पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ
देवास येथील पवार घराणे
शिंदे, होळकर, गायकवाड यांच्यासह ओघाने घेतले जाणारे नाव म्हणजेच मध्य भारतातील धार तथा देवास येथील पराक्रमी पवार घराणे होय. शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आसेतूहिमाचल हिंदवी स्वराज्य विस्ताराचे भव्यदिव्य स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोरल्या बाजीराव राऊस्वामींनी जे बळकट बुरूज मध्य हिंदुस्थानात रोवले होते, त्यातील हा धार, देवास येथील पवार घराण्याचा एक होता.
पेशवेकालीन कालखंडात मध्य हिंदुस्थानात मराठेशाहीचे जे मजबूत बुरूज बाजीरावांनी रोवले होते त्यातीलच हा एक, अर्थात दोन म्हणजे धार येथील पवार संस्थानिक राज्य करीत असलेली परंतु दोन्हीही राज्यांची एकच राजधानी असलेले माळव्याच्या भूभागातील मराठी संस्थान म्हणजे देवास राज्य. या संस्थानचे दोन भाग असलेले राज्य म्हणजे देवास – थोरली पाती (डशपळेी लीरपलह) आणि देवास – धाकटी पाती (र्गीपळेी लीरपलह). ही नावं तसेच राजधानी ही समान असलेली; परंतु राजे, राज्यकारभार वेगळा असलेली दोन जोड संस्थाने होती. या दोन्ही शाखा ग्वाल्हेर, इंदोर, नरसिंहगड, जावरा आदी संस्थानच्या सरहद्दीमुळे मर्यादित भूभागात राहिल्या होत्या. या संस्थानचे सर्वसामान्यपणे क्षेत्रफळ सुमारे 2,300 चौरस किलोमीटर इतके होते. थोरल्या बाजीरावराऊस्वामींनी तुकोजीराव आणि जिवाजीराव या दोन पवार बंधूंना 1728 मध्ये आपल्यासोबत मध्य हिंदुस्थानातील मोहिमेवर नेले होते. त्यांच्या पराक्रमाची तळपती तलवार बघून बाजीरावांनी त्यांना देवास, अलोट, गडगुचा, रिंगणोद ,सारंगपूर, बागौद इत्यादी परगणे इनाम दाखल दिले. धारच्या मूळ पवार घराण्यातीलच असलेल्या या पवार संस्थानिकांना त्यांनी अजून माळव्यातील काही प्रदेश व काही हक्क ही बहाल केले. यातील थोरल्या पातीचे संस्थापक होते तुकोजीराव पवार पहिले. हे माळव्यात आपल्या पराक्रमाची पताका फडकवून 1753 मध्ये निवर्तले. त्यांच्यानंतर त्यांचा पुतण्या कृष्णाजीराव हा दत्तकविधान होऊन गादीवर आला. पुढे कृष्णाजीरावाने राघोबादादा विरुद्ध बारभाईंना साहाय्य केले. हे कृष्णाजीराव महादजी शिंदे यांचे अत्यंत विश्वासू गणले जात होते, जणू काही उजवा हात. मराठेशाहीच्या पानिपतच्या युद्धात या कृष्णाजीरावांचा सहभाग होता. यांच्या मृत्यूनंतर यांचा मुलगा तुकोजीराव दुसरा हा इसवी सन 1789 मध्ये गादीवर आला. मात्र पुढील काळात पेंढारींसोबतच दुर्दैवाने शिंदे, होळकर यांजकडूनही या संस्थानाला उपद्रव आणि नुकसान सहन करावे लागले, असे इतिहास सांगतो. अखेर पेशवाईच्या 1818 मधील अस्तासोबतच हे देवास संस्थान देखील इंग्रजांचे अंकित बनले, तेही 28,500/- वार्षिक खंडणी मान्य करूनच.
