राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांना तीन मुले होती. सयाजीराव, मुरारराव आणि सिधोजीराव..
◆ त्यातले “मराठा शूरवीर मुरारराव हिंदुराव घोरपडे” यांनी तिरुवेत्तीचा विजय : फ्रेंचांशी करार..
चंदासाहेबाच्या मृत्यूमुळे मुराररावांच्या मार्गावरील एक मोठा काटा दूर झाला. त्यामुळे मुरारराव त्रिचनापल्लीचा वेढा अधिक लांबवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना ती लढाई तातडीने संपवण्याची घाई नव्हती. फ्रेंच गव्हर्नर डुप्ले मुराररावांना वरचेवर उत्तेजनपर पत्रे पाठवून महमद अलीच्या ताब्यातील त्रिचनापल्ली जिंकण्याची त्वरा करू इच्छित होता. डुप्ले आणि त्याची पत्नी यांची मुराररावांना वारंवार पत्रे तर येत होतीच आणि त्याबरोबर मौल्यवान वस्तूंच्या भेटीही पोहोचत होत्या, या पत्रातून मुरारराव, त्याचे घोडदळ आणि लष्कर यांच्या शौर्याची तोंड भरून स्तुती केली जात होती. मुराररावांकडूनही पाँडेचरीला वकील पाठवून फ्रेंचांशी करार करण्याची घाई चालू होती. डुप्लेने कराराच्या वाटाघाटी शक्यतो लवकर संपवल्या. हेतू असा की त्यामुळे मुरारराव त्रिचनापल्लीचा वेढा अधिक त्वरेने संपवतील. डुप्ले आणि मुरारराव यांच्या दरम्यान झालेल्या करारामध्ये डुप्लेने त्रिचनापल्लीचा किल्ला घेऊन म्हैसूरच्या राजाला देण्याचे मान्य केले. त्याच्या मोबदल्यात राजाने डुप्लेला १३ लाख रुपये देण्याचे कबूल केले मुराररावांना दोन लाख रुपये प्रथम द्यावयाचे आणि महंमद अली पूर्णपणे बाजूला सारला गेला म्हणजे आणखी दोन लाख रुपये द्यावयाचे असे ठरले..
● या करारासंबंधी डुप्लेचा चरित्रकार मार्टिनने अधिक तपशीलाची माहिती दिली आहे. मार्टिनच्या माहितीप्रमाणे चार दिवस करारासंबंधी मुराररावांशी वाटाघाटी झाल्या. आणि नंतर कराराची पुढीलप्रमाणे कलमे दोन्ही पक्षांनी मान्य केली :
१).कर्नाटकातील फ्रेंचांचा वसूली कारकून पापैया पिल्ले हा मुराररावांना दरमहा दीड लाख रुपये देईल.
२).डुप्ले मुराररावांसाठी होसकोट, कोलार, पेनकोंडा हे किल्ले आणि त्या किल्ल्याभोवतालची जहागीर एवढा प्रदेश मिळवून देईल.
३).किल्ला जिंकल्यानंतर किंवा लढाई जिंकल्यानंतर त्यावर जी संपत्ती आणि शस्त्रे हस्तगत होतील ती दोघांनी निम्मी निम्मी वाटून घ्यावी.
४).मुराररावांनी त्या प्रदेशातील बखेडे संपेपर्यंत आणि डुप्लेने परवानगी देईपर्यंत आपल्या सैन्यासह फ्रेंचांच्या बाजूने जय्यत तयार रहावे.
५).मुराररावांच्या सैन्याला २० डिसेंबर १७५२ पासून फ्रेंचांकडून रोजमुरा मिळावा. (मुराररावाजवळ त्यावेळी ४ हजार घोडेस्वार आणि दोन हजार पायदळ होते.) मुराररावांनी याडीकी आणि ताडपत्री हे दोन तालुके मागितले होते ते लीजवर (भाडेपट्ट्यावर) देण्यात आले. सिरपी मिळवण्याचा आग्रह मात्र त्यांना सोडावा लागला..
