विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 23 September 2022

भोर संस्थान----2

 







भोर संस्थान-

मुंबई, पुणें जिल्हा. हें संस्थान उ. अ. १८० ते १८० ४५' व पूर्व रेखांश ७३० १४' ते ७३० १५' यांत होते. संस्थानच्या राजधानीचें भोर हें शहर पुण्याच्या दक्षिणेस सुमारें ३० मैलांवर नीरा नदीच्या तीरीं वसलेलें असून सभोंवार सह्याद्रीचे फांटे आहेत ह्या गांवावरून महाड-पंढरपूर रस्ता वरंच्या घाटानें गेलेला आहे. भोर येथें नीरेस घाट आहे. राजवाडा, भोरेश्वर देवालय, रामबाग बंगला, हायस्कूल या पहाण्यासारख्या इमारती आहेत. राजवाडा भव्य व जुन्या पद्धतीनें बांधलेला आहे. हें शहर लहान पण टुमदार असून येथील हवापाणी चांगलें आहे. पुण्याचा कलेक्टर हा भोर संस्थानचा पोलिटिकल एजंट आहे. या संस्थानचा प्रदेश पुणे, सातारा व कुलाबा या तीन जिल्ह्यांत विभागलेला आहे. संस्थानचे एकंदर पांच तालुके आहेत; पैकीं विचित्रगड सातारा जिल्ह्यांत; राजगड, प्रचंडगड, व पौनमावळ हे पुणें जिल्ह्यांत; आणि पांचवा सुधागड हा कुलाबा जिल्ह्यांत आहे. सुधागडशिवाय चारी तालुक्यांचा प्रदेश घाटमाथ्यावरीलमावळांत आहे संस्थानांत एकूण ५०२ गांवें आहेत. संस्थानचें क्षे. फ. ९२५ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) १३०४१७ आहे. संस्थानचा ३/४ भाग डोंगराळ आहे. ३/४ जमीन तांबडी असून, पाण्याखालीं जमीन फार थोडी आहे. पाण्याचा पुरवठा बहुतेक विहिरींपासून होतो. घाटमाथ्यावरून निघालेल्या मोठ्या नद्या नीरा, मुठा, मुळा, वेळवंडी व गुंजवाणी ह्या आहेत. याशिवाय लहान नद्याहि आहेत. भोरापासून उत्तरेस सुमारें २ मैलांवर वेळवंडी नदीस भाटघर येथें धरणाचें मोठें काम केलेलें आहे. हें प्रथम ९० फूट उंच होतें, तें हल्लीं (१९२६) १५० फूट उंच करण्यांत येत आहे. या धरणाचें पाणी नीरा उत्तर व नीरा दक्षिण या नांवाच्या मोठाल्या कालव्यांतून फार दूरवर दुष्काळी जिल्ह्यांत नेलें आहे. या कामासाठीं संस्थाननें आपली पुष्कळशीं गांवें बुडूं दिलीं आहेत. घांटमाथ्यावर कोठें थंड, कोठें समशीतोष्ण हवा आहे व सुधागड तालुक्यांत उष्ण हवा आहे. घाटमाथ्यावर पाऊस सुमारें १० पासून १०० इंचांपर्यंत पडतो व सुधागडकडे १५० पर्यंत पडतो. घांटावर मुख्य धान्यें भात, नागली, वरी, जोंधळा व बाजरी हीं आहेत. सुधागड तालुक्यांत मुख्य पीक भाताचें आहे. जंगलांत साग, हिरडा, जांभूळ, आंबा, फणस ही मुख्य झाडें आहेत. घाटमाथ्यावर सर्वत्र रानडुकरें व थोडे वाघहि आहेत मुख्य लोकवस्ती हिंदूंची आहे. निर्गत माल भात, हिरडा व साग व आयात माल भाताशिवाय सर्व धान्यें व इतर सर्व त-हेचा माल संस्थानचें वार्षिक उत्पन्न सुमारें पांच लाखांचें आहे.
किल्ले
संस्थानांत विचित्रगड तालुक्यांत रोहिडा, राजगडांत राजगड, प्रचंडगडांत प्रचंडगड (तोरणा), पौनमावळांत तुंग व तिकोना आणि सुधागडांत भोरप व सरसगड असे एकंदर ७ किल्ले आहेत. बहुतेक किल्ले इतिहासप्रसिद्धच आहेत. राजगडाची बांधणी प्रेक्षणीय आहे. प्रचंडगड हा सर्व किल्ल्यांत उंच आहे. भोरापासून दक्षिणेस सुमारें ८ मैलांवर भोर व वाई यांच्या दरम्यान अंबाडखिंड उर्फ विश्रामघाट येथें संस्थानची धर्मशाळा, वाडा व अन्नसत्र आहे. येथील हवा पांचगणीसारखी थंड आहे. भोरच्या आग्नेय दिशेस अंबवडे येथें शंकराजी नारायण (पंतसचीव घराण्याचा मूळपुरूष) यांची समाधि आहे. राजगड तालुक्यांत बनेश्वर, विचित्रगडांत रायरेश्वर व सुधागडांत उन्हाळें हीं स्थळें पहाण्यासारखीं आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...