छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते हे आपण जाणतोच पण आपल्या राज्याचा आर्थिक पाया मजबूत असेल तर राज्याचे लष्करी आणि राजकीय व्यवहार आणि व्यवस्था सुरळीत चालतात ह्यांची शिवाजी महाराजांना पूर्ण कल्पना आणि जाण होती म्हणूनच स्वराज्यातील व्यापार आणि उद्योग वाढावा म्हणून महाराजांनी प्रयत्न केलेले दिसतात.
रामचंद्र अमात्य यांनी लिहलेल्या आज्ञपत्र या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या व्यापारधोरणा संदर्भात काही उल्लेख आढळतो - " साहूकार ( सावकार ) म्हणजे राज्याची शोभा. साहूकाराकरीता राज्य अबादान होते. न मिळे वस्तुजात राज्यात येते. राज्य श्रीमंत होते. पडिले संकट परिहार होते. साहुकारांच्या संरक्षणात बहुत फायदा आहे याकरिता साहुकाराचा बहुमान चालवावा " हा उद्योग वाढीबद्दल आज्ञापत्रात असलेला छोटासा सारांश महाराजांच्या व्यापारी वर्गाविषयीची नीती सांगून जातो ..
आपल्या राज्यातील व्यापारांचाच नाही तर परप्रांतातील व्यापार्यांचा बहुमान करा असे उत्तेजन देणारे महाराज इंग्रज, यूरोपीय व्यापार्याबद्दल सावधगिरी बाळगत होते हे देखील खुप महत्वाचे आहे याचाही उल्लेख आज्ञापत्रामध्ये आहे. स्वकीय व्यापारी लोकांना आपल्या बाजारपेठेत दुकानें मांडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे म्हणणारी महाराजांची राजनीति टोपीकर इंग्रज लोकांविषयी सावधानतेचा इशारा देते. इंग्रजांना वखारीस जागा देणे भाग पडले तर खाड़ीजवळ अथवा समुद्रकिनारी न देता शहराच्या बाहेर द्यावी म्हणजे त्यांचा संपर्क इतर लोकांशी येऊ नये या उद्देशाने त्यांच्यावर नजर ठेवता येईल अशी ही व्यापारनीती सांगते ..
परदेशातून येणाऱ्या स्वस्त मालाच्या स्पर्धेत स्वदेशात तयार होणारा माल तग धरु शकत नाही अशा परिस्तिथिला स्वदेशी मालाला संरक्षण देणे अनिवार्य असते या संदर्भात ही शिवाजी महाराजांची व्यापारनीति त्यांच्या पत्रातून दिसून येते. संगमेश्वराचा मिठाचा मामला हा सर्वश्रुत आहे. या संदर्भात परकीय मालावर जास्तीत जास्त कर लावावा म्हणजे त्या वस्तु महाग पडतील व लोक ते न घेता आपला स्वदेशी माल घेतील अशी तरतुद महाराजांनी केलेली दिसते ..
मुलकीव्यवस्था, लष्करीव्यवस्था यामध्ये कुशल असणारे छत्रपती शिवाजी महाराज १६ व्या शतकात ही व्यापारीधोरणात ही कुशल आणि दूरदर्शी होते याची जाणीव आल्यावाचून राहत नाही. असा दूरदर्शी राजा एक अष्टपैलू महापुरुष आपल्या देशाला भेटला हे आपले भाग्य आहे ..
अद्वितीय_छत्रपती_शिवराय

No comments:
Post a Comment