वरील कराराशिवाय डुप्लेने मुराररावांचा कर्नाटकातील चौथ घेण्याचा हक्क मान्य केला. या करारासंबंधी आनंदरंग पिल्ले यांनी लिहून ठेवलेले उल्लेख आणि तत्कालिन इतर कागदपत्रांत तपशीलाने माहिती दिली आहे. त्यातील महत्त्वाचा भाग मुराररावांच्या सामर्थ्याचा पूरावा म्हणून दाखवता येण्यासारखा आहे. मुराररावांच्या कोणत्याही अटी कबूल करून त्यांची मर्जी संपादन करणे डुप्लेला किती अगत्याचे वाटत होते, याविषयी एक गमतीदार माहिती पिल्ले यांच्या डायरीत नमूद केलेली आहे. 'वाटाघाटी चालू होत्या, दोन्ही बाजूचे वकील निरनिराळे मुद्दे मांडीत होते मुराररावांचे चार वकील वाटाघाटीसाठी गेलेले होते. त्यांना इप्ले आणि त्याची पत्नी खुष ठेवण्याचा सर्वातोपरी प्रयत्न करीत होती. चौघांपैकी तिघांना डुप्लेने आणि त्यांच्या पत्नीने खाजगीरित्या चर्चा करण्यासाठी बोलावले आणि त्यांना मोठ्या आर्जवाने सांगितले की काहीही करा आणि मुराररावांची मदत आम्हाला मिळेल असेच ठरवा. आम्ही तुमचे अत्यंत आभारी होऊ..'
मार्टिनने कराराचा तपशील देऊन पुढे म्हटले आहे, दोन्ही पक्षांनी शत्रूच्या सैन्याला जेरीस आणण्याचे तंत्र वापरण्याचे ठरवले. शत्रू सैन्याला तिरुवेत्ती आणि कडलोर यांच्या बाजूने ढकलीत न्यावे, तसेच भुवनगिरी, पोर्टोनोव्हो आणि चिदंबरम् या ठिकाणांच्या बाजूलाही शत्रूला मागे हटवावे. असे झाले म्हणजे त्रिचनापल्लीवर स्वारी करण्याचा मार्ग मोकळा होईल.' करारानंतर थोडे दिवसांनी म्हणजे, जानेवारीच्या मध्यावर मुरारराव पांडेचरीला गेले. पाँडेचरीत डुप्लेने त्यांचे भव्य स्वागत केले. त्यांचा मानसन्मान केला. त्यावेळी मुराररावांबरोबर ४ हजार स्वार होते. तेथून परत आल्यावर त्यांनी आपले सैन्य आणि फ्रेंच शिपायांच्या काही तुकडया बरोबर घेतल्या आणि तिरुवेत्तीवर स्वारी केली. तेथे नबाबाच्या सैन्यावर मुराररावांनी जोराचा हल्ला केला..
● ऑर्मेंस या इंग्रज इतिहासकाराने तिरुवेत्तीवरील हल्ल्याचे विस्तृत वर्णन दिले आहे :
हा हल्ला २० जानेवारी १७५३ रोजी झाला. मुख्य हल्ल्या खेरीज इतर छोट्या लढायाही तिरुवेत्तीच्या परिसरात घडल्या. पहिल्या हल्ल्याच्या वेळी इंग्रज कमांडर मेजर लॉरेन्स याला घेरले आणि त्याचे शंभर सैनिक ठार केले. वस्तुतः यावेळी मुराररावांना फ्रेंचाकडून चांगली कुमक आली असती तर इंग्रजांचे कंबरडे मोडणे मुळीच अवघड नव्हते. पण फ्रेंच तुकडीतील शिपायांनी मनापासून लढाई केली नाही. त्याबद्दल मुराररावांनी त्यांच्या भित्रेपणाची खूप टर उडवली, आणि त्यांच्या अंगचोरपणाबद्दल खरडपट्टी काढली. फ्रेंचांनी ऐन वेळी अवसानघात केला तरी मुराररावांनी धीर सोडला नाही. त्यांच्या फौजा शत्रूच्या, म्हणजे इंग्रजांच्या सैन्यावर वरचेवर छापे घालीत होत्या आणि त्यांचा धान्य व शस्त्र पुरवठ्याच्या वाटा रोखून धरीत होत्या..
फ्रेंचांनी मुराररावांच्या सैन्याइतकीच तडफ दाखवली असती तर परिस्थिती बदलली असती. पण तसे घडले नाही. मुरारराव आपल्या एकट्याच्या बळावरच लढाई देत राहिले. सन १७५३ च्या पहिल्या तीन महिन्यांच्या काळात मुरारराव तिरुवेत्तीच्या परिसरात अत्यंत दक्षतेने वावरत होते. आणि कोणत्याही क्षणी शत्रूचा हल्ला झाला तरी त्याला तोंड देता यावे याविषयी खबरदारी घेत होते. १ एप्रिल १७६३ रोजी मुराररावांचे सैन्य आणि इंग्रजांच्या यांची जोराची लढाई झाली. मुरारराव आणि त्यांचे बंधू लष्करी तुकड्या भुजंगराव यांनी इंग्रजांच्या सैन्यावर हल्ला केला. ते सैन्य सेंट डेव्हिड किल्ल्यातून लढाईच्या साहित्यसामुग्रीनिशी बाहेर पडलेले होते. त्याच्याबरोबर महंमद अलीचीही फौज होती..
