मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र आजम शहा ने स्वतःला दिल्लीचा बादशहा म्हणून जाहीर केले व आपला दक्षिणेतील मुक्काम हलवून उत्तरेकडे सैन्यासह कुच केले. त्याच्या बरोबर शाहू राजांसह राज परिवार ही उत्तरेकडे घेऊन चालले असता भोपाळ जवळ शाहू महाराजांनी आजम शहा समोर तहाचे बोलणे केले व त्यास दक्षिणेत महाराष्ट्रात परत जाण्यासाठी विचारणा केली.
आजम शहा चा वकील झुल्फिकारखान याच्या राजकारणा नुसार शाहूंना सोडलं तर शाहू आणि ताराराणी आपापसात राजगादी साठी भांडतील आणि महाराष्ट्र मध्ये आपल्याला लक्ष द्यायची गरज लागणार नाही.आजमशाह ने मान्य केलं काही अटींवर शाहू महाराज व त्यांच्याबरोबर काही सेवकांची बंदीवासातून मुक्तता करून महाराष्ट्रात जाण्यास त्यांना परवानगी दिली मात्र त्यांनी महाराष्ट्रात गेल्यावर बंडखोरी करू नये म्हणून महाराणी येसूबाई सह इतर राज परिवारास त्याच्यासोबत उत्तरेला घेऊन गेला. शिवाय शाहू राजांना गाईच्या शेपटाची शपथ घेऊन मुघलांच्या विरोधात शस्त्र उचलणार नाही म्हणून शपथ घ्यायला लावली.शाहू महाराजांची मुक्तता झाल्यानंतर त्यांच्याबरोबर सेवक म्हणून जोत्याजी केसरकर व मानाजी गायकवाड होते ते महाराष्ट्रात अहमदनगर येथे आले.तेथून त्यांनी काही मराठा सरदारांना निरोप पाठवून बोलावून घेतले तसेच महाराणी ताराबाई निरोप पाठवून कळवले की गादीचा खरा वारस महाराष्ट्रात परत येत असून त्यांनी मराठी राज्याची मागणी केली आहे.
ताराराणी यांनी त्यांचा योग्य तो मानसन्मान राखण्याचे आश्वासनही दिले परंतु परत येण्यास विरोध दर्शवला. त्यांच्या छत्रपतींच्या गादीवरील हक्काला स्पष्टपणे नकार दिला किंबहुना त्यांनी स्वतः शाहू राजे नसून तोतया असल्याची आवई उठवली व मराठा सरदारांना आपल्या पक्षात येण्याची आज्ञा केली. त्याचप्रमाणे शाहू महाराज खरोखरच आहेत की नाही याची खातर जमा करण्यासाठी ज्यांनी शाहू राजांना मोगलांच्या कैदेत पाहिले होते अशा दोन विश्वासू सेवकांना त्यांच्याकडे पाठवून ते खरेच शाहू राजे असल्याची खात्री करून घेतली.ताराराणींनी खंडो बल्लाळ व परसोजी आणि बापूजी भोसले यांना शाहूंची खातरजमा करून घेण्यास पाठवले होते मात्र तशी खात्री झाल्यानंतर त्यांना विरोध करून परतवण्यासाठी सेनापती धनाजी जाधव व परशुराम पंतप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले.परसोजी भोसले यांनी शाहूंच्या बरोबर एका ताटात जेवण करून शाहू राजे खरं असल्याचं पटवून दिलं होत.ताराराणी नी विरोध करत सैन्य पाठवलं,पुण्याजवळ भीमा तीरावर उभय सैन्याची खेड येथे लढाई झाली त्यामध्ये ताराराणीच्या सेनेचा पराभव झाला.
त्या ठिकाणी सेनापती धनाजी जाधव ताराबाईंचा पक्ष सोडून शाहू महाराजांच्या पक्षात जाऊन मिळाले त्यामुळे शाहू राजांची ताकद वाढली त्यांच्या सैनिकांनी प्रतिनिधींच्या सैन्याचा पाठलाग करून डिसेंबर 1707 मध्ये सातारचा किल्ला काबीज केला.शाहू महाराज स्वराज्यात परत आले तेव्हा त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन परसोजी भोसले, कान्होजी भोसले,मानसिंगराव मोरे,अमृतराव कदमबांदे,नेताजी शिंदे,हरिभक्त राव निंबाळकर,केशव त्रिंबक पिंगळे,हणमंते,रायाजी कृष्णाजी प्रभू बोकील, पुरंदरे हे सरदार त्यांना मिळाले त्याचप्रमाणे रुस्तुमराव जाधव,चिमणाजी दामोदर वगैरे बागलाण प्रदेशातील सरदार देशील शाहू राजांच्या बाजूने होते.
शाहू महाराजांनी त्यांच्या मदतीने स्वराज्य प्राप्ती करून घेण्याचे ठरूनच महाराणी ताराबाई यांच्याकडे राज्याची मागणी कळवली होती व त्यांचा आशीर्वाद मागितला होता,सातारच्या दिशेने येताना शाहू राजांनी तोरणा,राजगड, रोहिडा किल्ला जिंकून घेतले आणि मावळ प्रदेशात आपली हुकूमत निर्माण केली. साताऱ्याच्या नजीकच्या वाई प्रांतातील चंदन वंदन किल्ले जिंकून त्याखालिल दहिगावात मुक्काम केला व तिथुन सातारा किल्ला ताब्यात घेण्याबाबत प्रतिनिधी निरोप पाठवले परंतु प्रतिनिधीने युद्धाची तयारी केली होती.
सातारा किल्ल्याचा किल्लेदार वाईजवळच्या पसरणीचा शेख मीरा नावाचा होता. छत्रपती शाहूनी शेख मिराचे कुटुंब कबील धरून आणले व निरोप पाठवला की यांना प्रथम तोफेच्या तोंडी देतो मग युद्ध करतो त्यामुळे किल्लेदार शेखमीरा घाबरला त्याने पंतप्रतिनिधी कडून किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात दिला अशा प्रकारे मुत्सद्यगिरीच्या जोरावर शाहू राजांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली.
(उपाध्यक्ष- पुणे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद)
मार्गदर्शक- श्री. रणजित दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)
#संदर्भ-पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज (थोरले) सातारा
लेखक- गणपतराव साळुंखे

No comments:
Post a Comment