आणि देवगिरी यादवांचे या प्रकाराने भारतीय इतिहासातील एक पर्व संपले.
हरपालदेव चाळुक्यास राजे साळुंखे चाळुक्यांच्या संगमेश्वर राजवंशातील वंशज म्हटले जाते. तो कामदेवरस चाळुक्य याचा पुत्र होता. त्यामुळे हरपाल हा राजे साळुंखे चाळुक्यांच्या संगमेश्वर शाखेतील वंशज होता. हरपालदेव चाळुक्याचे पिता कामदेवरस चाळुक्य हे यादव सम्राट रामचंद्रदेव याचे महामंडळेश्वर या महत्त्वाच्या पदावरील एक प्रमुख सामंत होते. शिवाय महानुभव साहित्यातही हरपालदेव चाळुक्यास गुजरातच्या सोळंकी राज्यातील सरदाराचा पुत्र असे संबोधन झालेले दिसते. राजे साळुंखे चाळुक्यांच्या संगमेश्वर येथील शाखेचा एक महत्त्वाचा इतिहास समजतो व या शाखेची राजधानी असलेल्या संगमेश्वर येथील मंदिरे जीच्यावर वराहलांच्छन कोरलेली का आहेत याचाही उलगडा चाळुक्यकुळ चिन्हामुळे होतो.
मार्गदर्शक :
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड.
सतीशकुमार सोळंके देशमुख,
९४२२२४१३३९,
९९२२२४१३३९.

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...