विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#थोरले_शाहूराजे आणि #उदोजी_चव्हाण

 

हा इतिहास आहे एका महान राजाचा जो १९ वर्ष शत्रूच्या कैदेत होता तरी सुद्धा पूर्वजांच्या पराक्रमाचा,शौर्याचा,धैयाचा,प्रेमाचा, माणुसकी आणि वैचारिक वारसा टिकवत त्याने संपूर्ण हिंदुस्थानभर आपली हुकुमत गाजवली तब्बल ४२ वर्ष त्याने कारभार केला अशा धोरणी,हुशार,चाणाक्ष आणि विचारांच्या पलीकडचा महान राजा मराठ्यांचा चौथा छत्रपती शंभूपुत्र #थोरले_शाहू_महाराज.
शाहू राजांना शिकारीचा छंद होता.मोकळ्या वेळेत ते शिकार खेळायचे पण त्यांच्या शिकारीचे पण नियम होते.लहान प्राण्याची शिकार ते करत नसत.सशे,हरीण,या प्राण्यांवर शाहू राजांच विशेष प्रेम होतं.शिकार करायची ती माजलेल्या कोल्ह्या,लांडग्यांची किंवा वाघाची.शिकारीला जाताना शाहू राजांच्या सोबत आज 400-500शिपाई होते.त्यात काही सरदार होते.शिकारीचा खेळ रंगात आला होता.हाकारे सावज हुसकून आणत होते.काही सैन्य राजांच्या रक्षणासाठी जवळ उभे होते तर काहींनी शिकारी साठी आपली हत्यात तयार ठेवली होती.भर दुपारची ती वेळ ऊन वाढत चालल होत पण अजून सावज सापडत न्हवत.हाकारे जिवाच्या आकांताने ओरडत होते,हकाट्या पिटत होते पण सावज टप्प्यात येत न्हवत.राजांनी जरा वेळ थांबायची आज्ञा दिली.सगळी मंडळी एक भल्या मोठ्या झाडाखाली जमा झाली.पखालजी ची थैली तहानलेल्या सैन्यांनी मोकळी केली.पखालजी पुन्हा पाणी आणायला गेले.सगळी मंडळी आणि राजे विश्रांती घेत होते.वाढलेल्या उन्हाने,सावज हुसकताना दमछाक झाली होती.राजे एक उंच्चवट्या वर बसले होते.बाकीचे खाली बसले होते.
"राज,आज शिकार सापडलं अस काय वाटत नाही."
शाहू राजे स्मित हसले आणि म्हणाले
"सावज सापडले पाहिजे असं काही नाही,आज नाही पुन्हा कधीतरी येऊ आणि हे लांडगे मारूनच टाकू,लय उच्छाद मांडलाय त्यांनी".
"राज हे रानातल लांडग आपण कधी पण मारू पण आपल्या राज्यात उच्छाद माजवणारा एक जण या जंगलात शिकारीला आलाय,कुमक पण त्याच्या कड कमी हाय,करायची का शिकार".
पाणी आणायला गेलेला पखालजी पात्रात पाणी ओतत असताना छाती फुगवून बोलत होता.
"कोण,कोण आलंय म्हणला शिकारीला."
राजांनी उत्सुकतेने विचारले.
"कुणीका असेना राजे,आपल्या राज्यात धुमाकूळ घालणारा असा हातात येत असताना सोडायच नाही"
एक सरदार तलवार उपसत जोशात म्हणाला तस 500 गडी शिकार विसरून तलवारी काढून युद्धाला सज्ज झालं.
शाहू राजांनी सर्वांना शांत केलं.शाहू राजांनी पखालजीला विचारलं तर त्यांनी सांगितलं की कोल्हापूर च्या संभाजी राजांचा मुख्य #उदोजी_चव्हाण शिकारीला आल्यात.त्यांच्याकडे सैन्य पण कमी आहे.
