हल्ली गडकिल्ल्यांवर जाणार्यांची संख्या विपुल आहे. वैयक्तिक ट्रेक, कमर्शियल ट्रेकींग ग्रुप, सोलो ट्रेक अशा एक ना अनेक मार्गानी लोकं गडकिल्ल्यांवर जात आहेत, गडांना भरभरून भेटी देत आहेत ही निश्चितच आनंदाची बाब आहे. बर्याचदा गडकिल्ल्यांवर जाणारी बरीच मंडळी या किल्ल्याला मी इतक्यांदा भेट दिली, त्या किल्ल्याला मी यावाटेने गेलो असं मोठ्या अभिमानाने सांगतात. पण अनेकदा सबंधित किल्ल्याचा इतिहास न जाणता एखादा किल्ला जेव्हा आपण फिरतो तेव्हा गडाचे दृश्यात्मक बाह्यांग आपण जाणून घेतो, त्याचे अंतरंग आपण अनुभवतच नाही.
हल्ली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गला आपण या ना त्या कारणाने नेहमी भेट देत असतो. विजयदुर्ग तसा अफाट किल्ला आहे. शिवरायांपासून ते कान्होजी—तुळोजी आंग्रे ते आनंदराव धुळपापर्यंत या जलदुर्गाने अनेक दिग्गजांना अनुभवलेले. या गडाच्या जिभीच्या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हातास तटबंदीवर आपणास जागोजागी चुना लावून दुरूस्ती केलेली दिसते. कधीतरी ही दुरूस्ती त्या तटावर हात फिरवून अनुभवा, तो खरबरीत स्पर्श हाताला जाणवू द्या, इंग्रजांच्या तोफगोळयांच्या सरबत्तीने तटाच्या त्या भळभळत्या जखमा डोळ्यांनी स्पर्शाने लक्षात घ्या. सिंधुदुर्गाच्या चिवट तटबंदीवर, पन्हाळ्याच्या तीन दरवाजावर अशा तोफगोळ्यांनी जायबंदी झालेल्या पण मराठ्यांनी परत निकराने डागडुजी केलेल्या खुणा तुम्हाला जागोजागी दिसतील.
राजगडाला कधीतरी काटेरी झुडूपांचा सामना करत सुवेळा माचीच्या बुरूजाच्या खाली ऊतरा. इथे औरंग्याने दमदम्यावरून तोफगोळ्यांचा मारा करून सुवेळा माचीच्या बुरूजाला पाडलेली खिंडारे तुम्हाला दिसतील. सह्याद्रीतील प्रत्येक गड त्याचे तट—बुरूज तुम्हा—आम्हाला आजही त्या भळभळत्या खुणा दाखवत आहेत. त्यासाठी गरज आहे ती आपण डोळे ऊघडून गड बघण्याची. जर अशा रितीने गड बघितले तर गडांचा अनुभवलेला संघर्षकाळा तुम्हाला समजेल. हे न अनुभवता, इतिहास समजून न घेता गडाला तुम्ही भेट दिली तर ती भेट नुसती पायपीट ठरेल.
ज्यांनी या पध्दतीने आयुष्यभर गड पाहीले त्या दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचा आज चतुर्थ स्मृती दिन. या सह्याद्रीपुत्राला माझा मानाचा त्रिवार मुजरा.
आपला नम्र — भगवान चिले
No comments:
Post a Comment