विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 February 2024

#मराठा सरदार रवळोजी जाधव#

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राबाहेर बांधलेल्या साजरा किल्ल्याचा हवालदाराचा पहिला मराठी शिलालेख .



#मराठा
सरदार रवळोजी जाधव#@
©माहिती व संकलन :-अनिल दुधाणे .
 
#साजरा किल्ल्यावरील हवालदाराचा #शिलालेख ……
हा शिलालेख तामिळनाडू राज्यातील तालुका जिल्हा वेल्लोर येथील किल्ले साजरा गोजरा या जोड किल्ल्यापैकी साजरा किल्ल्यावरील पहिला उत्तर दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतल्या बाजूस छत्रपती शिवरायांचे जे शिल्प आहे .तिथून दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी पहारेकरी व हवलदार यांच्या बसण्याची जागा असते त्यास देवढी म्हणतात या देवढीच्या भिंतीवर तटाला खालच्या बाजूस हा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ४ ओळीचा शुद्ध देवनागरी लिपीत मराठी भाषेत आहे .शिलालेखाची अक्षरे ठळक असून वातावरणाचा दगडावर परिणाम झाला असून, काही शब्द अक्षरे झिजली असून सुस्पष्ट पणे खडू लावून सहज वाचता येत आहेत .
.गावाचे नाव : साजरा किल्ला ,ता. , जि. वेल्लोर ,राज्य- तामिळनाडू
शिलालेखाचे वाचन :
१. रवळोजी
२.जाधव हाव
३.ळदार सा
४.जरा
जी.पी.एस. :-N -१२ .९२ ”५० ’४९ ,W -,७४ .९४ ’’५२.’ ४७
शिलालेखाचे स्थान :-साजरा किल्ल्याच्या पहिल्या व दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी पहारेकरी देवढ्याच्या भिंतीवर खालच्या बाजूवर कोरला आहे .
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : मराठी भाषा देवनागरी लिपी
प्रयोजन : किल्ल्याच्या हवालदारच्या नावाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - साधारण साल -१६७७ दक्षिण दिग्विजय मोहीमेनंतर
कारकीर्द :-छत्रपती शिवाजी महाराज
व्यक्तिनाम:- रवळोजी जाधव हवालदार
शिलालेखाचे संशोधन /वाचक : , कुमार गुरव ,श्री अनिकेत वाघ ,श्री अनिल किसन दुधाणे .
संक्षेप :- हावळदार-हवालदार
अर्थ :-छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या साजरा किल्ल्याचे हवलदार रवळोजी जाधव हे होते
शिलालेखाचे महत्व :- छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत वेल्लोर किल्ला जिंकल्यासाठी बाधलेले साजिरा आणि गोजिरा हे दोन किल्ले अतिशय महत्वाचे आहेत ,साजरा किल्ल्यावर महाराजांनी अनेक बांधकामे केली आहेत ,परंतु ही बांधकामे कोणी केली किंवा या बांधकामाबाबत कोणते अस्सल मूळ पत्र किंवा व्यक्तिनाम मिळत नाही .. छत्रपतीच्या शिवाजी महारांजाच्या कारकिर्दीत त्यांच्या हयातीत त्यांचें घोड्यावरील अस्सल शिल्प देखील याच किल्ल्यावरील पहिल्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागील खांबावर उठावदार पद्धतीचे कोरलेले आहे .दक्षिण दिग्विजय मोहिमेत महाराष्ट्रातून आलेले अनेक मराठा सरदार होते .त्यात जाधव घराण्याचे अनेक सरदार व इतर अधिकारी होते.२३ जुले १६७७ रोजी महाराजांनी किल्ले उटळूर येथे केदारजी जाधव यांची हवलदार म्हणून नेमणूक केलेली नोंद उपलब्ध आहे ,रायाजी बजाजी जाधव, पोसाजी तुकाजी जाधव यांचे उलेख किल्ले उटळूर संबधी येतात .कदाचीत साजरा किल्ल्यावरील रवळोजी जाधव हे त्याच्या वंशापैकी किंवा त्यांच्या घराण्यात कोणीतरी असावेत का ??? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात हिरोजी इंदुलकर ,अर्जोजी ,गिरजोजी यादव,रुद्राजी मस्का यांची किल्ल्याच्या बांधकामा बाबतीत नावे येतात ,तशी दक्षिणेत किल्ल्यावरील अधिकाऱ्याची फारशी नावे मिळत नाहीत,साजरा किल्ल्यावर एका किल्ल्याच्या हवालदाराचे शिलालेख रुपी नाव मिळणे ही एक दुर्लभ गोष्ट असून दक्षिणेत महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावर एका मराठा हवलदाराच्या नावाचा मराठी शिलालेख मिळणे हे फार मराठा इतिहासाची संशोधनात्मक मोठी बाब आहे . हेच या शिलालेखचे विशेष महत्व आहे .
साजरा किल्ल्याबाबत इतिहासातील नोंदी :-
१.. “कसबे वारुळास जाताच वेढा घातला.खाली किल्ल्यासमीप दोन डोंगर होते तेथे किल्ले बांधले. त्यांची नावे साजर गोजर ठेविली.त्यांजवर तोफा ठेवून किल्ला जर केला.हरी रघुनाथ नामजा पाच हजार मावळे व दोन हजार स्वर ठेवून अलीकडे चंदीस गेले. चंदी फत्ते झाली. मागे हवालदार ठेविले. तिमाजी केशव सबनीस, किल्ले इमारतीवर रुद्राजी साळवी ठेविले. विठ्ठल पिलाजी अत्रे गरोडे प्रांत पुणे यांसी महालाचा सुभा सांगितला. मागे किल्ले वारूळ नरहरी रुद्र यांनी घेतला. फत्ते झाली.”
संदर्भ :९१ कलमी बखरीत याबाबतचा उल्लेख आपल्याला पहायला मिळतो)
२. वेल्लोर किल्ल्याला वेढा दिल्यानंतर मोहीम रघुनाथपंतांकडे सोपवून महाराज वेल्लोर इथून निघून गेले. वेढा दिलेला असतानाच मराठ्यांनी साजिरा गोजिरा असे दोन किल्ले बांधून काढले. वेल्लोर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही किल्ले उभे ठाकले.
@©माहिती व संकलन :-अनिल दुधाणे .
टीप..सदर कार्यात .श्री प्रवीण भोसले ,अनिकेत वाघ .यांची मदत व सहकार्य लाभले . किल्ल्याचे फोटो व नकाशे श्री प्रवीण भोसले सर .
याच बरोबर सदर शिलालेखात आलेल्या रवळोजी जाधव यांचे नाव आलेले असून त्याच्याबद्दल कुठे साधनात नोंद असेल तर नक्की कळवावे .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...