। गावगाड्यातील देशमुखांचे काम व त्यांचे मानपान व हक्क मिळकत. रयत पोसणारा व सरकार यांना जोडणारा मुळ कना. ।।
देशमुख यांचा संदर्भ अगदी मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या अगोदर पासुन आढळतो. हा देशमुख म्हणजे परगण्यातील अनेक गावांचा वतनदार. सर्वात उच्च दर्जाचे हे वतन होते. शिवकाळात जर बारा मावळच्या देशमुखांच्या इतिहासाकडे वळाले तर हे देशमुख एवढे झोंड व निडर होते कि आदिलशाहास वेळ प्रसंगी जुमानत नसत. आपल्या वतनात ते स्वतंत्र राजे असल्या सारखा कारभार करीत. आदिलशाहास मोहिमेवेळी सैन्य स्वरुपात व रसद असी दोन्ही स्वरुपात मदत करत असे. यांच्या वादात पडण्यास अदिलशाहा हि धजावत नसे. हे देशमुख अतिशय चिवट तर होतेच शिवाजी महाराजांची ज्या वेळेस १६४४ च्या सुमारास बारा मावळ ची घडी घालाय घेतली तेव्हा अगोदर हे सर्व देशमुख एकत्र केले. त्यांच्या सोबत मिळून राजकारणाचे पुढचे डाव आखले. अस्याच या मातब्बर देशमुखांची कामे, मानपान व त्यांचा हक्क यावर अधिक जाणून घेणार आहोत.
देशमुख व देशपांडे यांचा जो शेतसाऱ्यावरील हक्क होता त्यास ‘रूसूम’ म्हणत. पाटील− कुलकर्ण्यांप्रमाणेच परागण्याच्या पंचायतीत त्यांना हक्कबाबी असत. तंटे, मजहर, न्याय निवाडे यांच्यात देशमुखाची भुमिका अग्रस्थानी मानली जाई. सोबत पाटिल ही तेवढाच महत्त्वाचा अधिकारी म्हणून असे. देशमुखास पाटलाप्रमाणेच तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल वगैरे वस्तू बलुत्याप्रमाणेच त्यांनाही अधिक प्रमाणात मिळत असत. परागण्याच्या जमाबंदीचे सर्व दप्तर देशपांड्यांच्या ताब्यात असे. त्यांच्या हाताखाली ‘मोहरीर’ नावाचा एक कारकून हे काम पाही. निरनिराळ्या वहिवाटदारांचे, वतनदारीचे हक्क व जमिनीची प्रतवारी, तिचे वर्णन इ. बारीकसारीक बाबींची नोंद या हिशोबात केलेली असे. देशपांडे विविध गावांच्या कुलकर्ण्यांनी पाठविलेले सर्व हिशोब संकलित करून सर्व परगण्यांचा ताळेबंद तयार करीत असे. कोकणात व कर्नाटकात हे काम देसाई हे वतनदार करीत. कोकणातील प्रभुपणाचा हुद्दाही देसायांच्याच जोडीचा असे. काही वेळा प्रभुदेसाई असा वतन-हुद्याचा उच्चार करीत. देशपांडे-देसाई हे देशमुखाच्या हाताखालील वतनदार. देशमुखाचे पाटलाप्रमाणेच कामकाज किफायतशीर होते. पण देशमुखाची वा पाटलाची देशमुखी, पाटिलकी जप्त करण्याचा अधिकार राजाचा असे. १६५९ ला अफजलखानास मदत केल्या प्रकरणी मसूर च्या सुलतानजी जगदाळे देशमुख याची देशमुखी जप्त करुन त्याचा वसंतगडावर शिरच्छेद शिवाजी महाराजांची जाने. १६६० ला केला होता. पुढे सुलतानजी जगदाळे देशमुखाची बायको आपल्या लहाण मुलास घेऊन राजगडावर देशमुखीचे वतन मागाय आली होती, पण शिवाजी महाराजांनी ते अमानत केले. पण तिच्या मुलाच्या संगोपनाची तरतुद केली. पुढे मसूर सह काही गावांची पाटिलकी तिच्या मुलाच्या नावावर होती. देशमुख व पाटिल यांच्यात फरक म्हणजे पाटिलकीच्या वतनापेक्षा देशमुखांचे वतन मोठे होते. देशमुखांच्या कामाचा व अधिकाराचा आवाका ही मोठा होता. शिवकाळात जी महसुल व्यवस्था होती तीच अगदि थोरले छत्रपती शाहु महाराज पहिला बाजीराव पेशवा यांच्या काळा पर्यंत होती. पण दुसर्या बाजीराव पेशवे यांच्या काळात रघुनाथराव याने शिवाजी महाराजांनी सुरु केलेली महसूल पद्धत बंद करुन मुस्लिम महसूल पद्धत चालु केली असी नोंद साधनात आढळते. त्या नंतर देशमुखांच्या कामात हक्कावर थोडेफार बदल झाले. पण शिवकाळात व उत्तर काळात देशमुख म्हणजे रयतेच पालन करणारा म्हणूनच ओळखले जात. शिवाजी महाराजांनी तसी व्यवस्थाच लावली होती. ज्या वेळेस परगण्यात शत्रुचे आक्रमक होण्याची चिन्ह असत अस्या वेळेस देशमुखांना गावेच्या गावे खाली करुन त्याना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी असे. गावातील रयतेस तोशिश लागु नये याची काळजी पुरेपूर घेतली जात असे. देशमुखांना मिळणाऱ्या फायद्या बद्दल एल्फिन्स्टन लिहतो की- साधारण पणे मला असे सांगण्यात आले कि साऱ्याच्या ५% नव्हे तर उदा. जमिनीवरील शेकडा ५ एकर जमीन देशमुखांच्या मालकीची असे. आणि एकुण जमा झालेल्या रकमेतील विसावा हिस्सा विवाय वस्तु रुपाने मिळणारा लाभ इत्यादी फायदे देशमुखाचे असत. पण वि.का. राजवाडे यांनी प्रकाशित केलेल्या एका कागदात एल्फिन्स्टन चे मत खोडून काढले आहे. देशमुख हे २% महसूल घेत असत असे त्या कागदातून दिसुन येते. देशमुखांना मिळणारे हक्क व मानपान यांचा जरी ठोकळ मानेने विचार केला तरी ते खालील प्रमाणे असेल.