यानंतर 1838 मध्ये संस्थानाने अंतर्गत बंडाळी मोडून काढण्यासोबत 1841 मध्ये ब्रिटिशांना एका प्रकरणात साहाय्य केले. यानंतर देवास संस्थान च्या वाटण्या होऊन थोरल्या पातीत 1160 चौरस किलोमीटरचा भूभाग आणि देवास, अलोट, राघोगड, बागौद व सारंगपूर हे परगणे आले. तसेच धाकट्या पातीत सुमारे 1100 चौरस किलोमीटरचा प्रदेश व देवास, बागौद, सारंगपूर, बडगुचा, रिंगणोद, अकबरपूर हे परगणे समाविष्ट करण्यात आले. यामुळे देवास, सारंगपूर व बागौद या परगण्यांचेही विभाजन झाले. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात राघोगडच्या (देवास) ठाकूर दौलतसिंह यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध साहसी उठाव केला होता. त्यांना ब्रिटिशांनी गुणा येथे फासावर चढवले होते. थोरल्या पातीच्या गादीवर कृष्णराव द्वितीय हे आरूढ झाले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थान कर्जात बुडले म्हणून राज्यकारभार सांभाळायला इंग्रज अधीक्षक / ठशीळवशपीं ची नियुक्ती करण्यात आली. या वेळी दिनकरराव राजवाडे, विष्णू केशव कुंटे आदी दिवाणांनी उत्तम प्रकारे प्रशासन व्यवस्था राखून अनेक सुधारणाही केल्या. यानंतर 1899 मध्ये तुकोजीराव पवार तिसरे हे गादीवर आले. हे महाराज अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. ते मराठा तसेच धनगर समाजाच्या शिक्षणात, उन्नतीकरिता विशेष लक्ष देत होते. त्यांनी वेदोक्त पद्धतीने मौजीबंधन (मुंज) ही केले होते. पुढे मात्र त्यांनी राजसंन्यास घेऊन पाँडिचेरी येथे वास्तव्य केले. त्यांचे सुपुत्र महाराज विक्रमसिंहराव यांची पुढे कोल्हापूर छत्रपतींच्या गादीसाठी इसवी सन 1947 मध्ये दत्तकपुत्र म्हणून निवड झाली. यामुळे तुकोजीराव तिसरे यांचे नातू कृष्णराव हे गादीवर आले. 1948 मधील संस्थाने विलीनीकरणाच्या वेळी हेच अखेरचे संस्थानिक म्हणून गादीवर होते. देवास थोरल्या पातीला 15 तोफांची सलामी तसेच दत्तक सनद होती.
देवास हे संस्थान महाराज जिवाजीराव पवार यांनी स्थापन केलेले असले तरी या मूळ संस्थानाच्या वाटण्या 1841 मध्ये झाल्या. जिवाजीराव पवार हे इसवी सन 1785 मध्ये मृत्यू पावले. 1892 मध्ये महाराज मल्हारराव पवार हे देवास धाकटी पाती संस्थानच्या गादीवर आले होते. देशाच्या स्वातंत्र्याची चाहूल लागल्यानंतर या संस्थानचे इसवी सन 1943 मध्ये राजगादीवर आलेले संस्थानिक यशवंतराव पवार हे विलीनीकरणाचे समयी पण गादीवर होते. त्यांना महाराज हा किताब मिळालेला होता. तसेच थोरल्या पातीप्रमाणेच 15 तोफांच्या सलामीचा मान आणि दत्तकविधानची सनद मिळालेली होती. एकूणच आरोग्य, शिक्षण, जकातव्यवस्था सोडली तर दोन्हीही पात्यांचा कारभार हा स्वतंत्र होता. 1922 सालापासून दोन्हीकडे जबाबदार राज्यपद्धती अमलात आलेली होती. विसाव्या शतकात दोन्हीही संस्थानात स्थानिक स्वराज्य, वीजपुरवठा, शिक्षण, बँका, वनसंरक्षण, पाणीपुरवठा, वृत्तपत्रे, औद्योगिकीकरण, छापखाने आदी बाबतीत खूपच सुधारणा व बदल झाले होते. 1948 मध्ये इतर सर्व मंडळीप्रमाणेच ही दोन्हीही संस्थाने आधी मध्य भारतात आणि मग 1 नोव्हेंबर 1956 ला मध्य प्रदेशात समाविष्ट करण्यात आली.
एकूणच अवलोकन करताना असे जाणवते की, या संस्थानच्या अधिपतींकडून अतिविशेष अशी काही कामगिरी घडलेली नाही तसेच फारसा पराक्रम ही यांच्या नावांवर नोंदला गेलेला नाही. धाकट्या पातीचे संस्थानाधिपती नारायणराव पवार (कार्यकाल 1864 – 1892) यांची इसवी सन 1888 मध्ये पाडलेली तांब्याची नाणी – 1/12 आणा व 1/4 आणा ही ‘देवास संस्थान धाकली पाती’ या लिखावटीसह तसेच थोरल्या पातीची नाणी कृष्णाजीराव पवार (कार्यकाल इ.स. 1860 – 1899) आणि महाराज विक्रमसिंहराव पवार (कार्यकाल इ.स. 1937 – 1948) यांचीच नाणी उपलब्ध आहेत. याखेरीज अलोट मिंट येथे हाती पाडलेले (र्लीीवश ीूंशि) आणि मशिनद्वारे पाडलेली तांब्याची नाणी आढळून येतात. ही सर्व नाणी अतिशय माफक संख्येने पाडलेली असून, तशा नोंदी उपलब्ध आहेत. मात्र महाराजा विक्रमसिंहराव पवार यांनी स्वतःची प्रतिमा असणारा छापलेला नजराणा पैसा हा देवास संस्थान च्या नाण्यांचा ‘मुकुटमणी’ म्हणता येईल, असा उत्कृष्ट आणि अर्थातच दुर्मीळही आहे.
No comments:
Post a Comment