विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 15 October 2023

#कांचनबारी_लढाई

 



#कांचनबारी_लढाई
छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६७० च्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकत मोहीम फत्ते केली, त्यानंतर मोगल ठाणे असलेल्या मुल्हेरवर ही हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसर्या सुरतेवरील मोहिमेमूळे मुअज्जम जागा झाला. मुअज्जम याने दाऊदखान कुरेशीला छत्रपती शिवाजी महाराजांना अडविण्याचा आदेश दिला. दाऊदखान हा बऱ्हाणपुरहून निघाला व १६ ऑक्टोबर १६७० ला रात्री नऊ च्या सुमारास चांदवडला पोहोचला. तिथे त्याला पक्की बातमी मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज चांदवडची रांग कांचन- मांचन घळीतून पार करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्री छावणी न टाकता अंधारातच चांदवड रांग ओलांडण्याचा निर्णय घेतला.
दाऊदखानला ही बातमी मध्यरात्रीनंतर कळली. तो लगेच तिथून निघाला व चांदवडपासून साधारण १६ किमीवर असलेल्या कांचना घळीत पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांना दाऊदखानच्या हलचालींबद्दल सगळी माहिती मिळत होती. महाराजांनी पाच हजार स्वारांनिशी दूसरी सूरत मोहीम आणि मुल्हेर येथील मोहिमेतील सगळी संपत्ती पुढे पाठवली. उरलेल्या दहा हजार लोकांनीशी महाराज मोगलांची वाट बघत होते. दाऊदखानने इखलासखानला पुढे पाठवल्यामुळे त्या दोघांत अंतर निर्माण झाले. पहाटेच्या सुमारास इखलासखान एका टेकाडावर पोहोचला व त्याला समोर युद्धासाठी तयार असलेले मराठ्यांचे सैन्य दिसले. दाऊदखानासाठी न थांबता त्याने मराठ्यांवर हल्ला केला.
जोरदार हल्ले व प्रतिहल्ले सुरु झाले व थोड्याच वेळात मोगलांची फळी मागे हटू लागली. इखलासखान घायाळ होऊन घोड्यावरुन खाली पडला. तोवर दाऊदखान तिथे पोहोचला व त्याने मोगलांची मोडलेली फळी सावरली. संग्रामखान घोरी नावाचा आणखी एक सरदार घायाळ झाला. दाऊदखानने त्या रणधुमाळीत घुसून इखलासखानला वाचविले पण तोवर मोगल सैन्याची वाताहात झाली होती. मराठ्यांनी जोरदार प्रत्याक्रमण करत मोगलांना टेकाडावरुन खाली ढकलून दिले. तीन हजार मोगल सैनिक मारले गेले आणि मराठ्यांनी हि कांचनबारीची लढाई जिंकली ..
छत्रपती शिवाजी महाराज जातिनिशी स्वता रणभूमीवर हजर असलेल्या लढाईपैकी ही कांचनबारीची लढाई. मराठ्यांनी दुसऱ्या सूरत मोहीमेनंतर चालून आलेल्या मोगल सैन्याला पराभूत करत सात आसमान दाखवल्याची नोंद असलेली तारीख आहे १६ ऑक्टोबर १६७० ( मध्यरात्र ) आणि १७ ऑक्टोबर १६७० .
- राज जाधव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...