सर्वसामान्य इतिहास वाचकांना त्रिंबकजी ज्ञात आहे तो 1815 सालच्या गंगाधरशास्त्री खून प्रकरणामुळे. फारतर पेशवाईच्या उत्तरार्धातील दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा एक नवखा पण विश्वासू सरदार म्हणून.
इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम मराठी मुलखात उठाव घडवून आणणारा त्रिंबकजी, स्वतःच्या राजकीय आयुष्याची पर्वा न करता पेशवाई वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा त्रिंबकजी, शिंदे-होळकर-भोसले-गायकवाड या मराठेशाहीच्या स्तंभांना एकत्रित आणण्यासाठी धडपडणारा त्रिंबकजी, इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या तुरुंगातून पळणारा त्रिंबकजी, ब्रिटिशांविरुद्ध गुप्तपणे पेशव्यांसाठी फौजेची जमवाजमव करणारा त्रिंबकजी, कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजवणारा त्रिंबकजी व धुळकोटला अखेरपर्यंत पेशव्यांची साथ न सोडणारा त्रिंबकजी महाराष्ट्राला फारसा ज्ञात नाही.
त्रिंबकजीला इतिहासात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ना.सं.इनामदार यांनी केला. त्रिंबकजी मराठी वाचकांपर्यंत पोहोचला तो त्यांच्या 'झेप' कादंबरीमुळेच.
त्रिंबकजी संगमनेरजवळील निमगावजाळी गावचे. शेतकऱ्याचं पोर ते पेशव्यांचा कारभारी हा त्रिंबकजीचा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्रिंबकजी सुरुवातीस दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी हेर अथवा जासूद होते. 1802 साली यशवंतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केल्यावर पेशवे महाडला पळून गेले तेव्हा त्रिंबकजी त्यांच्यासोबत होता.बाजीरावाचे एक गुप्त पत्र पुण्याला पोहोचवून त्याचे उत्तर त्रिंबकजीने मोठ्या शिताफीने आणले व पेशव्यांची मर्जी संपादन केली.पुढे त्रिंबकजी बाजीरावाचा विश्वासु बनला. त्रिंबकजीवर सोपवलेली पहिली मोठी जबाबदारी म्हणजे सातारा छत्रपतींवर देखरेख ठेवणे होय. त्यानंतर कर्नाटक प्रांताचा सुभेदार म्हणून त्रिंबकजीची नेमणूक करण्यात आली(1804).
1802 च्या वसई तहामुळे पेशव्यांच्या कारभारावर इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला. मराठी राज्यात झालेला इंग्रजांचा हस्तक्षेप त्रिंबकजीला पहावत नसे. त्याने सर्व मराठी सरदारांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न चालवले. शिंदे,होळकर,भोसले,पेंढारी यांच्याकडे आपले वकील रवाना केले. फौजेची जमवाजमव सुरू केली. 1814 ला त्रिंबकजी अहमदाबादचा सुभेदार झाला. पुढे सदाशिवभाऊ माणकेश्वर यांच्या जागी त्रिंबकजी पेशव्यांचे कारभारी(Cheif Minister) झाले.
1814 साली बडोद्याहून गायकवाडांचे दिवान गंगाधरशास्त्री पटवर्धन पुण्यात आले. गायकवाडांची पेशवे सरकारकडे पुष्कळ थकबाकी होती तसेच गुजरातेतील काही सुब्यांचा प्रश्न होता. वर्षभरापासून त्या वाटाघाटी चाललेल्या होत्या. गंगाधरशास्त्री यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतलेली होती.
