विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#छत्रपती_थोरले_शाहू_महाराज_आणि_खंड्याकुत्रा

 

मराठ्यांचे पाचवे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या विषयी आज आपण जाणून घेऊ.18 वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले शंभूपुत्र शाहू कैदेतून सुटून 1707 मध्ये महाराष्ट्रात आले.महाराष्ट्रात त्यांना अनेक सरदार येउन मिळाले.पुढं त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून सातारा ही मराठ्यांची राजधानी निर्माण केली.शाहूराजांच्या सोबत असलेले मुत्सद्दी,पराक्रमी,धाडशी आणि कर्तृत्ववान सरदार,कारभारी,सेनापती यांच्या साहाय्याने त्यांनी अखंड हिंदुस्थान वर आपली हुकूमत चालवली. पराक्रमी सरदारांच्या पराक्रमाला योग्य न्याय देत स्वतःच राज्य निर्माण करण्याची परवानगी देणारा महाराष्ट्राच्या मातीतील एकमेव king maker राजा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.होळकर,पवार,शिंदे,गायकवाड,थोरात, पांढरे,मोरे आशा अनेक सरदारांनी आपली स्वतंत्र राज्य निर्माण केली,राजसिंहासन निर्माण केली त्या साऱ्यांना शाहू राजांनी मान्यता दिली होती,अधिकार आणि सनदा दिल्या होत्या.अखंड हिंदुस्थानभर परसलेल्या मराठा सरदारांनी एकमेकाला साहाय्य करत भगव्या झेंड्याची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली.दिल्लीसह संपूर्ण भारतात मराठी सत्ता प्रस्थापित झाली.शाहू राजांच्या राजगादी चा सन्मान करत सर्व सरदारांनी भारताची भूमी स्वतंत्र करत आपल्या ताब्यात घेतली.शाहू राजांच्या कारकिर्दीत त्यांनी अतिशय योग्य प्रकारे आपल्या मुत्सद्दी,पराक्रमी आणि राजकारणी पेशवे,पंतप्रतिनिधी व इतर कारभारी मंडळींच्या मार्फत इतर सरदार व राज्यकारभारावर मजबुत पकड निर्माण करत 42 वर्ष कारभार केला.शाहू राजे हे 18 वर्ष मोगलांच्या कैदेत होते.अनेक अपमान,हाल,छळ त्यांनि सहन केला.18 वर्षाच्या या बालपण ते तरुणपणाच्या आयुष्यात त्यांनी राजकारणाचा अभ्यास केला शिवाय त्यांनी भोगलेल्या कैदेचा परिणाम म्हणून त्यांचा स्वभाव हा मृदू बनला.प्राणी,पक्षी याबद्दल त्यांना विशेष आवड होती.शाहूंनी आपले सरदार आणि त्यांची ताकद योग्य ठिकाणी वापरत आपला कारभार केला त्यामुळे त्यांच्या उर्वरित वेळेत ते प्राणी,पक्षी,देवस्थान आणि कधीकधी शिकार ह्या गोष्टीवर लक्ष ध्यायचे.
शाहू राज्यांना प्राणी,पक्षी पाळायचा छंद होता.एखाध्या सरदाराकडे जर चांगल्या जातीचे प्राणी असतील तर शाहू राजे ती आपल्याकडे असावीत असा हट्ट करत.उदाजी पवार नावाच्या सरदारला शाहू राजांसाठी चित्ता पाठवून देण्याविषयी बजाजी आटोळे यांनी विनंती केली होती तर बजाजी आटोळे यांनी शाहू राजांना एक कुत्रा भेट दिला होता.त्याच नाव खंड्या होत.(संदर्भ शाहू दप्तर अ१११३)
21सप्टेंबर 1734ला मल्हारजी होळकर यांनी शाहू राजांना चित्ता भेट दिला होता.(संदर्भ पेशवे दप्तर खंड22,लेखांक 96)
शाहू राजांची खाजगीतील राहणी साधी होती.कुत्रे,हत्ती,घोडी,पक्षी यांच्या पैदाशी,निगा आणि निर्मिती वर शाहू राजांच विशेष लक्ष होत.त्यातील खंड्या कुत्र्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं.शाहू राजे एकदा शिकारीला गेले होते.वाघावर निशाणा धरला होता बार सुटला पण दुर्दैवाने नेम चुकला आणि वाघ समोरून शाहू राजांवर चालून आला.प्रसंगी खंड्या कुत्राने वाघाच्या मागच्या बाजूने हल्ला करून वाघाचं लक्ष विचलित केलं आणि शाहू राजांनी वेळ साधत दुसरा बार काढून वाघाची शिकार केली.