"राज, त्या उदाजीला सोडायचं नाही,आज इथून शिकार करूनच जायची,
आपल्या शिरोळ,रायबाग आणि वारणेच्या बाजूला आपल्या प्रांतात येऊन हा दंगा करतो,पुंडाळी करतो याला आता सोडायच नाही,आयता कचाट्यात सापडलाय"
सरदाराच्या हृदयाचे ठोके वाढले,मुठी आवळल्या गेल्या.शौर्य उफाळून येत होतं.पण
शाहूराजांच्या चेहऱ्यावरील शांत भावना पाहून तो ही शांत झाला.शाहू राजांनी सगळ्यांना खाली बसायला सांगितले.शाहू राजे सांगू लागले.
"आज उदोजी आपल्याला एकटा सापडलाय,आपण त्याला सहज मारू शकतो असं तुम्हाला वाटतं पण हे आपल्या क्षत्रिय धर्माच्या विरोधात आहे.
"शत्रू मारायचा तो रणात लढताना,असा बेसावध कधीच नाही".
"पण राजे उदोजी चव्हाण सारखा बंडखोर आपल्याला घातक आहे.त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर......"
एक सरदार काळजीनं बोलला.
"तस होणार नाही,उदोजी चव्हाण हे काही आपले शत्रू नाही,या उदाजीचे आजोबा राणोजी मालोजी घोरपडे यांच्या तालमीत मोठा झाला,मोठा पराक्रमी शिलेदार होता.उदोजींच्या वडिलांनी तर संताजीराव घोरपडे सोबत औरंगजेबाच्या गुलालबारीचे तंबु तोडून आणले होते."
"कैदेत असतांना आईसाहेब सांगायच्या विठोजी चव्हाण म्हणजे आमच्या वडिलांचे संभाजी राजांच्या खास मित्र होते.आमच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा म्हणजे आमच्या भावासारखा.भले आज रोजी ते आपल्या मुलखात बंड करत असतील पण स्वराज्य रक्षणार्थ त्याच्या पूर्वजांनी केलेल कार्य ही लक्षात घेतलं पाहिजे."
"त्यांनी आमच्यावर कधी हल्ला केला नाही किंवा आम्ही त्यांच्या बद्धल कधी असा विचार केला नाही तेव्हा अस अचानक त्यांच्यावर हल्ला करणं मला पटत नाही या उलट त्यांच्या कडे स्वार पाठवा शिकारीच आमंत्रण द्या,सांगा मिळुन शिकार खेळू."
शाहू राजांनी आपली मुद्रा असलेला निमंत्रणाच्या कागद उदोजींकडे पाठवला त्यांना एक अंगठी भेट पाठवली.खरं तर शाहू राजांनी मनात आणलं असत तर उदोजी अवघ्या 10
स्वार सोबत घेऊन शिकारीला आले होते.शाहू राजांकडे 500 मावळे होते.आंबेरीच्या त्या कुरणात उदोजींच्या अंत करणे सहज सोपं होतं.पण शाहू राजे हे आपल्या सर्व सामान्यांच्या विचारांच्या पलीकडले होते.शाहू राजांनी उदोजींना आमंत्रण दिले,200 स्वार पाठवून मोठ्या मानाने वस्त्रपोशाख,विडे देऊन उदोजींचा सत्कार केला.त्यांच्या सोबत शिकारही खेळले आणि मानाने त्यांची पाठवणी सुद्धा केली. खरतर शाहू राजे म्हणजे एक महान राज्यकर्ता होता.छत्रपती शिवाजी राजांनी जशी माणस प्रेमाने जवळ केली तशी शाहू राजांनी सुद्धा. शाहू राजांच्या आयुष्यात अनेक अशे प्रसंग आले ज्यात त्यांचा साधेपणा,सरळ वागणूक दिसून आली.शाहू राजांच्या विरोधात अनेक बंद झाली,पुंडाळी माजली. शाहू राजे मुघलांकडून सुटून आल्यावर त्यांनी आपलं राज्य निर्माण केलं पण कोल्हापूर च्या संभाजी राजांच्या काही सरदार मंडळींनी शाहूंना खूप त्रास दिला.हे सरदार शाहूंच्या प्रांतात यायचे लूटमार करायचे त्यामुळे रयत त्रासली जायची.शाहूंनी बऱ्याच जणांना बंदोबस्त केला होता.त्यात खटावकर,दमाजी थोरात,उदोजी चव्हाण अशी बरीच मोठी यादी आहे.