तिरुवेत्तीनजीक लढाई झाली. त्यात महंमदअली जखमी झाला. भुजंगराव मरण पावले. मुराररावांचा घोडा गोळी लागून ठार झाला. मुराररावांच्या सैन्यातील बरेच सैनिक मारले गेले. अर्थात शत्रू पक्षाच्या सैन्याचे अधिक नुकसान झाले आणि अधिक लोकही ठार झाले. फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. पण लढाईत मुराररावांचे सैनिक अतिशय शौर्याने लढले. त्यांनी आपल्या नेहमीच्या सर्वसाधारण युद्ध प्रयत्नांपेक्षा दुप्पट तिप्पट अधिक धैर्य दाखवले. पण फ्रेंचांच्या कचखाऊ धोरणामुळे मुराररावांची निराशा झाली. खुद्द डुप्लेने त्याप्रमाणे मत व्यक्त केले. त्याला आपल्या सैनिकांच्या धोरणाविषयी खरोखरच निराशा वाटली. आणि मुराररावांच्या युद्ध कौशल्याबद्दल त्याने प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर, आपल्या प्रशंसेचे प्रतिक म्हणून त्याने मुराररावांना सन्मानाचा पोषाख पाठवला. मराठा सैनिक इंग्रजांची सर्व रसद मारून काढतील आणि सेंट डेव्हिड किल्ल्यातून त्यांना मिळणारी कुमकही पूर्णपणे अडवतील असे वाटत होते. मुराररावांच्या लढण्याचा एकंदर आवाका लक्षात घेता ते अशक्यही नव्हते. पण ऐनवेळी फ्रेंच शिपायांनी माघार घेतली. मुराररावांनी त्याबद्दल तक्रारही केली. फ्रेंच शिपाई शत्रूशी लढायला नकार देऊ लागले. त्यांनी मुराररावांना मदत करण्याचेही नाकारले. मुराररावांना तोफा हव्या होत्या. दारूगोळा आणि इतर शस्त्रसामुग्री हवी होती. त्यांनी फ्रेंचांकडे वारंवार मागणी केली. पण तिकडून दारूगोळ्याचा पुरवठा फार थोडा झाला..
डुप्लेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुराररावांना मदत मिळाली नाही. त्यांनी शत्रूची रसद आणि इतर माल वाटेत अडवून हस्तगत केला आणि स्वतःच्या हिमतीने लढाई नेटाने चालू ठेवली. शेवटी मे १७५३ च्या आरंभी मुराररावांनी तिरुवेत्तीचा किल्ला जिंकण्यात यश मिळवले. पण ज्या दिवशी किल्ला मुराररावांच्या कबजात आला त्याचे आदलेच दिवशी इंग्रजांनी किल्ल्यातील आपली मालमत्ता तेथून काढून बाहेर पाठवली होती. ही गोष्ट लक्षात आल्यावर मुराररावांच्या फौजेतील काही शिपायांनी चिडून किल्ल्याच्या आसपासचा प्रदेशही उध्वस्त केला. आणि तिरुवेत्तीचा प्रदेश नापीक करून टाकला. हे सर्व प्रकार आपल्या सैनिकांनी केले नाहीत असे नंतर मुराररावांनी स्पष्टपणे सांगितले. तो प्रदेश आणि त्यातील शेती करणारे लोक यांचा विध्वंस ज्या सैनिकांनी केला ते मात्र डुप्ले आणि मुरारराव यांच्या हुकुमानेच आपण हे सारे करीत आहोत असे म्हणत होते. पण मुराररावांनी त्याचा स्पष्ट इन्कार केला आणि विध्वंस करणारे सैनिक आपले नव्हते असे सांगितले, त्या सैनिकांनी तिरुवेत्तीच्या प्रदेशातील खेड्यावर हल्ले केले. गावकऱ्याकडून पैसे उकळले. त्यांच्यावर खंडणी बसवली..
मुरारराव तिरुवेत्तीच्या लढाईत विजयी झाले. तो किल्लाही त्यांना मिळाला. पण त्याचबरोबर त्यांना फ्रेंच सैनिकांच्या दुटप्पी वर्तनाचा चांगला अनुभवही आला..
No comments:
Post a Comment