त्यामुळे शाहू राजांच खंड्या वर विशेष प्रेम होतं.एकदा मोगल सरदार इंद्रोजी कदम हे शाहूंना भेटण्यासाठी येणार होते. रहिमतपूर तालुक्यात असलेल्या सुपा गावचे हे प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्ती होते.त्यांनी आपल्या खाजगीत घोड्यांना चांदीच्या नाल बसवल्या होत्या.ते जेव्हा शाहू राजांना भेटायला आले तेव्हा आपली संपत्ती दाखवण्यासाठी त्यांनी घोड्यांना हत्तींना सुवर्ण अलंकार घालून सजवलं होत.शिवाय नौबती बंद केल्या तर हात तोडीनं म्हणून दम नागरखान्यातील नौबत वाजवणाऱ्यांना दिला होता.या सरदारांच्या गर्व हरणासाठी शाहू राजांनी खंड्या ला दागिने घालून राजगादी वर बसवलं होत.असा उल्लेख चिटणीस बखरीत सापडतो.तर एकदा निंबाळकर खर्डेकर सरदार शाहूंना भेटायला आले तेव्हा त्यांच्या हुजऱ्याने (हुजऱ्या म्हणजे शाही नोकर) शाहूंना पागोटे घालायला सांगितले.तर शाहूंनी सांगितलं की खर्डेकर मला भेटायला येणार की पागोट्याला अस म्हणत ते पागोटे खंड्या ला घातलं होत.
या खंड्या कुत्र्याला एक सेवकाने दगड मारला होता.कुठंही कशातही हा खंड्या तोंड घालायचा म्हणून त्याने दगड मारला.शाहूंनी त्या सेवकाला विचारलं तेव्हा तो सेवक म्हणला की खंड्या सरकारचा कुत्रा तसा मी सुद्धा सरकारचा कुत्रा, दोन कुत्रे आपापसात भांडले त्यात गैर काय. शाहूंनी या उत्तराने खुष होऊन त्या सेवकाला बक्षीस दिल होत.(संदर्भ शेडगावकर भोसले बखर) शाहू राजांनी खंड्या कुत्र्याला पालखीचा मान आणि महिना पाच हजारांचा खर्च मंजूर करून काही सेवक त्याच्या साठी नेमले होते.शाहू राजांच्या दरबारात एका सारदारासारखा मान खंड्या कुत्र्याला होता.शाहू राजांच विशेष प्रेम असलेला हा कुत्रा समजदार आणि उत्तम शिकारी होता. हा कुत्रा मरण पावला तेव्हा शाहू राजांनी त्याचा सारखा हुबेहुक दगडी कुत्रा बनवून त्याची समाधी संगम माहुलीच्या घाटावर बनवली असा उल्लेख चिटणीस बखरीत आढळतो तर शाहू राजे यांच्या निधनानंतर खंड्या कुत्र्याने आपल डोकं दगडावर आपटून प्राण सोडल्याचे पेशवे दप्तर खंड 42 मध्ये संदर्भ सापडतात.मराठी विश्वकोश मध्ये तर शाहू राजांच्या चितेत उडी मारून खंड्या कुत्र्याने जीव दिल्याचं आढळून येत.शाहू राजांचा हा खंड्या कुत्रा खूप प्रसिद्ध होता.एकदा एका सावकाराने घर बांधण्यासाठी खंड्या कुत्राच्या समाधीचा पडलेला दगड गेला होता.त्याच्या घराचं बांधकाम सारख पडायचं शेवटी त्याने खंड्या कुत्राच्या समाधीवरील दगड पुन्हा जसा होता तसा लावला आणि नंतर त्याच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं अशी कथा शेडगावकर भोसले यांच्या बखरीत आढळून येते.तर सातारा शहरात खंड्या नवसाला पावतो अस सुद्धा म्हणलं जायचं. शाहू राजांकडे 40 हुन अधिक शिकारी कुत्री होती.(संदर्भ शाहू दप्तर,सरंजामी मरहट्टे)
शाहू राजांचा खंड्या नावाचा एकच कुत्रा होता की अजून काही कुत्रांची नाव खंड्या असावीत असा प्रश्न पडतो.शाहू राजांचा आयुष्य आशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे त्याचा आपण जसा जमेल तसा आणि संदर्भ सापडतील तसा आढावा घेत राहू.
तळटीप: (वरील लेख हा फक्त शाहू राजे व त्यांच्या कुत्राविषयी आहे विनाकारण इतिहास्यकारांनी नको ते विषय कंमेंट मध्ये मांडून आपला व लेखकाचा वेळ वाया घालवू नये,संदर्भ तपासून लिहिलेलं आहे काही शंका किंवा नवीन माहिती असेल तर 8275694144 नंबर वर संपर्क करा)

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...