शाहू राजे आधी शत्रूचा अभ्यास करायचे आणि त्याचा तोड देईल आशा लोकांना त्याच्यावर पाठवायचे.या शिकारीच्या प्रसंगी शाहू राजांनी उदोजींना आपल्या पक्षात घ्यायचा प्रयत्न केला पण ते शेवट पर्यंत कोल्हापूर गादीशी इमानी राहून शाहू राजांच्या विरोधात बंड करतच राहिले.चिमाजी अप्पा आणि बाजीराव यांनी सुद्धा उदोजी ला शांत करण्याचा प्रयत्न केला होता.जेव्हा कोल्हापूर आणि सातारा गादी एक झाली तेव्हा उदोजी मुघलांना जाऊन मिळाले.तेव्हा शाहू राजांनी त्यांना परत आणायला प्रतिनिधी ला पाठवले होते. (संदर्भ राजवाडे खंड 2 पान न.77).
त्या पूर्वी कोल्हापूर च्या संभाजी राजासोबत असताना 1732 च्या सुमाराला यशवंत पोतनीस याला शाहू राजांनी उदोजींच्या बंदोबस्ताला पाठवलं होत त्यांनी मोठा दंड वसूल करून उदोजीला सोडलं होत.(संदर्भ-राजवाडे खंड 2 पान 69)
उदोजी बरेच दिवस मोघलांच्या बाजूने स्वराज्यात येऊन दंगा करायचा शेवटी शाहू राजांनी1748 ला त्रिंबक सोमवंशी याला आज्ञा केली की खूप वेळा सांगून जर उदोजी ऐकत नाही तर त्यांच्या निःपात करावा.म्हणणे मारावे.(संदर्भ राजवाडे खंड 6 पान 187)
पण उदोजी सापडला नाही तेव्हा मात्र नाना पेशव्यांनी 1751 ला मोठ्या युक्तीने उदोजी ला मोगलाईतून आणलं आणि डीग्रज ला सरंजाम देऊन ठेवलं.पण उदोजी तरी शांत बसले नाही त्यांनी नाना पेशव्यांवर सुद्धा स्वार्या केल्याचे उल्लेख आहेत.शेवटी मिरज प्रांतात एका गावावर उदोजींच्या स्वारी केली होती.त्या धुमश्चक्रीत त्याच्या घोडीला गोळी लागून घोडी उधळली आणि रिकीबीत पाय अडकून उदोजींच्या डोक्याला मार लागला त्यात त्याचा मृत्यू झाला.
मराठा साम्राज्याचा उदोजी हा मोठा सरदार मोठा.शाहू राजांच्या विरोधात उदोजी सारख्या अनेकांनी बंड केलं होतं पण शाहू राजांनी त्यांच्या पूर्वजांनी सांडवलेल्या रक्ताचा सन्मान करत कधीच त्यांचा शेवट वाईटाचा विचार केला न्हवता.पण अनेकदा सांगून,समजावून न ऐकणाऱ्याच्या गावावरून गाढवाचा नांगर फिरवायला सुद्धा कमी पडले न्हवते.असाच होता आमचा शाहू राजा.श्रीवर्धिष्णोविक्रमे विष्णुसा मूर्तीरीव वामनी,शंभूसुतोरिव मुद्रा शिवराजस्य राजते.या त्यांच्या राजमुद्रेला शोभणारा.
(संदर्भ-राजवाडे खंड 6,मल्हार रामराव चिटणीसाची बखर,शेडगावकर भोसले बखर)

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...