संभाजीराजांनी कारवार जवळील अंजदीव हे बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची तयारी
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
सन १६८२ च्या सुरुवातीस संभाजीराजांनी कारवार जवळील अंजदीव हे बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची तयारी केली. विजरईचा सेक्रेटरी दोतोर लुईस गोंसाल्व्हीस कोत याने #२९_एप्रिल_१६८२ रोजी, विजरईस (पोर्तुगीज अधिकारी) लिहिलेल्या पत्रात या विषयी पुढील उल्लेख मिळतो :
“आत्ताच दुभाष्याने मला येऊन सांगितले की, त्यास एका माणसाने बातमी दिली आहे की संभाजीराजेंने दगड व चुना अंजदीव बेटाकडे पाठविला असून तेथील कामास जो पैसा लागेल तो खर्च करण्यास आज्ञा दिली आहे. त्यामुळे यापुढे तेथे तारवे (एक प्रकारच्या होड्या) पाठविण्यास विलंब करणे योग्य होणार नाही...”
या ही बातमी कळताच पणजीच्या किल्ल्यात विजरईने आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. संभाजीराजे अंजदीव बेट ताब्यात घेऊन सामानाची जमवाजमव करून तेथे किल्ला बांधण्याची तयारी करीत आहेत व यासाठी नकाशा काढण्याची त्यांनी आज्ञा देखील दिली आहे. म्हणून अंजदीव पूर्णपणे त्यांच्या हातात पडण्यापूर्वीच त्या बेटावर आपली माणसे व सामान पाठवून किल्ला बांधण्याचे आणि तेथे सहा तोफा ठेवण्याचे बैठकीत विजरईने ठरवले. शिवाय सदर बेटाच्या रक्षणार्थ काही लढाऊ तारवे ठेवण्याचेही या बैठकीत ठरले..
अंजदीव बेट जर पूर्णपणे मराठ्यांकडे गेले असते तर पोर्तुगीजांचे गोव्यात खूप मोठे नुकसान झाले असते. कर्नाटक प्रांत गोव्याचं धान्य कोठार होतं. कर्नाटकातून धान्यसामुग्री समुद्रमार्गे गोव्यात येई. हेंद्री-केंद्री (खांदेरी उंदेरी) येथे मराठ्यांनी किल्ला बांधल्यापासून पोर्तुगीजांच्या चौलला ज्या प्रकारे उपद्रव होऊ लागला अगदी तशीच परिस्थिती संभाजी राजांनी अंजदीव बेट हस्तगत केल्यास गोव्यात उत्पन्न होणार होती. हि गोष्ट पोर्तुगीजांच्या लक्षात आली होती. म्हणून ते बेट पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात ठेवण्याचे योजिले. तारीख ०५ मे रोजी पोर्तुगीजांचे आरमार अंजदीव बेटाजवळ आले व त्यांनी या बेटाचा ताबा घेतला..
२ जुलै १६८२ रोजी कॅप्टन आमारू सिमोंइस परैर याने तेथील किल्ल्याचा पहिला दगड बसवून सहा महिन्यांच्या आत किल्ला बांधून काढला. संभाजी राजांनी आपल्या वकिलांमार्फत व अंकोल्याच्या सुभेदाराकडून विजरईकडे या कृत्याबद्दल तक्रार केली पण पोर्तुगिजांनी हे बेट आपले असल्यामुळे याबाबतीत संभाजी राजांना बोलण्याचा अधिकार नाही असे उत्तर दिले. या प्रकरणापासून पुढे पोर्तुगीज व मराठे यांच्यात ठिणगी पडली..
No comments:
Post a Comment