भाग २
कान्होजी भोसले
परसोजीनंतर त्याचा मुलगा कान्होजी यास शाहूने सेनासाहेबसुभा हा किताब व गोंडवन-वऱ्हाडची चौथाई – सरदेशमुखी जमा करण्याचे सर्व अधिकार दिले. त्याने भाम हे आपले राहण्याचे प्रमुख ठिकाण केले. कान्होजीने निजामाविरुद्ध बाळापूरच्या लढाईत पहिल्या बाजीरावास मदत केली; परंतु तीत मराठ्यांचा पराभव झाला (१७२०). पुढे मुबारिजखान – निजाम लढाईत कोणासही मदत न करण्याची सूचना देऊन शाहूने त्या लढाईवर कान्होजीस धाडले (१७२४). कान्होजीला माळव्याचा प्रदेश हवा होता; पण पहिल्या बाजीरावाने त्यास जरब देऊन दूर ठेवले. सुमारे १८ वर्षे त्याने वऱ्हाडचा कारभार चोख ठेऊन शाहूजी मर्जी संपादिली; पण पुढे कान्होजी चौथाई-सरदेशमुखी मध्यवर्ती खजिन्यात वेळेवर भरेना व शाहूशी उद्दामपणे वागू लागला. त्याच्या पुतण्याचे - पहिला रघूजी (कार. १७३१-५५) – व कान्होजी यांत वैमनस्य निर्माण झाले. तेव्हा कान्होजी निजामाकडे आश्रयास गेला (१७२८); पण निजामाने त्यास आश्रय दिला नाही. शाहूनेही त्याचे सेनासाहेबसुभा हे पद रद्द केले आणि रघूजीस देऊर गाव (विद्यमान कोरगाव तालुका) इनाम देऊन त्याच्यावर पाठविले (१७२८). यामुळे भोसल्यांना पुढे देऊरकर भोसले हे नाव प्राप्त झाले. शाहूने याशिवाय रघूजीस सेनासाहेबसुभा हे पद व वऱ्हाड आणि गोंडवन येथील चौथाई-सरदेशमुखीचे अधिकार दिले. याबद्दल रघूजीने दहा हजार फौजेसह शाहूची नोकरी करावी व शाहूस सालिना दहा लाख रुपये द्यावे, असे ठरले. रघूजीने कान्होजीचा पराभव केला.
No comments:
Post a Comment