1815 च्या जुलै महिन्यात पंढरपुरात गंगाधरशास्त्र्यांचा खून होतो. त्याचे आरोप इंग्रज त्रिंबकजीवर करतात. वास्तविक त्रिंबकजीला गंगाधरशास्त्र्यांचा खून करून काहीही फायदा होणार नव्हता. सुरुवातीपासूनच इंग्रजांविरुद्ध गायकवाडांना आपल्या बाजूने आणण्याचा त्रिंबकजी गंगाधरशास्त्र्यांमार्फत प्रयत्न करत होता. हे खून प्रकरण आजतागायत गूढ व अनाकलनीयच राहिले आहे. अलीकडील ऐतिहासिक शोधांवरून हा खून त्रिंबकजीने केला नाही,असेच स्पष्ट होत आहे. परंतु आपल्या मार्गातील काटा काढण्याची इंग्रजांना ही आयतीच संधी मिळाली. इंग्रजांनी बाजीरावाकडे त्रिंबकजीची मागणी केली. प्रारंभी पेशव्यांनी त्यास कराड जवळील वसंतगडावर ठेवले परंतु त्यावरही इंग्रजांचे समाधान न होता त्यांनी त्रिंबकजीला आपल्याच हवाली करावे यासाठी बाजीरावावर दबाव आणण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 1815 ला त्रिंबकजीला इंग्रजांनी ठाण्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवले. पुढे वर्षभराने 12 सप्टेंबर 1816 ला त्रिंबकजीने ठाणे तुरुंगातून पलायन केले. पुढे ते त्र्यंबकेश्वर व नाशिक भागात आले.
त्रिंबकजी इंग्रजांविरुद्ध फौज गोळा करण्याचा प्रयत्न करु लागले. प्रारंभी त्यांनी खानदेशात जाऊन तेथील भिल्ल समाजाला संघटित केले. त्रिंबकजी स्वतः भिल्ल जमातीत जाऊन त्यांना जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध उठवण्याचे प्रयत्न करू लागला. सुमारे 8,000 भिल्लांनी खानदेश व बागलाण भागात इंग्रजांविरुद्ध उठाव केला (हा महाराष्ट्रातील पहिला उठाव). पुढे त्रिंबकजी साताऱ्याकडील शंभू महादेवाच्या डोंगररांगांत येऊन तेथे फौजेची जमवाजमव करू लागले.
इकडे इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टन बाजीरावाकडे त्रिंबकजीला पकडण्यासाठी दबाव आणू लागला. बाजीरावाने त्रिंबकजीसाठी सिंहगड,रायगड व पुरंदर किल्ले इंग्रजांकडे ठेवले तसेच त्रिंबकजीला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. कोणीही पुढे येऊन त्रिंबकजी विषयी माहिती दिली नाही. पेशवे अप्रत्यक्ष त्रिंबकजीला या कार्यासाठी मदतच करत होते. पुण्याजवळील फुलगाव येथे त्रिंबकजीने दुसऱ्या बाजीरावाची गुप्त रूपाने भेट घेतल्याचेही म्हटले जाते.
1817 च्या उत्तरार्धात दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध आरंभिले. खडकीच्या लढाईनंतर पेशवे ब्राह्मणवाड्यास असता त्रिंबकजी उघडउघड पेशव्यांना फौजेनिशी मिळाला. कोरेगाव भीमा च्या युद्धात त्रिंबकजी प्रत्यक्ष सहभागी झाले. बापू गोखले व त्रिंबकजी डेंगळे यांनी लढाईत पराक्रम गाजवला. पुढे पंढरपूर जवळील आष्टीच्या युद्धात (20 फेब्रुवारी 1818) सेनापती बापू गोखले मारले गेले. पेशव्यांची हार झाली. पुढे पेशवे वऱ्हाडात नागपूरकर भोसल्यांच्या प्रांतात गेले. पेशव्यांबरोबरच्या अनेक सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. शेवटपर्यंत त्रिंबकजी पेशव्यांबरोबर होते. अखेर 3 जून 1818 ला अशीरगडाजवळील 'धुळकोट' येथे श्रीमंत दुसरे बाजीराव जनरल माल्कमच्या स्वाधीन झाले व मराठेशाहीचा अस्त झाला. त्यानंतर त्रिंबकजी पसार झाले. इंग्रज सरकारने त्यांना शोधण्यासाठी त्यांच्यावर इनाम लावले.