१) दरसदे रु. ३ द्यावयाचा शिरस्ता आहे, त्यापैकी देशपांडे १ रु. घेतील, बाकी दोन देशमुखांनी घेत जावे. २)सिरपाव सरकारातून अगोदर देशमुखांनी घ्यावा, मागाहून देशपांडे घेतील. ३) वतनी कागदावर वगैरे दस्तकत देशमुख आपले नावे करावे. देशमुखाचे बाजूस देशपांडिये दस्तकत करितील. ४) भेट देशमुख अगोदर हकीमापुढे ठेऊन (सरकारी अधिकाऱ्यापुढे) मागाहून देशपांडे याणी ठेवावी. ५) विडा सरकारचा वगैरे अगोदर देशमुख घेतील मागाहून देशपांडे याणी घ्यावा. ६) वरकड हरएक मानपान वतनसंबंधे अगोदर देशमुखांचा मागाहून देशपांडे यानी घेत जावे. ७) देशमुखीचे वतनाबाबत वाडा कसबे मजकुरी आहे तेथे इमारत बांधून नांदावे, ८) कसबे मजकूरी वगैरे हर एक गावी बाजार भरेल तेथे शेवसबजी देशमुखांनी घेत जावी. ९) इनाम जमीन जिराईत, बागाईत पूर्वीची आहे. ते देशमुखानी अनुभवीत जावी. १०) सणाची मोळी माहाराकडून दर गावास घ्यावी. ११) संक्रांतीचे तीळ व पित्राचे तूप दरगावास घेत जावे. १२) भेटी दर गावास दोन देशमुखानी व देशमुखा कडील गुमास्ता मजकूरचे कामकाजास ठेवाल त्याणी घेत जावी. १३) धनगराचे माग ज्या गावी असेल त्या गावी दरसाल चवाळे घेत जावे. १४) चांभाराकडील जोडा दर गावास दरसाल एक घेत जावा. १५) कसबे मजकूरी सायरान अवांतर, उरले सुरले हक्क, आहे तो घेत जावा. १६) शावल दावर पिदर याचे मुजावरा पासून (झाडुवले) दरसाल तबरुका बाबत रु. तीन घ्यावयाचा शिरस्ता आहे. त्यापैकी देशपांडे यांचा रु. १ बाकी दोन देशमुखानी घेत जावे. १७) भाकरी बाबत ऐवज गावगन्ना येईल तो निमे देशपांडे यास देऊन बाकी निमे तुम्ही घेत जावे. १८) कलावंत थेर भोरीप वगैरे यास त्याग (बक्षीस) अगोदर देशमुखानी मागाहून देशपांडे याणी द्यावा. १९) अवांतर हर एक कामकाजामुळे प्राप्त होईल ते तिसरा हिस्सा देशपांडे यास देऊन दोन देशमुखानी घेत जावे. २०) परगणे संबंध सरकारचे देणे वगैरे पडेल ते तिसरा हिस्सा देशपांडे व दोन हिस्से देशमुख देत जावे. येने प्रमाणे देशमुखाचे हक्क व लाजीमे होते.
संदर्भ:-
¤ शककर्ते शिवराय खंड १- शिवकथाकार विजय देशमुख,
¤ मराठ्यांचा इतिहास खंड पहिला,
¤ Administrative System of Maratha- डाॅ. सुरेंद्रनाथ सेन,
मराठी अनुवाद-
¤ मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था- सदाशिव शिवदे,
No comments:
Post a Comment