त्रिंबकजी हा त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता. निफाड जि. नाशिक) येथे राहत असल्याची खबर जयाजी पाटील याने 28 जून 1818 ला मालेगावला दिली त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता. त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजीला पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील फौजेने त्रिंबकजीला कैद केले. काही काळानंतर त्याची रवानगी वाराणसी जवळच्या चुनारच्या किल्ल्यात करण्यात आली. 1818 ते 1829 अशी अकरा वर्षे चुनारला कैदेत असणाऱ्या त्रिंबकजीचा अखेर 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारला दुर्दैवी मृत्यू झाला.
कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्रिंबकजीने स्वकर्तृत्वावर पेशवाईत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ज्या काळात फितुरीची बीजे मुलुखभर रोवली गेली होती,अनेक मराठे सरदार इंग्रजांशी सुरुवातीपासूनच संधान ठेवून होते त्याकाळात त्रिंबकजी मराठेशाहीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न बघत होते. इंग्रजांच्या कच्छपी लागून स्वतःची जहागीर वाचवणं त्रिंबकजीला अशक्यप्राय बिलकुल नव्हतं. या सामान्य माणसाने भारतभर फोफावत जाणाऱ्या इंग्रज सत्तेला काही काळ स्वतःच्या बळावर आव्हान दिलं परंतु त्याला सर्वस्वी अपयश आलं. आयुष्याच्या उत्तरार्धात चुनारच्या किल्ल्यावर त्रिंबकजी अत्यंत हलाखीचे जीवन कंठत होता.
त्रिंबकजीचे त्याच्या गावावर अत्यंत प्रेम होते.याबद्दल एल्फिन्स्टन त्याच्या रोजनिशीत म्हणतो की, 'त्याच्या भरभराटीच्या काळातही तो त्याच्या गावाला विसरला नाही'. अनेक इतिहासतज्ञ त्रिंबकजीला 'मराठेशाहीचा शेवटचा आधारस्तंभ' म्हणतात. नाना फडणीसानंतर इंग्रजांना त्रिंबकजीचा धाक असल्यामुळे अनेक इतिहासतज्ज्ञ त्यास 'सवाई नाना' संबोधतात. न.चिं.केळकर आपल्या 'मराठे व इंग्रज' या पुस्तकात त्रिंबकजीविषयी लिहितात,
'बाजीरावास पुष्कळ कुटिल मंत्री होते पण त्या सर्वांत त्रिंबकजी डेंगळे हा श्रेष्ठ होता. वास्तविक त्रिंबकजी हा अत्यंत शूर, धाडसी, हजरजबाबी, कल्पक व कर्ता असा पुरुष होता. पेशवाईच्या गादीची इतकी हलाखी झाली हे त्याला पाहावत नसे; या सर्वाला कारण इंग्रज हे त्यांच्या मनाने घेतले होते. इंग्रजांच्या वैराचा स्पर्श त्याला लागला नसता किंवा नाना फडणीसासारख्या मुत्सद्याच्या पदरी तो असता तर इतिहासात त्याचे मोठे नाव झाले असते.'
लेखन- ©सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
1. 'History of mahrattas'- James grant Duff
2. 'Bajirao II and the East India Company'- Pratul Chandra Gupta
3. 'John briggs in Maharashtra'- Arvind Deshpande
4. 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने'-राजवाडे (खंड 4)
5. 'मराठे व इंग्रज'- न.चिं.केळकर
6. 'महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढे'- वि.गो.खोबरेकर
छायाचित्रे-
१. सरदार त्रिंबकजी डेंगळे
२. सरदार त्रिंबकजी डेंगळे वाडा (निमगावजाळी, ता.संगमनेर, जि. अहमदनगर)
३. चुनारगड (जि. मिर्झापुर, उत्तरप्रदेश)
No comments:
Post a Comment